- एस. एस. मंथा(शिक्षण आणि व्यवस्थापन तज्ज्ञ)
आकाशात उडणारे ड्रोन पाहिले की आपल्यापैकी अनेकांची बोटे तोंडात जातात. उडते ड्रोन आपल्या घरी पिझ्झा आणून पोहोचवील अशी कल्पनाही कोणी पाच वर्षांपूर्वी केली नसेल. ते आज घडते आहे. ड्रोन अनेक ठिकाणी उपयोगात आणली जातात. दुर्घटनास्थळी शोधकार्यात, सीमेवरून घुसखोरी, हवाई फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, बांधकाम क्षेत्रातील फोटोग्राफी, नकाशे, सर्वेक्षणे, मालमत्तेची तपासणी, भारवहन, शेतीत कीटक नियंत्रण, पिकांवर फवारणी, वस्तू पोहोचविणे याव्यतिरिक्त लष्करी कामातही ड्रोन वापरतात. प्रत्यक्षात ड्रोन हे मनुष्यविरहित हवाई वाहन आहे. त्यात कोणी नसते. दुरून नियंत्रित करता येणारा तो यंत्रमानव आहे. सेन्सर्सच्या समुच्चयाने बांधलेली बुद्धिमत्ता आणि संगणकातील आज्ञावलींनी नियंत्रित तंत्रज्ञान म्हणजे यंत्रमानव. (रोबो) ड्रोनच्या प्रणालीत बसविलेल्या सॉफ्टवेअरच्या नियंत्रणानुसार ड्रोन उडते. त्याला सेन्सर्स आणि जीपीएसची आवश्यकता असते. काही ड्रोन्स लांबून संचालित केले जातात. नियंत्रित उंची, वेग यासह ते दीर्घ काळ उडू शकतात. याचा अर्थ विमान उड्डाणाचे सर्व नियम याला लागू व्हायला हवेत. हे तंत्रज्ञान नवे आहे का? - असे पहिले चालकविरहित वाहन ब्रिटिश आणि अमेरिकनांनी पहिल्या महायुद्धाच्या वेळी १९१७ साली तयार केले होते. ब्रिटिशांनी आधी छोट्या रेडिओ नियंत्रित वाहनाची चाचणी घेतली. अमेरिकनांनी नंतर कॅटरिंग बग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टॉर्पेडोची चाचणी घेतली. ही दोन्ही वाहने युद्धात वापरली. जुन्या इंग्रजीत मधमाशीच्या नराला ड्रोन संबोधत. लक्ष्यभेदाचा सराव आणि प्रशिक्षणासाठी रेडिओ नियंत्रित असे हे मनुष्यविरहित वाहन १९३५ मध्ये ब्रिटनमध्ये वापरले जाऊ लागल्याने प्रचलित झाले. अमेरिकनांनी ते प्रथम व्हिएतनाम युद्धात वापरले. निश्चित लक्ष्यावर क्षेपणास्त्र सोडणे, पत्रके टाकणे यासाठी त्याचा उपयोग झाला. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर ड्रोनचा वापर लक्षणीयरीत्या वाढला. ड्रोन हा रोटर्स, प्रोपेलर्स आणि सामान्य विमानासारखा सांगाडा असतो. हा सांगाडा हलका असल्याने तो दुसरे वजन नेऊ शकतो. सुरू करणे, हवे तिकडे नेणे आणि उतरविणे यासाठी त्याला रिमोट कंट्रोल लागतो. ॲक्सलोमीटर, अल्टिमीटर डिस्टन्स सेन्सर, अल्ट्रासॉनिक, लेझर, लिडार, टाइम ऑफ फ्लाइट सेन्सर, थर्मल सेन्सर, व्हिज्युअल सेन्सर, केमिकल सेन्सर, स्टॅबिलायझेशन अँड ओरिएंटेशन सेन्सर आणि टक्कर होणार नाही याची काळजी घेणारे सेन्सर यासारख्या बहुमुखी सेन्सर्सद्वारे पाठविलेल्या वायफाय किंवा रेडिओ लहरींमार्फत हे रिमोट ड्रोनशी संपर्क साधते. सूक्ष्म बदल नियंत्रित करणारे बॅरोमीटर, मॅग्नेटोमीटर गायरोस्कोपही त्यात असतात. अलीकडे ड्रोन प्रतिकूल स्थितीतही काम करतात. दीर्घ काळ उडण्यासाठी सौर ऊर्जेवर चालतात.