शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ विशेष लेख: पाकिस्तानच्या पराभवाने तालिबानही आनंदी!

By विजय दर्डा | Updated: October 30, 2023 07:43 IST

क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवल्यानंतर तिथे असा काही जल्लोष आहे, की जणूकाही आपल्या दुश्मनावरच मात केली आहे!

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

आयसीसी विश्वचषक मालिकेत सर्वांत कमकुवत मानला जाणारा अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानला हरवील, असे कोणालाच वाटले नसेल; परंतु इंग्लंडला हरविल्यानंतर अफगाणिस्तानच्या संघात इतका उत्साह संचारला की, त्यांनी पाकिस्तानला आठ गडी राखून पराभूत केले. या विजयाबरोबर अफगाणिस्तानमधील काबूल, खोस्त या शहरांसह इतर अनेक ठिकाणी जल्लोष साजरा होऊ लागला. विजयानंतर जल्लोष होणे स्वाभाविक असले तरी हा जल्लोष असा होता की, आपण आपल्या मोठ्या शत्रूला खडे चारले आहेत! तालिबान्यांनी या विजयानंतर रस्त्यांवर उतरून हवेत गोळीबार केला आणि लोक रस्त्यांवर येऊन नाचले.

अफगाणिस्तान या विजयाकडे ‘शत्रूवर मिळवलेला विजय’ म्हणूनच पाहत होते. याचा पुरावाही लगेच समोर आला. सामन्यात ८७ धावा काढणाऱ्या अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान याने ‘सामनावीर’ म्हणून चषक स्वीकारताना म्हटले की, मी हा चषक पाकिस्तानमधून जबरदस्तीने बाहेर काढल्या जाणाऱ्या अफगाण शरणार्थींना अर्पण करत आहे. जादरान याचे हे विधान पाकिस्तानच्या सणसणीत श्रीमुखात भडकाविणारे होते. अशा वक्तव्याची कल्पना पाकिस्तानने कधीही स्वप्नातसुद्धा केली नसेल !

वास्तवात पाकिस्तानमध्ये सुमारे १७ लाख अफगाण शरणार्थी असून त्यांनी त्वरित देश सोडून जावे, या पाकिस्तानच्या हुकुमावर केवळ अफगाणिस्तानच नव्हे तर जगातील इतर देशांनीही टीका केली आहे. इतक्या लवकर सगळे शरणार्थी मायदेशी कसे परतू शकतील? आणि तिथे जाऊन ते करतील काय? या शरणार्थींवर भुकेने मरण्याची वेळ येईल. अफगाणिस्तानात पाकिस्तानविरुद्ध निर्माण झालेला राग आणि घृणा काबूल पोलिसांनी केलेल्या ट्वीटवरूनही कळते. ‘अफगाणिस्तानच्या या विजयात काही लोकांसाठी विशेष संदेश आहे’, असेही काबूल पोलिसांनी म्हटले होते. ‘आम्ही पुढे जात आहोत. आमच्याकडे पहा; पण आम्हाला त्रास देऊ नका,’ अशी नोंद करणाऱ्या या ट्वीटमध्ये पाकिस्तानचे नाव घेतले गेले नव्हते, तरी ते कोणाला उद्देशून आहे, हे सर्वांना कळतच होते.

तालिबान सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाच्या प्रमुखांनीही ट्वीटवरून अफगाणी क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांनीही संघाचे अभिनंदन केले. पराभव झाल्याने पाकिस्तानी भडकणे स्वाभाविक आहे; परंतु माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. ‘अफगाणी आमचे भाऊ असून आम्ही भावांकडून आज मार खाल्ला आहे,’ असेही शोएब म्हणाला; परंतु प्रश्न असा आहे की, कोणता तरी अफगाणी पाकिस्तान्यांना भाऊ मानायला तयार आहे काय? वास्तवात अफगाणिस्तानचे लोक पाकिस्तानला आपला नंबर एकचा शत्रू मानतात. भारताकडे ते मित्र म्हणून पाहतात.पाकिस्तानला हरवल्यानंतर लगेचच अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशीद खान भारताचा पूर्व क्रिकेटर इरफान पठाण याच्याबरोबर नाचू लागला, हे जगाने पाहिले. तालिबानशी संबंधित एका पत्रकाराने हा फोटो समाजमाध्यमांवर टाकताना लिहिले, ‘भारताचा एक पठाण अफगाणिस्तानच्या एका पठाणाबरोबर पाकिस्तान हरल्यानंतर जल्लोष साजरा करत आहे!’ 

संपूर्ण मालिकेत अफगाणिस्तानचे समर्थन केल्याबद्दल पाकिस्तानच्या विरुद्ध भारताची प्रशंसा करणारे आणखीही ट्वीट समोर आले. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचे भांडे फुटले आहे, हे या घडीचे वास्तव होय. आपल्या देशाचे नुकसान करण्यामागे पाकिस्तानचा हात आहे, असे तिथल्या सामान्य माणसाला नेहमीच वाटत आले; परंतु आता तालिबानसुद्धा पाकिस्तानची चालबाजी समजून चुकला आहे. तालिबान्यांचे समर्थन करण्याचा पाकिस्तानने केवळ देखावा केला. पैशाच्या लोभापोटी पाकिस्तानने अमेरिकेला पुष्कळ मदत केली आहे. अफगाणिस्तान सोडून परत जात असताना अमेरिका बरेच दिवस पाकिस्तानमध्ये मुक्काम ठोकून होता आणि आजही कधी गरज पडली तर पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेलाच मदत करील. अफगाणींच्या लक्षात दुसरी एक गोष्ट आली आहे; ती म्हणजे जो पाकिस्तान आता भाकरीच्या तुकड्याला मोताद झाला आहे, तो दुसऱ्याला मदत काय करील? दुसरीकडे, भारताने त्या देशाची संसद उभी करून दिली; इतकेच नव्हे तर मोठमोठी धरणे बांधली, इस्पितळे उभारली;ज्यातून अफगाणिस्तानचा फायदा होईल अशी अनेक कामे केली. भारताने तालिबानला भले मान्यता दिली नसेल; परंतु सामान्य अफगाणी लोकांसाठी मदत, औषधे पाठवायला कधी मागेपुढे पाहिले नाही.

पाकिस्तान अफगाणच्या सीमेवरचा काही भाग हडप करू इच्छितो, हे तालिबानला ठाऊक आहे; म्हणूनच तालिबान पाकिस्तानमध्ये ‘तेहरिक ए तालिबान’ला मदत करत आहे. जेणेकरून पाकिस्तानला त्याची पायरी दाखवता येईल. इस्लामच्या नावावर अफगाणिस्तानला खिशात घालण्याची चाल पाकिस्तान खेळू पाहत होता; परंतु दोघांमधील शत्रुत्व वाढत गेले. शत्रुत्व या टप्प्यावर आले असताना अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवले तर जल्लोष होणे स्वाभाविक आहे. मी तर तालिबानला असे आवाहन करीन, ‘मुलींनाही खेळाच्या मैदानावर उतरू द्या. जीवनात पुढे जाण्याची संधी द्या. अफगाणी मुलीसुद्धा मुलांनी केली तशी कमाल करू शकतात.’

टॅग्स :ICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपPakistanपाकिस्तानTalibanतालिबान