संपूर्ण जगात केवळ भारतच कोरोना प्रतिबंधक दोन लसी जगाला देऊ शकला. लसींच्या उत्पादनात आपण दादा आहोत. माणुसकीसोबतच परराष्ट्र धाेरण व मुत्सद्देगिरी म्हणूनही आशिया खंडातील शेजारी देश तसेच इतरांना आपण मदत करू शकलो, या बाबी किती समाधानाच्या व देशाप्रति अभिमानाने ऊर भरून येण्यासारख्या आहेत ना. नक्कीच ! ...आणि त्याचे कारण आहे गेल्या काही वर्षांमध्ये आपण या क्षेत्रात सतत संशाेधन व विकासावर केंद्रित केलेले लक्ष. जग हादरवून टाकणारे असे एखादे संकट भविष्यात येईल, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. पण, तसे झाले आणि या क्षेत्रातील भारताची कामगिरी, दादागिरी जगाला अचंबित करणारी ठरली.हा अभिमानाचा क्षण यासाठी आपण आठवायला हवा की उद्या सोमवारी या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जातोय. वित्तमंत्री निर्मला सीतारामन मांडणार असलेल्या या अंदाजपत्रकाची नोंद निश्चितपणे देशाच्या इतिहासात कसोटीच्या क्षणी मांडल्या जाणाऱ्या संकल्पात होईल. आव्हान मोठे आहे. तशीच अपेक्षाही खूप मोठी आहे. विशेषत: विषाणू संक्रमणाचे महासंकट, त्याचा सामना करताना कस लागलेली आरोग्य व्यवस्था, अडचणीत आलेली उपजीविका आणि सोबतच एकविसाव्या शतकातील आव्हाने, पायाभूत सुविधा, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती अशा बऱ्याच अपेक्षांचा डोंगर, नव्हे हिमालयच वित्तमंत्री, तसेच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारपुढे आहे. तरीही ‘लोकमत’ने केलेल्या एका ऑनलाइन सर्वेक्षणात नागरिकांनी खूपच माफक अपेक्षा मांडली आहे. किंबहुना केंद्रीय अर्थसंकल्पाप्रति लोक उदासीन आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत काही आमूलाग्र सुधारणा, खासकरून भविष्यातील अशा महामारीच्या संकटाचा विचार करता तिचे बळकटीकरण आणि विषाणू संक्रमणाच्या महासंकटामुळे अडचणीत आलेली उपजीविका, लघु व मध्यमवर्गीयांच्या हातून निसटून गेलेली पोट भरण्याची साधने या पृष्ठभूमीवर, या वर्गाला करप्रणाली तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने काही दिलासा, अशा या प्रातिनिधिक स्वरूपाच्या माफक अपेक्षा आहेत. विषाणू संसर्गामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रारंभी केंद्र सरकारने जाहीर केलेले वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज, अन्नधान्य वितरण व अन्य मार्गाने लॉकडाऊनग्रस्त जनतेला केलेली मदत व तरीही लाखो स्थलांतरित मजुरांच्या नशिबी आलेली पायपीट, जीवघेण्या हालअपेष्टा, नोकऱ्या जाणे, कोट्यवधींवर बेरोजगाराचे संकट, लघु व मध्यमवर्गीयांचे हाल, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा अर्थसंकल्पात काही प्राधान्यक्रम अपेक्षित असलाच तर तो रोजगार, आरोग्य, शिक्षण हाच असेल. किंबहुना तोच असायला हवा. आर्थिक पाहणी अहवालातही या गरजेचे प्रतिबिंब उमटले आहे.
Budget 2021: केंद्रीय अर्थसंकल्पाकडून हिमालयाएवढ्या अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 04:16 IST