शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

उमेद आणि स्वप्नांच्या बागेत निराशेचा निवडुंग

By विजय दर्डा | Updated: January 3, 2022 07:46 IST

नववर्षरूपी फूल उमलले हे खरे !! मनात आशा-अपेक्षांचे, स्वप्नांचे गुच्छ आहेत; पण वास्तव नजरेआड करून कसे करावे या नव्या वर्षाचे स्वागत?

-  विजय दर्डा,चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

मावळत्या वर्षाच्या शेवटच्या रात्री झोपी जाताना मनाशी कितीतरी स्वप्ने बाळगली होती. घड्याळात तिन्ही काटे एकत्र आले तेव्हा मीही २०२२ चे मनापासून स्वागत केले. पारंपरिक धारणेनुसार आनंद साजरा केला. माझ्या घरात सर्व धर्मांच्या धारणांचे छोटे मंदिर आहे, त्या मंदिरात पूजाअर्चा केली. माझ्या स्वत:साठी, माझे कुटुंब आणि लोकमत परिवारासाठी, माझा देश आणि अवघ्या जगासाठी नवे वर्ष आनंद, सुखाचे जावो अशी प्रार्थना केली. नव्या वर्षाची नवी शुभंकर किरणे अंगावर पडतील अशी इच्छा मनी बाळगत निद्राधीन झालो. सकाळी जाग येईल तेव्हा एक काळीकुट्ट बातमी आपली वाट पाहत असेल याची बिछान्यात शिरताना कल्पनाही नव्हती.

कडाक्याच्या थंडीत सुख- समृद्धी-आरोग्यासाठी  प्रार्थना करणारे लोक माता वैष्णोदेवीच्या दरबारात पोहोचले होते. अशा अवेळी ज्याची भीती असते तेच घडले. रात्र उतरणीला लागली होती तेवढ्यात अचानक गलका उठला आणि गर्दीत चेंगराचेंगरी झाली. त्यात १२ भाविकांचा मृत्यू ओढवला. अनेक जण जखमी झाले. कित्येक कुटुंबांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. धार्मिकस्थळी चेंगराचेंगरी होऊन जीवितहानी होण्याची ही  अर्थातच पहिली वेळ नाही. गेल्याच वर्षी २१ एप्रिलला तमिळनाडूतील करुप्पास्वामी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ७ लोक मरण पावले होते. सबरीमाला मंदिरात २०११ साली अशाच घटनेत १०६ भाविकांना प्राण गमवावे लागले होते. त्याच घटनेत शंभरावर लोक जखमी झाले. हिमाचल प्रदेशातील नयना देवी मंदिरात ३ ऑगस्ट २००७ रोजी चेंगरून १४५ लोक मरण पावले. जोधपूरच्या चामुंडादेवी मंदिरात १२० लोक मरण पावले तर, २००५ साली महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात मांढरदेवी मंदिराच्या उतारावर चेंगराचेंगरी होऊन तब्बल ३५० लोक मरण पावले. जवळपास सर्वच राज्यांमध्ये या अशा घटना घडलेल्या आहेत.

- अशा घटनांची यादीच करायची तर, खूप मोठी होईल. पण, अशा घटनांना जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे. अशा दुर्घटना काही अकस्मात होत नसतात. हा देश श्रद्धेवर टिकून आहे. या भक्तिभावाच्या देशात लोकांचा देवाप्रति समर्पणभाव, श्रद्धा आहे आणि अंधश्रद्धाही आहे. देवाच्या दर्शनासाठी विशिष्ट दिवशी लोकांची गर्दी उसळणार, प्रत्येकालाच दर्शनाची घाई असणार, दर्शन झाल्यावरही देवासमोर जास्तीत जास्त रेंगाळायला मिळावे असे त्यातल्या बहुतेकांना वाटणार, हे प्रशासनाला माहिती असतेच. म्हणजे, असले पाहिजे. या समूह श्रद्धेचे जबाबदार, उचित नियोजन करणे ही प्रशासनाची जबाबदारी नव्हे काय?, गर्दीत चेंगरुन माणसे मरावीत हे प्रशासनाचे अपयश नव्हे तर, दुसरे काय आहे?

वैष्णोदेवीसारख्या संस्थानात तर, अनेक बडे अधिकारी असतात. लोक चिठ्ठी घेऊन डोंगरावर जात असतील तर, आवरता न येणारी गर्दी झालीच कशी?, कोणाला तरी याची जबाबदारी घ्यावीच लागेल. लोक मनमानी करणारच. अराजक माजवणे हा गर्दीचा स्वभाव असतो, म्हणून तर, प्रशासनाला प्रश्न विचारायचे!रोज वर्तमानपत्र हाती आले की, अनेक दुर्घटनांच्या बातम्या समोर येतात. हल्ली अनेकदा मला वाटते लॉकडाऊन होता, तेच बरे होते. वरात घेऊन येणाऱ्या लोकांच्या मनात किती आनंद, उत्साह असतो पण, रस्त्यावर दुर्घटना घडते आणि क्षणात मृतदेहांचा ढीग लागतो. एका रात्रीतून हे बदलता येणार नाही, हे मलाही मान्य आहे. आपल्या देशात वाहन चालवण्याचे परवाने कसे दिले जातात हे आपण सगळेच जाणतो. रस्त्याने कसे चालावे याची काही शिस्त नाही. बालपणापासून ते शिकवलेच जात नाही. दुसऱ्याला रस्ता कसा द्यावा हे कोणी सांगत नाही. ‘नागरी शहाणपण’ नावाची काही गोष्टच नाही. बहुतेक तरुण रस्त्यावर दुचाकी बेफाम चालवतात. त्यातले काही घरी न पोहोचता त्यांच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचते. यावर लगाम घालता येणार नाही का?

