शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

चीनची मग्रुरी आणि आपले मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:22 IST

चीनच्या लष्कराने उत्तराखंडच्या बाराहोती या चमोली जिल्ह्यातील भारतीय क्षेत्रात अतिक्रमण करून आपल्या वाढत्या आक्रमणखोरीचा नवा पुरावा पुढे केला आहे.

चीनच्या लष्कराने उत्तराखंडच्या बाराहोती या चमोली जिल्ह्यातील भारतीय क्षेत्रात अतिक्रमण करून आपल्या वाढत्या आक्रमणखोरीचा नवा पुरावा पुढे केला आहे. भारताचे संरक्षणविषयक सल्लागार अजित डोवल हे ब्रिक्सच्या बैठकीसाठी चीनला जाण्याच्या तयारीत असताना हे अतिक्रमण होणे ही चीनची आक्रमक वृत्ती भारताच्या लक्षात आणून देणारी बाब आहे. या भागात चिनी लष्कराने यापूर्वी अनेक आक्रमणे केली आहेत. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने या अतिक्रमणाची गंभीर दखल घेण्याचे टाळले असले तरी गेल्या १२ महिन्यात चीनने अशी ३००हून अधिक अतिक्रमणे या क्षेत्रात केली ही बाब गंभीर म्हणावी अशी नक्कीच आहे. बाराहोतीचे क्षेत्र हे दोन देशांतील वादाचे क्षेत्र ठरविण्यात आल्यामुळे त्याकडे भारताने बरीच वर्षे लक्ष दिले नाही. चीननेही आपले लष्कर तिकडे गेल्या अनेक वर्षांत पाठविले नाही. त्यामुळे त्याचे आताचे आक्रमण केवळ नवेच नाही तर त्या प्रदेशावरचा त्याचा अधिकार बजावून घेणारे आहे. आधीच डोकलाम या भूतानच्या सीमेवर भारत आणि चीनच्या फौजा समोरासमोर उभ्या आहेत. डोकलाम हे क्षेत्र भारताचे नाही. ते भूतानचे आहे. मात्र भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारताकडे असल्यामुळे त्यावर भारताची लष्करी पथके आता उभी आहेत. चीनचा दावा हा की डोकलामचा प्रदेश त्याचा आहे आणि त्यामुळे त्यातून भारतीय पथकांसारखीच भूतानची पथकेही मागे हटली पाहिजेत. अरुणाचल हे सबंध राज्य, उत्तराखंडचा बाराहोती हा प्रदेश, उत्तर प्रदेशचे सीमावर्ती भाग, नेपाळची दक्षिण सीमा याखेरीज लदाख हा काश्मीरच्या पूर्वेचा भाग यातील अनेक क्षेत्रांवर चीन आपला हक्क गेली अनेक वर्षे सांगत आहे. भारत आणि चीन यांच्यातील मॅकमहोन ही सीमारेषा त्याला मान्य नाही आणि या दोन देशांत नवी सीमारेषा आखण्याची मागणी तो करीत आहे. ती आखताना अर्थातच तो भारताच्या या सर्व प्रदेशांवर आपली मालकी सांगेल हे उघड आहे. चीनचा हा पवित्रा सीमावर्ती क्षेत्रातील भांडणांपुरता किंवा मर्यादित स्वरुपाचा आहे असे समजण्याचे कारण नाही. आठच दिवसांपूर्वी चीनच्या लष्कराने त्याचा ९०वा वर्धापनदिन साजरा केला. त्यात दहा हजार जवानांच्या संचलनासोबत सहाशे शस्त्रे त्याने जगाला दाखविली. या शस्त्रांत साडेतीनशेहून अधिक शस्त्रे नवी व जास्तीची संहारक असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आमचे लष्कर जगातल्या कोणत्याही लष्कराहून सामर्थ्यवान असून ते कोणाचाही पराभव करण्याची क्षमता राखणारे आहे, असे उद््गार त्या संचलनाच्यावेळी चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग यांनी काढले आहे. आपली ही ताकद भारतावरील अतिक्रमणातून तो देश आता दाखवू लागला आहे. पाकिस्तानने सूचना करताच आम्ही आमचे लष्कर काश्मिरात पाठवू अशी धमकी त्याने याआधीच भारताला दिली आहे. त्याचवेळी डोकलाममधून भारतीय पथके मागे गेली नाहीत तर आमचे लष्कर त्यांच्यावर आक्रमण करील असेही म्हटले आहे. आक्रमण करणे आणि आक्रमणाची धमकी देणे या दोन्ही गोष्टी आंतरराष्ट्रीय राजकारणात सारख्याच गंभीरपणे घेतल्या जातात. काश्मीरवरील आक्रमणाची धमकी नवी असली तरी ती भारताला जास्तीची चिंता करायला लावणारी आहे. उत्तराखंडमधील आताचे आक्रमण ही त्या आक्रमणाची नांदी म्हणूनही पाहता येणारी आहे. उत्तराखंडमध्ये आपली सेना पाठवून चीन काश्मीरला भारताकडून होणारा जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा थांबवू शकणार आहे. एका अर्थाने त्यामुळे काश्मीरचा जीवनमार्गच (लाईफलाईन) त्याला अडवून धरता येणार आहे. चीन हे उघडउघड व सांगूनसवरून करताना दिसत आहे. थोडक्यात अरुणाचलपासून काश्मीरपर्यंतची भारताची चार हजार कि.मी.ची सारी उत्तरसीमाच चीनच्या आक्रमणाच्या छायेत आहे. आश्चर्य याचे की या आक्रमणाची घ्यावी तशी दखल भारताचे संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि प्रत्यक्ष पंतप्रधानांचे कार्यालयही घेताना दिसत नाही. पाकिस्तानबाबत ही मंत्रालये जेवढी संवेदनशीलता दाखवितात तेवढी त्यांना याबाबत दाखविता न येणे हे त्याच्या मुत्सद्देगिरीचे लक्षण नाही. चीनच्या वाढलेल्या सामर्थ्याची भारताने धास्ती घेतल्याचे ते चिन्ह आहे. देशाच्या उत्तरसीमेवर आक्रमणाचे ढग असे जमले असताना देशाचे पंतप्रधान आसामचा दौरा करतात, परराष्ट्र मंत्री त्याविषयी काही एक न बोलता मौन पाळतात आणि लष्करातील वरिष्ठ अधिकारी मात्र त्यांना न शोभणारी राजकीय धमकीवजा भाषा वापरताना दिसतात तेव्हा ते सारे देशाच्या परराष्ट्र नीतीत व विशेषत: चीनबाबत वापरायच्या धोरणात एकवाक्यता नसल्याचे लक्षण ठरते. चीनने डोकलामवर लष्कर पाठविले, सिक्कीमच्या उत्तरसीमेवर सैन्य तैनात केले आणि काश्मिरात लष्कर पाठविण्याची सरळ धमकी भारताला दिली तरी त्यावर देशाचे पंतप्रधान त्यांच्या ‘मन की बात’ बोलताना कधी दिसले नाहीत. याच काळात भारताच्या कॅग या वरिष्ठ अधिकाºयाने भारतीय लष्कराजवळ युद्धात जेमतेम दहा दिवस कामी येईल एवढीच शस्त्रसामुग्री असल्याचे जाहीर केले आहे. हा प्रकारही आक्रमणाला निमंत्रण देणारा आहे. चीन धमक्या देतो, आमची माणसे आपले दुबळेपण सांगतात आणि सरकार मौन धारण करते हा देशालाच विस्मयात टाकणारा प्रकार आहे.