शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

धरणावरील पर्यटन ठीक, सुरक्षेचे काय?

By किरण अग्रवाल | Updated: August 20, 2023 11:49 IST

Dam tourism ok, what about safety? : जीव गेल्यानंतर हळहळण्यापेक्षा तसे होणार नाही याची खबरदारी घेतलेली केव्हाही बरी, जिल्हा प्रशासनानेही याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा.

- किरण अग्रवाल

धरणात बुडाल्याच्या किंवा आत्महत्येच्या घटना लक्षात घेता अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. जीव गेल्यानंतर हळहळण्यापेक्षा तसे होणार नाही याची खबरदारी घेतलेली केव्हाही बरी, जिल्हा प्रशासनानेही याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा.

पावसामुळे निसर्गाचा सृजनोत्सव सुरू असल्याने सध्या लहान मोठ्या प्रकल्पांवर पर्यटकांची गर्दी होत आहे खरी, परंतु येथे पोहताना बुडाल्याच्या अगर आत्महत्येच्या घटना पाहता अशा ठिकाणी व्यक्तिगत व सार्वजनिक सुरक्षेचे मापदंड पाळले जाणे गरजेचे होऊन बसले आहे. दुर्दैवाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाताना दिसत नाही.

दिवस पावसाळ्याचे असल्याने पावसाळी पर्यटनाच्या जागा पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणे स्वाभाविक आहे. गोव्याला समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायला न जाऊ शकणारा मध्यमवर्ग दिवसभराचा आनंद आपल्या आसपासची धरणे, बंधारे येथे शोधत असतो. जाण्या येण्यासाठी लागणाऱ्या इंधनाला व पर्यायाने खिशालाही परवडणारी ही ठिकाणे असतात. पण येथे आनंदासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांची सुरक्षा जपली जाणे कसे अवघड आहे व त्यातून किती मोठे नुकसान होऊ शकते याची उदाहरणे कमी नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वीच बार्शीटाकळीचे तीन तरुण काटेपूर्णा धरणावर गेले असता पोहोताना त्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला तर दोघे कसेबसे बचावले. मागे पोपटखेडच्या धरणावर अकोट येथील एका भगिनीचा बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. वारी हनुमान येथील मामा-भाच्याचा डोह व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील वारी भैरवगडच्या डोहात तर नेहमीच अशा घटना घडत असतात. त्यामुळेच धरण असो, की छोटे प्रकल्प वा डोह; अशा ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहू नये.

अकोला जिल्ह्यात वाण, पोपटखेड, दगडपारवा, काटेपूर्णा, मोर्णा आदी प्रकल्पांवर शनिवार रविवार या सुटीच्या दिवशी फिरायला येणाऱ्यांची गर्दी उसळत आहे. यातील दोन प्रकल्पांवरील अलीकडच्या दोन घटना पाहता कुठेही सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली जाताना आढळत नाही. यातील काही जागा ''युगल क्रीडा''साठी प्रसिद्ध बनू पाहत आहेत, तर काही ठिकाणी पाण्यात उतरण्याला कसलीही बंधने नाहीत. यातूनच दुर्दैवी घटना ओढवत असल्याने पाटबंधारे विभागाने जागोजागी किमान टेहळणी मनोरे उभारून किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून या पर्यटनाच्या दिवसात तरी नियंत्रणाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सर्वच प्रकल्पांवर सुरक्षारक्षकांची नेमणूक असली तरी अधिकतर सुरक्षारक्षक बड्यांच्या पार्ट्यांमध्ये ''वेटरकी'' करतानाच दिसून येत असल्याचेही बोलले जाते. अनेक प्रकल्पांवर तर रात्रीची विद्युत व्यवस्थाही नसल्याने अंधारात काय काय चालते याची चर्चा न केलेलीच बरी, कारण कुणी कुणाला हटकणाराच नाही. दुसरे म्हणजे ऐनवेळी अशा प्रकल्पात काही अघटित घटना घडली तर बुडणाऱ्याचा जीव कसा वाचवावा याचे ज्ञान तेथे असणाऱ्या संबंधितांना अपवादानेच असते. शिवाय त्यासाठीची साधनेही त्यांच्याकडे नसतात. तेव्हा याबाबतचे प्रशिक्षण व साधनांची उपलब्धता यादृष्टीनेही विचार केला जाणे आवश्यक आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा, पेनटाकळी, नळगंगा, ज्ञानगंगा, पलढग आदी धरणांवरही गर्दी होताना दिसते. वाशिम जिल्ह्यात सोनल, एकबुर्जी व अडाण असे मध्यम प्रकल्प आहेत. मागे अडाण धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाय घसरून त्या धरणात पडल्या व त्यात दोघींचाही मृत्यू झाला होता. अमरावती जिल्ह्यातील मुलीही येथे फिरण्यासाठी आल्या असता एका मुलीचा पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाला होता. एकबुर्जी धरणातही अशा घटना घडून गेल्या असून, मोतसावंगा धरणाच्या सांडव्यात मागे चारजणांचा मृत्यू झाला होता. थोडक्यात, कुठलेही व कोणतेही प्रकल्प घेतलेत तरी तेथे सुरक्षिततेचे पुरेसे उपाय आढळत नाहीत.

धरण क्षेत्र खूप मोठे राहत असल्याने कुठे कुठे लक्ष देणार असा एक भाबडा युक्तिवाद यासंदर्भात केलाही जाईल, परंतु जिथे प्रकल्पांची खोली अधिक आहे किंवा ज्या भागात गाळाचे प्रमाण अधिक आहे तेथे जाण्यापासून किंवा पोहोण्यापासून रोखणारे खबरदारीचे फलक तरी लावता येणारे आहेत. सुरक्षारक्षक व गेट ऑपरेटर्सना वायर रोप, लाइफ जॅकेट्स, टॉर्च आदी साधने उपलब्ध करून देता येणारी आहेत.

सारांशात, पावसाळी पर्यटकांची ठिकठिकाणी होणारी वाढती गर्दी पाहता धरण व लहान प्रकल्पांवरील सुरक्षा व्यवस्थेची खबरदारी घेतली जाणे गरजेचे बनले आहे. यासाठी फार खर्चिक बाबींसाठी चिंताक्रांत होण्याची गरज नाही, तर किमान बाबींनी व खबरदारीनेही जानमालाचे नुकसान टाळता येऊ शकते.

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkolaअकोला