शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

लोकशाहीचा विलंबबळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 05:18 IST

सत्ताधारी सरपंचाने विरोधी गटाचा पत्ता कापण्यासाठी ग्रामसेवकाला हाताशी धरून कारस्थान रचले. त्यातून उद््भवलेल्या कोर्टबाजीने खुणेश्वर गाव लोकनियुक्त ग्रामपंचायतीपासून तब्बल पाच वर्षे वंचित राहिले. हा न्यायनिवाडा तद्दन अन्यायकारक आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील खुणेश्वर ग्रामपंचायतीची जाहीर झालेली निवडणूक नसलेल्या अधिकाराचा वापर करून ऐन वेळी रद्द केल्याबद्दल उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. पण हा निकाल वेळीच न देऊन लोकशाहीचा गळा घोटण्यात आपणही अहेतुकपणे सामील झालो, याचे भान न्यायालयास राहिले नाही. एखाद्या निवडणुकीच्या वैधतेचा निर्णय वेळीच दिला नाही की लोकशाहीचा कायदेशीर मार्गाने कसा राजरोसपणे खून पडतो, याचे हे लज्जास्पद उदाहरण आहे.

गेली साडेतीन वर्षे या ग्रामपंचायतीचा कारभार सरकारनियुक्त प्रशासकाकडे राहिला. राज्यातील इतर हजारो ग्रामपंचायतींप्रमाणे खुणेश्वरची निवडणूकही १ नोव्हेंबर २०१५ रोजी व्हायची होती. परंतु राज्य निवडणूक आयोगाने मतदानाच्या आदल्या दिवशी ती निवडणूक रद्द केली आणि महिनाभरात पुन्हा निवडणूक घेण्याचा नवा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार डिसेंबर २०१५ मध्ये मतदानही झाले. परंतु उच्च न्यायालयाने आमच्या संमतीशिवाय निकाल जाहीर करता येणार नाही, असा अंतरिम आदेश दिला. हा अंतरिम आदेश निवडणूक व्हायच्या तीन दिवस आधी दिला गेला. विशेष म्हणजे या वादावर लगेच अंतिम सुनावणी घेण्याचेही ठरविले. परंतु १ डिसेंबर २०१५ ते १९ जून २०१९ या साडेतीन वर्षांत न्यायालयास अंंतिम सुनावणी घेण्यास वेळ मिळाला नाही. लवकर सुनावणी घ्या, अशी विनंती निवडणूक आयोगानेही केली नाही. शेवटी जो निकाल झाला त्याने लोकशाहीचा खून झाला. खुणेश्वरची १ नोव्हेंबर २०१५ ला होणारी निवडणूक रद्द करण्याचा आयोगाचा निर्णय न्यायालयाने बेकायदा ठरविला. त्यामुळे १ डिसेंबर २०१५ रोजी झालेल्या निवडणुकीचा राखून ठेवलेला निकाल जाहीर करणे निरर्थक ठरले. आता न्यायालयाने नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास सांगितले आहे. परिणामी मधली साडेतीन वर्षे खुणेश्वर गाव लोकशाहीपासून वंचित राहिले. या निवडणुकीचा वाद मुळात ज्यावरून झाला तो विषयही मन विषण्ण करणारा आहे. माझ्या घरात शौचालय आहे व त्याचा मी नियमित वापर करतो किंवा माझ्या घरात शौचालय नाही, पण मी सार्वजनिक शौचालयाचा नियमित वापर करतो, असे प्रमाणपत्र ग्रामपंचायत निवडणूक लढविताना उमेदवारी अर्जासोबत जोडणे कायद्याने सक्तीचे केले गेले. असे प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून घ्यायचे असते.

खुणेश्वरमधील या निवडणुकीत यावरूनच वाद झाला. तत्कालीन सरपंच चंद्रहार मनोहर चव्हाण यांनी विरोधी गटाचा पत्ता काटण्यासाठी ग्रामसेवक एस.एम. चेंडगे यांना हाताशी धरले. त्यानुसार ग्रामसेवकाने सरपंचांच्या गटातील उमेदवारांना शौचालय नसूनही तशी प्रमाणपत्रे दिली व विरोधी गटातील १५ उमेदवारांना शौचालय असूनही प्रमाणपत्रे नाकारली गेली. यामुळे या १५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज फेटाळले गेले. या प्रकाराची निवडणूक निरीक्षक, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी आपापल्या पातळीवर चौकशी केली. उमेदवारी अर्ज स्वीकारणे व फेटाळणे यात मोठा घोटाळा झाल्याचे अहवाल राज्य निवडणूक आयोगास दिले गेले. ते लक्षात घेत आयोगाने मतदान रद्द केले व महिनाभराने निवडणूक घेण्याचा नवा कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारी अर्ज अयोग्य पद्धतीने स्वीकारले वा फेटाळले जाणे, यासाठी निवडणूक याचिका करणे हाच प्रस्थापित कायदेशीर मार्ग आहे. या कारणावरून ठरलेली निवडणूक ऐनवेळी रद्द करण्याचा अधिकार आयोगास नाही, असे न्यायालयाने जाहीर केले. याने कायद्याच्या मुद्द्याचा निकाल झाला असला तरी लोकशाहीला मात्र न्याय मिळाला नाही.

काही प्रकरणे अशी असतात की विलंबाने दिलेला न्यायही अन्याय करणारा ठरतो. अशी प्रकरणे काळजीपूर्वक वेगळी काढून त्यांचा वेळीच निकाल करण्याची सोय न्यायालयाने करण्याची गरज या प्रकरणाने अधोरेखित झाली आहे. एका सरपंचाने आपली सत्ता टिकविण्यासाठी रचलेल्या कारस्थानाचे कायदेशीर मार्गाने पर्यवसान लोकशाहीच्या मुळावर घाला घालण्यात व्हावे, ही न्यायव्यवस्थेचीही घोर थट्टा आहे.

टॅग्स :democracyलोकशाही