शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
7
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
8
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
9
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
10
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
11
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
12
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
13
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
14
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
15
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
16
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
17
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
18
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
19
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
20
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

मानसिकता बदला

By admin | Updated: January 3, 2015 22:40 IST

पैसा जवळजवळ सर्व खरेदी-विक्र ीचे माध्यम असल्याने जीवनात विशेषत: आजच्या आपल्या जीवनात पैशास अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पैसा जवळजवळ सर्व खरेदी-विक्र ीचे माध्यम असल्याने जीवनात विशेषत: आजच्या आपल्या जीवनात पैशास अनन्यसाधारण महत्त्व आहे. दु:खे, कष्ट कमी करण्यासाठी पैसा उपयोगी ठरतो आणि मग अपार दु:खे स्वीकारीत, सुखे नाकारीत पैसे मिळविण्यासाठी माणसे कष्ट करीत राहतात. प्रयत्न व हुशारी एकत्र आल्यास पैसे भरपूर मिळतात. त्यात झटपट, कमी कष्टात अतिरिक्त नफा मिळविण्याची नशा मिसळली की इतरांबाबत बेपर्वाई येते व माणसे शोषक, फसवी, घातक बनू लागतात.जगण्यासाठी नीतिमत्ता आधार ठरते ती सामान्य माणसाला! शोषणावर आधारित श्रीमंतीसाठी व्यवहारात नीतिमत्ता बाजूला ठेवावी लागते. प्रसंगी निगरगट्ट, कठोर, क्रूरही व्हावे लागते. हे शतकानुशतके चालले आहे. पण गेल्या २0 वर्षांच्या चंगळवादाच्या वावटळीत मूल्ये हरवली. जेव्हा प्रयत्नाने पैसा मिळविणे जिकिरीचे होते, हवे तितके जमविता येत नाही, तशी संधी मिळत नाही, सर्व मार्ग खुंटतात, दिशा चुकतात तेव्हा माणसे पैसे मिळविण्याचे शॉर्टकट्स शोधतात. कायद्यामुळे चोरी, दरोडे, लूट यावर निर्बंध येतात. मग मार्ग उरतो गूढ विद्येचा, मंत्रतंत्राचा, नरबळीचा ! म्हणून मग माणसाच्या जगात झटकन विनाकष्टाने संपत्ती मिळवायचा एक जगन्मान्य मार्ग वापरला जातो, तो म्हणजे तांत्रिक-मांत्रिक जादू विद्येने संपत्ती मिळविणे. माणूस अडाणी असो की बुद्धिमान, असंस्कृत असो की सुसंस्कृत, त्याला गूढ अंधश्रद्धा, जादू-तंत्र-यातू-विद्येचे विलक्षण आकर्षण असते. युगानुयुगे हे आकर्षण जनमानसात अवैज्ञानिक विचार प्रसाराने दृढ केले गेले आहे. काहीही विचारले की विज्ञान कार्यकारणभाव शोधते. वस्तुनिष्ठ आकलन मांडते, नेमके काय, किती खरे ते सांगते. यात निरीक्षण, अनुमान, आकलन, प्रयोग, पुन:प्रत्यय व तात्कालिक सत्यशोधन असते. म्हणजे एवढे कष्ट घ्यावे लागतात. साध्या सरळ माणसाला यात काहीच आकर्षक वाटत नाही. प्रयत्नांती परमेश्वर, हेही कष्टप्रद असते. त्या मानाने जादू, मंत्र, तंत्र, पूजापाठ, उपास, उपासना सारे सोपे असते. दरिद्री, नाडलेल्या जिवाला वास्तवाकडून काहीच आशा नसतात. झटपट प्रश्न सोडविण्याची खात्री देणाऱ्या, विनाकष्ट भाग्य उजळविणाऱ्या, गुप्तधन शोधून देण्याचा दावा करणाऱ्या अवास्तव अंधश्रद्धा दारिद्र्याने त्रस्त, थकलेल्या (आणि श्रीमंतीने मस्त माजलेल्या) मनांना विलक्षण भुरळ घालतात. स्वत:चा विचार करताना अघोरी प्रकारांची भीती वाटते, इतरांविरुद्ध असे अघोरी उपाय वापरायला काडीमात्र वाईट वाटत नाही. स्वार्थासाठी प्राणी, पक्षी, निसर्ग, निर्जीव, सजीव साऱ्यांना लुटायला, मारायला माणसांना काहीच वाटत नाही. कुंभमेळ््यात जसे आजारी, अपंग, निरुपयोगी वृद्ध, मतिमंद, विधवा या साऱ्यांना ‘हरवून’ नातेवाईक ‘मोकळे’ होतात, तसे! प्राण्यांच्या बळीबद्दल जसे विशेष काही वाटत नाही, तसेच गुप्तधनाच्या लोभापुढे नरबळीसारखे भयंकर कृत्य करायला कुणाला काही वाटत नाही. स्वत:साठी आप्त मारले, तर या अंधश्रद्ध क्रूरकर्म्यांपैकी कुणीही कुरुक्षेत्रावरील अर्जुनाइतके भांबावत नाही. तिथेही त्या संहाराला उद्युक्त करणारा, प्रोत्साहन देणारा मांत्रिक तांत्रिक सज्ज असतोच. त्यात शोषून घ्यावे असे काहीच जिच्यापाशी उरलेले नाही, अशा वृद्ध आईचा बळी घेणे तिच्या स्वार्थांध मुलांना व्यावहारिक (??) वाटले असेल. शक्य तो परके माणूस बळीसाठी वापरले जाते. पण अंधश्रद्धेपोटी होणाऱ्या हत्येत हा विधिनिषेध नसतो. ही माणसे बेभान नसतात; उलट त्यांची कृत्ये लपूनछपून, फसवून, नीट डाव आखून होत असतात. ते संतापातील उतावीळ कृत्य नसते, तो जाणूनबुजून केलेला खून असतो. गावावरचे संकट टळावे म्हणून या देशात स्त्रियांना चेटकिणी, डाकिणी ठरवून त्यांची नग्नावस्थेत धिंड काढली जाते, सामूहिक बलात्कार केले जातात, तुकडे करून जाळले जाते. १९९0 ते २000 मध्ये या देशात असे जवळजवळ १,७00 तर २0१२ मध्ये ११७ गुन्हे नोंदविले गेले. शिक्षण, आर्थिक सुधारणा, विज्ञानप्रसार, कायदा व सुव्यवस्था या साऱ्यांना पुरून उरत ही भीषण अंधश्रद्ध कृत्ये चालूच आहेत. या पलीकडे कर्मकांडे, पूजापाठ, मंत्रजप याविषयी अशास्त्रीय प्रचार धर्म व अध्यात्माच्या नावाखाली सर्वत्र प्रच्छन्न चालू आहे.अंधश्रद्धा मनातील सारासार विवेकाला, संवेदनशीलतेला, माणुसकीला बधीर करतात. नातीगोती, प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य यांना स्वार्थ नष्ट करतो. माणसे अमानुष होतात आणि हत्याकांड घडते. यातील काही माणसे विकृत व्यक्तिमत्त्वाची, मनोविकारग्रस्त वा व्यसनी असतीलही; पण बरीचशी लोभापायी, सुडापोटी आंधळी झालेली असतात. भीषण हत्याकांड नसेल, पण सर्वसामान्य माणसांच्या घरात सुद्धा माणसे क्षुद्र स्वार्थापोटी घरातील जिवंत मातापित्याचा, मुलाबाळांचा, पतीपत्नीचा छळ करीत त्यांना जिवंतपणीच नरकयातना भोगावयास लावतात. लैंगिक छळ, हुंडाबळी, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार हे कुठल्या निरोगी, प्रगत समाजाचे लक्षण आहे? चंगळवादात विवेक हरवलेल्या माणसांकडून हिंसा घडल्यास त्यात आश्चर्य ते काय वाटावे?

