शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

कोरोना साथ : दक्षता हवी, भय नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 01:11 IST

गेल्या महिन्यात चीनला भेट दिलेल्या नागरिकांना कुठलाही त्रास जाणवल्यास त्या नागरिकांचीही तातडीने तपासणी होणे गरजेचे आहे.

- डॉ. अमोल अन्नदाते(वैद्यकतज्ज्ञ)चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या साथीचे थैमान सुरू असल्याने आता ही साथ जगात पसरणार का? या साथीला जागतिक साथ म्हणजे पँडेमीकचे स्वरूप येणार का? भारताला याचा धोका किती? भारताची आरोग्य यंत्रणा कोरोनाचे संकट रोखण्यासाठी आणि ते आल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का? असे अनेक प्रश्न कोरोनाच्या निमित्ताने पडत आहेत.सध्या जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक साथ म्हणून घोषित केलेली नाही, पण भारत हा मुळातच संसर्गजन्य रोगांची जागतिक राजधानी असल्याने व भारत-चीन या दोन देशांमध्ये दळणवळणाचे प्रमाण जास्त असल्याने, ही साथ भारतात दाखल होऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी नागरी वाहतूक, विदेश आणि आरोग्य मंत्रालयाला समन्वयाने ही साथ रोखण्यासाठी कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आंतरराष्ट्रीय विमानतळावर तापमान आणि सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास असल्याची चौकशी करणे आवश्यक आहे. ताप व ही लक्षणे आढळल्यास त्यांना तातडीने आयसोलेशन म्हणजेच उपचारासाठी स्वतंत्र कक्षात बरे होईपर्यंत ठेवणे आवश्यक असते. हवाई वाहतूक सोडून चीन व नेपाळ सीमेवरील लष्करातही सैनिकांमध्ये ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने निदान आवश्यक आहे. गेल्या महिन्यात चीनला भेट दिलेल्या नागरिकांना कुठलाही त्रास जाणवल्यास त्या नागरिकांचीही तातडीने तपासणी होणे गरजेचे आहे.नवी साथ दाखल होते, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचे असते, देशातील पहिल्या काही केसेस ओळखणे आणि त्यांना वेगळे ठेवून त्यांचे उपचार करणे, पण आपल्या देशात अजून तत्पर निदानाची यंत्रणा सज्ज नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वायरॉलॉजी, पुणे सोडून आपल्याकडे अशा नव्या व्हायरसेस व साथीचे निदान करणारी यंत्रणा अपुरी आहे. साथ अजून दाखल झालेली नाही, पण ती झालीच, तर या पहिल्या केसेसच्या निदानाची तयारी असायला हवी. झिका व्हायरस भारतात दाखल झाला, तेव्हा २००७ साली ही माहिती शासकीय आरोग्य यंत्रणेने दडवून ठेवली. घबराट निर्माण होऊ नये, हा हेतू असला, तरी इतर यंत्रणेच्या सतर्कतेवर याचे दुष्परिणाम होतात.

यासाठीची तुलना २००३च्या सार्सशी केली जाते आहे, पण हा त्या इतका घातक नक्कीच नाही. सर्वसामान्यांनी लगेचच कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, पण चीनला प्रवास झाला असल्यास व श्वसनाची कुठलीही तक्रार असल्यास तपासणी करून घ्यायला हवी, तसेच चीनला प्रवासही टाळायला हवा. ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. न्युमोनिया व किडनी फेल्युअर हे कॉम्लिकेशन्स होऊ शकतात, पण साधा सर्दी खोकला झाला, तरी कोरोना असेल म्हणून घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. हा आजार टाळण्यासाठी मानवाकडून मानवाला होणाºया श्वसन मार्गाच्या आजाराला जी काळजी घ्यावी लागते, तीच घ्यायची आहे.

यात प्रामुख्याने बाहेरून आल्यावर आणि जेवण्याआधी कुठला साबण व पाण्याने हात धुणे, शिंक आल्यावर किंवा खोकताना तोंड, नाक, झाकणे, सर्दी, खोकला असलेल्यांनी इतरांपासून लांब राहणे आणि प्राण्यांशी संपर्क टाळणे हेच आहे, पण यात प्राण्यांशी संपर्क सोडून इतर गोष्टी कुठलीही साथ नसली, तरी करायच्याच आहेत. ही साथ चीनमधून इतर देशात पसरत असताना शक्यतो मांसाहारी, त्यातच न शिजविलेले मांसाहारी अन्न व समुद्रातील मांसाहारी अन्न म्हणजे मासे, प्रॉन्स खाणे टाळलेले बरे.

हा आजार व्हायरल असल्याने तो आपोआप बरा होणारा आहे. त्यावर इतर व्हायरल आजारांसारखे निश्चित असे काही उपचार नाहीत. कोरोनावर उपचारच नाहीत, अशी भीतिदायक वृत्तेही येत आहेत, पण याचा अर्थ हा आपोआप बरा होणारा आहे. सध्या चीनमध्ये मृत्यूचे प्रमाण तीन टक्के आहे, पण भारतात हे किती असेल, हे सध्या सांगता येणे कठीण आहे, पण अशा कुठल्याही व्हायरल आजारात काही काळानंतर मानवामध्ये हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची प्रतिकारशक्ती निर्माण होते व साथ हळूहळू ओसरू लागते. म्हणून उद्या ही साथ आलीच व कोरोनाची लागण झालीच, तर आपला मृत्यू निश्चित आहे, अशा भीतीत मुळीच राहू नये. आपली प्रतिकारशक्ती हेच अशा साथीमध्ये सगळ्यात मोठे हत्यार असते व त्यासाठी संतुलित आहार, व्यायाम व चांगली जीवनशैली हेच उत्तर आहे. कोरोनासाठी स्वाइन फ्लूप्रमाणे कुठलीही गोळी किंवा लस उपलब्ध नाही, तसेच फ्लूची लस घेऊन कोरोनापासून संरक्षण मिळू शकते, असा अपप्रचारही सुरू झाला, पण यात काही तथ्य नाही.अशा साथीत मास्कच्या वापराचा खूप अतिरेक होतो. मास्कचा वापर हा स्वत:च्या संरक्षणासाठी नव्हे, तर आपल्याकडून इतरांना जंतुसंसर्ग होऊ नये, म्हणून केला जातो. कोरोनाचा निश्चित किंवा संशयित रुग्णांसाठीच मास्कचा वापर योग्य आहे. स्वस्थ व्यक्तींनी मास्क वापरून काहीच उपयोग नाही, कारण जर जंतुसंसर्ग होणार असेल, तर तो मास्कच्या बाजूला खुल्या जागेतूनही होऊ शकतो. कोरोनासारख्या साथी म्हणजे घाबरलेल्या सर्वसामान्यांच्या फसवणुकीसाठी अनेकांना एक संधी असते. अमुक साबण वापरा, अमुक औषध घेऊन कोरोनाची शक्यता टाळा, समाज माध्यमांवरील घरगुती उपायांचे वायरल होणारे सल्ले यापासून सगळ्यांनी दूर राहायला हवे.

टॅग्स :corona virusकोरोना