शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

जयजयकार कोणाचा अन् कशासाठी..?

By वसंत भोसले | Updated: February 20, 2020 01:13 IST

ज्येष्ठ विचारवंत आणि सांस्कृतिक संघर्षातील आघाडीवरचे प्रबोधनकार गोविंद पानसरे ऊर्फ आण्णा यांच्या हत्येला आज गुरुवारी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने आजची सामाजिक परिस्थिती आणि त्यांचे विचार या विषयी......

ज्येष्ठ विचारवंत आणि सांस्कृतिक संघर्षातील आघाडीवरचे प्रबोधनकार गोविंद पानसरे ऊर्फ आण्णा यांच्या हत्येला आज पाच वर्षे झाली. आपल्या समाजात प्रबोधनकारांची जशी परंपरा आहे, तशीच त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांचीसुद्धा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ साडेपाच महिन्यांनंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची राजधानी दिल्लीत हत्या झाली होती. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या दोन वर्षापूर्वीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली, तर नंतर डॉ. एम. एस. कलबुर्गी आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. या चारही हत्येची जबाबदारी कोणी स्वीकारली नाही. त्यांच्या हत्येमागे एकादा विचार असेलही, पण तो समाजाला पटेल याची अजिबात खात्री नसल्याची भीती त्यांनाच असणार आहे. या सर्व हत्या अजाणतेपणी हिंसाचारात झालेल्या नाहीत. ठरवून केल्या गेल्या आहेत. महात्मा गांधी यांची हत्या तर करण्यासाठी सलग चौदा वर्षे प्रयत्न चालू होते. अखेरीस ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांची हत्या करण्यात आली. असाच प्रयत्न राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयीही झाला होता.

महात्मा गांधी ते पानसरे अशी तुलना करण्याचे किंवा त्यातील साधर्म्य दाखविण्याचा उद्देश नाही. मात्र, एक निश्चित आहे की, प्रस्थापित समाजरचनेतील उणिवांवर बोट ठेवून तो सुधारण्याचा आग्रह धरणाऱ्यांवर जगभर हल्ले होत राहिले आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर शेणाचा मारा करणारे कोणी परकीय नव्हते, ते भारतीयच होते. आज सावित्रीबार्इंचा किंवा महात्मा फुले यांचा विचार स्वीकारूनच समाज पुढे जातो आहे. या परंपरेतील विभूतींवर हल्ले झाले, त्यांची हत्या झाली; मात्र त्यांचा पराभव झाला नाही. महात्मा गांधी आजही मेलेले नाहीत, ते विचाराने जिवंतच आहेत. राजर्षी शाहू महाराज यांना विरोध सहन करावा लागला. मात्र, त्यांचे विचार शंभर वर्षांनंतरही आदर्श म्हणून अंगीकारण्याचे उद्दिष्ट आपणास ठेवावेच लागते. त्यामुळे आपण सुधारक, प्रबोधनकार, राजर्षी, महात्मा असे त्यांना संबोधतो.

