कलेचे वर्गीकरण चुकीचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:35 AM2018-03-14T01:35:52+5:302018-03-14T01:35:52+5:30

सामान्य जनतेला प्रगती आणि विकास समजावण्यासोबतच समाजाचा सांस्कृतिक पाया भक्कम करण्याचे कार्य अभिजात दृश्य कलेतून होत असते.

The class of art is wrong | कलेचे वर्गीकरण चुकीचेच

कलेचे वर्गीकरण चुकीचेच

googlenewsNext


सामान्य जनतेला प्रगती आणि विकास समजावण्यासोबतच समाजाचा सांस्कृतिक पाया भक्कम करण्याचे कार्य अभिजात दृश्य कलेतून होत असते. कला ही रचनात्मक असेल तर समाज हा प्रगल्भ आणि क्रियाशील होतो, याचे लाखो दाखले आपल्याला इतिहासात सापडतात. कला मग ती देशातील असेल वा विदेशातील. रंजनाच्या मार्गाने उद्बोधन हाच तिचा मूळ उद्देश असतो आणि रंजन, उद्बोधन ही कुठल्याही समाजाची सार्वत्रिक निकड आहे. असे असताना ही आमची कला, ती त्यांची कला असे कलेचे वर्गीकरण करणे साफ चुकीचे आहे. परंतु दुर्दैवाने असे घडतेय. परिणामी कलेसारखा व्यापक विषय मोजक्या लोकांच्या रंजनाइतका मर्यादित व्हायला लागला आहे. याची लक्षवेधी प्रचिती नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या आॅरेंज सिटी डान्स फेस्टिव्हलमध्ये आली. महाराष्ट्र ललित कला निधी व सप्तकतर्फे आयोजित या दोन दिवसीय महोत्सवात पहिल्या दिवशी क्षितिजा बर्वे यांनी भरतनाट्यम तर शर्वरी जमेनिस हिने अप्रतिम कथ्थक सादर केले. दुसºया दिवसाच्या नृत्यजागरात आरुषी मुदगल या देखण्या नृत्यांगनेने ओडिसी व सोनिया परचुरे यांनी कथ्थक नृत्यातून तिहाई, गिनती, ततकारांचा निरनिराळ्या बंदिशींसोबत सुरेख मेळ घातला. या दोन दिवसात एकापेक्षा एक प्रतिभावान नृत्यांगना भारतीय नृत्य संस्कृतीचा श्रीमंत ठेवा असा चौफेर उधळत असताना त्याच्या परिसस्पर्शाने कलासमृद्ध होण्यासाठी सभागृहात मात्र पुरेसे प्रेक्षकच नव्हते. याचा अर्थ नागपुरात कलारसिक नाहीत किंवा या शहरात कलेला लोकाश्रय मिळत नाही, असे नाही. महोत्सवात रसिकांची वानवा जाणवली कारण दोन्ही दिवस जे नृत्य सादर होणार होते ते मराठी वा हिंदी नृत्यकलेशी संबंधित नव्हते. एक नृत्यांगना तेलगू भाषेतील गीतावर नृत्य करतेय तर दुसरी उडिया. या भाषा आपल्याला कळत नाही, त्या संस्कृतीशी आपण परिचित नाही, त्यामुळे तिकडे न फिरकलेलेच बरे, असा विचार करून अनेकांनी या महोत्सवाकडे पाठ फिरवली. पण, नृत्याचे विचाराल तर ते अप्रतिम झाले. सादरीकरणाच्या अंगाने कार्यक्रम यशस्वी झाला. पण, म्हणून रसिकांची अनुपस्थिती नजरेआड करता येणार नाही. इथे मराठमोळी लावणी वा गझलांचा कार्यक्रम असता तर पाय ठेवायला जागा मिळाली नसती. असाच उत्साह आम्ही दुसºया भाषेतील कलांविषयी का दाखवत नाहीत, कलेची पारंपरिक चौकट पार करून नवीन काही बघण्यासाठी आमचे मन का धजावत नाही, या महोत्सवात स्थानिक कलावंतांनीही भरतनाट्यम सादर केले. समोरच्या रिकाम्या खुर्च्या बघून त्यांच्या मनात पहिली प्रतिक्रिया काय उमटली असेल, असे अनेक प्रश्न कलेच्या या वर्गीकरणाने जन्मास घातले आहेत. यावरील उत्तर आम्ही कधी शोधणार की नाही?

Web Title: The class of art is wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.