प्रबोधन, संघर्ष व संविधानाचा आधार घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे विवेकी समाज निर्मितीचे काम निश्चितच जिकिरीचे आहे. कारण ही मूल्ये रुजविण्यासाठी समाजात जगण्याची, तगण्याची, कष्टाच्या योग्य मोबदल्याची, योग्य संधीची आश्वासक भूमी हवी. स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची शिंपण हवी. वैज्ञानिक दृष्टिकोनाची आरोग्यदायी किरणे हवीत. शोषणमुक्त पर्यावरण हवे. कायदा व सुव्यवस्थेची राखण हवी. प्रयत्नपूर्वक असा विवेकी समाज उभारला तर उद्याच्या समाजात अघोरीपणाला स्थान नसेल. आज हे स्वप्नरंजन वाटेल. पण आम्हा विवेकनिष्ठ कार्यकर्त्यांना हे स्वप्न वास्तवात उतरवण्याचे प्रयत्न करण्यातच जीवनाचे साफल्य सापडले आहे.अंधश्रद्धा निर्र्मूलनविषयक व्यापक कायदा महाराष्ट्र वगळता कोठेही अजूनही अस्तित्वात नाही. देशात ही उदासीनता समाजास घातक आहे. याबाबतीत राष्ट्रीय कायदा होऊन समान धोरण आखण्यात आले, तर या हत्या थांबतील.

 

-डॉ. प्रदीप पाटकर

(लेखक हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत़)