गोविंद पानसरे यांच्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या हत्येनंतर आज मागे वळून पाहताना काय वाटते आहे? ते नेहमीच सांगत राहिले की, आपण अनेक महापुरुषांचा, विभूतींचा, नायिकांचा, सेनानींचा जयजयकार करतो. तो कोणाचा आणि कशासाठी करतो? याचा विचार करा. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘छत्रपती शाहू महाराज की जय’ असे आपण म्हणतो तेव्हा हा कोणाचा आणि कशासाठी जयजयकार आहे, याचा विचार करा, असे ते सांगत असत. कारण ज्यांचा जयजयकार करतो ती माणसं युगप्रवर्तक होती. त्यांनी आपले आयुष्य मानवी कल्याणाप्रती वाहिलेले होते. त्याला समाज मान्यता मिळत गेलेली होती. यासाठीच त्यांनी ‘शिवाजी कोण होता’ असा एक साधा प्रश्न उपस्थित केला होता; मात्र त्या प्रश्नाचे उत्तर महान होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत असताना या जाणत्या राजाने समाजासाठी आपले आयुष्य कसे वेचले यामागे कोणता विचार, कृती, निर्णय, नैतिकता, नीतिधैर्य, आदी होते याचे मंथन झाले पाहिजे. तो अर्थ माहीत असेल तर जयजयकाराला अर्थ प्राप्त होतो, अन्यथा ती एक उत्सवी घोषणा होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचार माहीत नसेल, केवळ जयजयकाराच्या घोषणा देत राहिलो तर त्यांचा पराभवच करू शकतो. पराक्रम करता येणार नाही.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी का म्हटले असेल? त्याचा अर्थ काय? असा सवाल पानसरे उपस्थित करीत. यासाठी त्यांची प्रबोधनाची बैठक पक्की होती. अभ्यासाशिवाय तरणोपाय नाही, संदर्भाशिवाय माहितीला अर्थ नाही. ती कागदावर उतरून काढल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, ही त्रिसूत्री त्यांनी स्वीकारली होती. यासाठी त्यांनी अनेक मार्ग हाताळले. कोणत्याही विषयांचा अभ्यास केल्याशिवाय ते बोलत नसत. त्यांची पाच वर्षांपूर्वी हत्त्या झाली. आपल्यातून ते निघून जाण्याने काय झाले? ते ८२ वर्षांचे होते, आणखी आठ-दहा वर्षांनी नैसर्गिकदृष्ट्या जाणारच होते. तो निसर्गाचाही नियम आहे. मात्र, एक निश्चित की, समाजाची चौफेर धारणा सुधारण्यासाठी तो लोकशाहीवादी, सुधारणावादी आणि जाती-पातीच्या पलीकडे समतावादी असण्याची गरज आहे, असे ते मानत. त्यासाठीच त्यांची धडपड होती. त्यांच्या जगण्याचा तो अर्थ होता. काहींना तो मान्य नसेलही. त्यांनाही अनेकांचे विचार मान्य नव्हते म्हणून त्यांनी कोणाची हत्या केली नाही. अन्यथा, वैचारिक देवाण-घेवाण आणि संघर्ष याला अर्थच प्राप्त होत नाही. त्यांच्या जाण्याने आपण मागे यासाठी पडलो आहोत. महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जे आघाडीवरचे प्रबोधनकार होते त्यात त्यांचे नाव आघाडीवर होते. त्यासाठी मिळणा-या प्रत्येक संधीचा ते लाभ घेत असत.

गोविंद पानसरे यांनी चालविलेले काम पुढे चालत राहिलं; मात्र त्यांना ते कायम चालू ठेवण्याचा मानवी हक्क होता. तो हिरावून घेण्याचा अधिकार कोणाला नव्हता. त्यांची भारतीय राज्यघटनेवर अपार श्रद्धा होती. शिव-शाहू, फुले-आंबेडकर, मार्क्स-लेनिन यांच्या विचारांवर निष्ठा होती. या महापुरुषांनी जग बदलण्यासाठीच प्रयत्न केले. सर्वच यशस्वी झाले नसतील, पण मानवी इतिहास लिहिताना त्यांना वगळून तो पुरा होत नाही, हे देखील सत्य आहे. यासाठी त्यांच्या टोकदार प्रबोधन कार्याची दखल आपणास घ्यावीच लागेल.जागतिकीकरणावर तर ते म्हणत की, १९१७च्या रशियन क्रांतीमध्ये जागतिकीकरणाचे पैलू होते. जगातील कामगारांनो एक व्हा, हे जागतिकीकरणच होते, असे ते सांगत होते. जगाचे ज्ञान, आपल्या आजूबाजूच्या समाजाचे ज्ञान, आदी घेऊनच ते पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील होते. आपल्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्यावर प्रेम करणाºयांना अटी-नियमांचा भडिमार केला होता. वाढदिवसावर खर्च करताना एक निधी जमा करा, मला प्रबोधनाचे काम करायचे आहे, असे ते सांगत होते. काही लाख रुपये जमले. श्रमिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या कल्पनाही अफाट असायच्या. न वाचणाºयाला वाचते करणं, न लिहिणाºयाला लिहिते करणे आणि न ऐकणा-याला श्रोते बनविणे हा मंत्रच त्यांनी घालून दिला होता. अमृतमहोत्सवी निधीतून त्यांनी कोल्हापूर घडविणाºया कर्तृत्ववान व्यक्तींची चरित्रे लिहून घेण्याचा सपाटा लावला होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कोल्हापूर म्हणून त्यांचे अतोनात प्रेम होते. हे शहर कोणी-कोणी घडविले, त्याचा नावलौकिक कसा वाढत गेला. महाराष्ट्राला आणि देशाला कोल्हापूरने कोणती दिशा दिली याचा प्रेरणास्रोत काय आहे? असा तो शोध आहे. राजर्षी शाहू महाराज, डॉ. पी. सी. पाटील, राजाराम महाराज, आण्णासाहेब लठ्ठे, भाई माधवराव बागल, भास्करराव जाधव, वाय. पी. पोवार, एस. पी. पी. थोरात, डॉ. बाळकृष्ण, डॉ. जे. पी. नाईक, वि. स. खांडेकर, डॉ. आप्पासाहेब पवार, संतराम पाटील, बाबूराव पेंटर, केशवराव विचारे, दादासाहेब शिर्के, आदी अठ्ठावीस जणांची चरित्र मालिकाच त्यांनी प्रसिद्ध केली.