नव्या वर्षात एक बातमी मात्र जरा दिलाशाची आली. महामारीपासून धडा घेत सरकारने आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा भक्कम करायचे ठरवले आहे. दीडशेहून अधिक विद्यापीठे सुरू केली जातील अशीही बातमी आहे. डॉक्टर्सची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. याचे स्वागत करताना एक विचार  असाही केला पाहिजे, की अधिकाधिक डॉक्टर्स धंदेवाईक का होऊ लागले आहेत? सेवाभावी, संवेदनशील डॉक्टर मित्रांशी मी बोलतो तेव्हा ते सांगतात, जोवर वैद्यकीय शिक्षणाच्या जागा विकल्या जातील तोवर हे असेच होत राहणार. तरुण मुले कोट्यवधी रुपये खर्चून डॉक्टर होणार, नंतर यंत्रसामग्रीसाठी आणखी कोट्यवधी गुंतवणार; तर त्यांच्याकडून ‘संवेदनशील’ राहण्याची अपेक्षा कशी करता येईल? वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या जागांची विक्री होते हे सरकारला ठाऊक नाही का? खरे तर वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या जागा वाढवल्या पाहिजेत. 

गरजेनुसार दोन ते पाच वर्षांचे वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करून देशाला जास्तीत जास्त डॉक्टर्स पुरवले पाहिजेत. आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे ते मोठ्या प्रमाणावर वापरून परिस्थिती बदलता येऊ शकते. रुग्णांची लूट कमी होऊ शकते. सरकारने योग्य वेळी निर्णय घेऊन पावले टाकली, निर्धारपूर्वक चांगली धोरणे राबवली तर परिस्थितीत नक्कीच बदल होईल.आणि हो, या देशात ३० ते ४० टक्के लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही, राहायला घर, पुरेसे कपडे नाहीत हेही विसरू नका. एकीकडे फोर्ब्सच्या यादीतल्या भारतीय श्रीमंतांची संख्या वाढते आहे, त्यांच्याकडील संपत्तीचे आकडेही चढत्या श्रेणीने वाढत आहेत. देशातल्या मध्यमवर्गाचा आकार वाढतो आहे हेही खरे असले, तरी त्याखालच्या आर्थिक स्तरातला वर्ग मात्र आजही गदळ, अनारोग्यकारक झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. झोपडे कसले, ही माणसे नरकातच राहतात म्हटले तरी चालेल अशी स्थिती आहे. या विषम स्थितीतून आपल्या देशवासीयांना बाहेर काढले पाहिजे.

आणखी एक अस्वस्थ करणारा, संताप आणणारा विरोधाभास सध्या आपल्या आसपास दिसतो आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवून धरण्यासाठी लग्नसमारंभात ५० पेक्षा जास्त आणि अंत्यसंस्काराला २० पेक्षा अधिक लोक जमवू नका, सर्वांनी सतत मास्क वापरा हे सरकार लोकांच्या कानीकपाळी ओरडून सांगते आहे; आणि आमदाराच्या घरच्या लग्नाला मात्र १० - २० हजार लोकांची गर्दी मोठ्या डामडौलात जमते. त्या गर्दीची छायाचित्रे सर्वत्र फिरत राहतात. एकीकडे ओमायक्रॉन देशात मोठ्या प्रमाणावर, वेगाने  पसरतो आहे आणि नेत्यांच्या निवडणूक सभांना मात्र लाखोंची गर्दी जमवली जाते आहे.

या महाप्रचंड गर्दीत साधा मास्कही कोणी लावत नाही; दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतराची तर गोष्टच विसरा! अशा स्थितीत कितीही उत्साहात नव्या वर्षाचे आगतस्वागत करावे म्हटले, तरी अस्वस्थ करणारे वास्तव नजरेआड कसे होणार?पण हेही खरे, की आशा हाच माणसांचा आधार  असतो. मावळते वर्ष सरत असताना एक कविता माझ्या वाचनात आली... कोणी लिहिली आहे नकळे; पण या शब्दांमधल्या भावना मात्र माझ्याच मनातल्या आहेत....

नए साल का, नया सवेरा,जब, अंबर से धरती पर उतरे,तब शांती, प्रेम की पंखुड़ियां,धरती के कण-कण पर बिखरे,चिड़ियों के कलरव गान के संग,मानवता की शुरू कहानी हो,फिर न किसी का लहू बहे,ना किसी आंख में पानी हो,शबनम की सतरंगी बूंदे, बरसे घर-घर द्वार,मिटे गरीबी भुखमरी, नफरत की दीवार,ठंडी-ठंडी पवन खोल दे, समरसता के द्वार,सत्य, अहिंसा और प्रेम, सीखे सारा संसार,सूरज की ऊर्जा में किरणें,अंतरमन का तम हर ले,नई सोंच के नवप्रभात से,घर घर मंगल दीप जले...