कोल्हापूरशिवाय महाराष्ट्राच्या जडणघडणीचाही विचार त्यांनी केला. महाराष्ट्राचा इतिहास मांडताना वर्तमानातील गंभीर समस्यांच्या आव्हानांचाही विचार केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती चळवळ, शेतकरी आंदोलने, नवे आर्थिक धोरण त्याचे परिणाम, महाराष्ट्राची कोरडवाहू शेती, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, आदी विषयांवर गंभीर लिखाण करून घेतले. महाराष्ट्रातील ऐंशी टक्के कोरडवाहू जमीन ही मोठी समस्या आहे, असे ते मानत होते. अवि पानसरे व्याख्यानमालाही वैशिष्ट्यपूर्ण बनविली. दरवर्षी सलग सात दिवस एक विषय निवडून वेगवेगळ्या मुद्द्यांद्वारे त्याचे विवेचन या व्याख्यानमालेत केले गेले. त्याच्या पुस्तिका काढण्याचा पायंडा त्यांनी पाडला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा सर्वांत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून ज्या ग्रंथाची नोंद करता येईल, तो लालजी पेंडसे यांचा आहे. त्याचे नाव आहे ‘महाराष्ट्राचे महामंथन’. या ग्रथांच्या पुनर्मुद्रणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. राजर्षी शाहू पुरस्कार मिळाल्यानंतर सत्काराला उत्तर देताना त्यांनी शाहू राजांच्या उपकाराची परतफेड म्हणून नव्या पिढीला शाहू सांगणार म्हणून शंभर भाषणे देण्याचा त्यांनी संकल्प केला. ओघवत्या शैलीची आणि संवादी वक्तृत्वकला अवगत केली असल्याने तरुणांना ‘राजर्षी शाहू - कार्य आणि विचार’ सांगताना ते कीर्तनकारांच्या परंपरेतील वाटत असायचे. त्यांचा हा संकल्प पूर्ण होण्यासाठी अद्याप सोळा व्याख्याने व्हायची होती. तेवढ्यात त्यांची हत्या झाली. एक तत्त्वचिंतनशील, अभ्यासू, इतिहासप्रेमी, प्रबोधनकाराचा शेवट झाला. त्यांचे हे कार्य आजही अखंडपणे चालू आहे. मात्र, त्यांनी या प्रबोधनामागे जी प्रेरणा उभी केली होती ती आज कोठेतरी हरविली आहे, असे वाटते. गोविंद पानसरे यांच्या हत्येने महाराष्ट्राने प्रबोधनाचा प्रेरणास्त्रोत गमावला आहे.

-वसंत भोसले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरे