शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताची तहान...!

By admin | Updated: March 3, 2017 23:52 IST

जनसंघाचे एक पूर्वाध्यक्ष बलराज मधोक यांनी देशातील एका धर्मांध संघटनेविषयी तसे आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.

भारतमातेला रक्ताची तहान लागली आहे काय? जनसंघाचे एक पूर्वाध्यक्ष बलराज मधोक यांनी देशातील एका धर्मांध संघटनेविषयी तसे आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. मात्र एखाद्या एकारलेल्या संघटनेची बरोबरी भारतमातेशी कशी करता येईल? आपल्या संघटनेलाच देश, देव, माता-पिता, गुरु व तसेच काही समजणाऱ्यांच्या मनात आपल्या संघटनेचे असे व्यसन भारतमातेलाही असावे असे येणे व ते पूर्ण करण्याची त्याने जाहीर प्रतिज्ञा करणे हे त्याच्या वेडात बसणारे असते की आंधळ्या भक्तिभावात? कोणतेही एकारलेपण वेडसरपणाच्या जवळ जाणारेच असते अशी मानसशास्त्राचीही धारणा आहे. त्यामुळे संघाचे पुढारी व प्रचारप्रमुख डॉ. कुंदन चंद्रावत यांनी उज्जैन येथील एका सूडसभेत ‘केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे शीर कापून आणणाऱ्याला एक कोटी रुपयांची दक्षिणा देण्याचा’ संकल्प जाहीर केला असेल आणि त्याच वेळी ‘भारतमातेला तीन लक्ष मानवी शिरे अर्पण करण्याची’ प्रतिज्ञा केली असेल तर तो त्यांना आलेला वेडाचा झटका समजायचा की त्यांच्या भक्तिभावनेला हिंसाचाराची शिंगे फुटली आहेत असे म्हणायचे? मध्ययुगात धर्माच्या नावावर लढाईला निघालेले राजे वा बादशाह अशा गर्जना करून शत्रूंच्या मनात धडकी भरविण्याचा प्रयत्न करीत. त्यांच्यातल्या कोणत्या राजाने वा बादशाहने किती शिरांचे मनोरे रचले याच्या कहाण्या इतिहासात आहेतही. अलीकडे अशा कहाण्या तालिबान, अल-कायदा, बोकोहराम किंवा इसिससारख्या धर्मांध संघटनांच्या नावावर आहेत. मात्र त्यांनी कापलेल्या शिरांची संख्या लाखांच्या आसपास जाताना अजून दिसली नाही. या पार्श्वभूमीवर केरळवर हल्ला चढवून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचे मस्तक धडावेगळे करण्याची आणि त्यासोबत आणखी तीन लक्ष मानवी मस्तके भारतमातेला अर्पण करण्याची चंद्रावत व त्यांच्या पक्षाची तयारी धारदार आणि मोठी आहे हे आपण मान्य केले पाहिजे. अहिंसा ही जशी मानवी प्रवृत्ती आहे तशी हिंसा हीदेखील मानवी मनाचीच एक कडा आहे. हिटलरने मारलेले दोन कोटी, स्टॅलिनने जीव घेतलेले पाच कोटी आणि माओने बळी घेतलेले सात कोटी हे सारे या कडेचेच शिकार आहेत. (ही माणसे त्यांनी युद्धात मारली नसून त्यांना विरोध केला म्हणून मारली गेली आहेत हे लक्षात घेतले की चंद्रावत आणि त्यांचे घोषणाबाज सहकारी या साऱ्यांच्या मानसिकतेचे साम्य सहज कळून चुकते.) शीरसम्राट चंद्रावत यांनी उज्जैनच्या ज्या सभेत ही भीषण प्रतिज्ञा केली तीत भाजपाचे खासदार चिंतामणी मालवीय आणि आमदार मोहन यादव हेही उपस्थित होते. केरळात काही संघ कार्यकर्त्यांचे अलीकडे जे खून झाले त्याच्या निषेध सभेत हे पुढारी बोलत होते. खून वा बलात्कारासारखे गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा करणे हे कायदा व सरकारचे काम आहे. मात्र २०१४च्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाल्यापासून ते अधिकार आपल्याकडे आले आहेत असा समज करून घेतलेल्या काही अतिरिक्त शहाण्यांमध्ये चंद्रावतसारखी माणसे आहेत. तशीही एका व्यक्तीच्या खुनासाठी साऱ्या समाजाला कापून काढणे वा शिक्षा ठोठावणे ही परंपरा आपल्यातही आहे. गांधीजींच्या खुनानंतर महाराष्ट्रातील शेकडो ब्राह्मणांची घरे जाळली गेली. इंदिरा गांधींवर कोणा शिखाने गोळ्या झाडल्या म्हणून चार हजारांवर शिखांची दिल्लीत व अन्यत्र जाळून हत्त्या केली गेली. गोध्रा स्टेशनवर ५६ हिंदू जाळले तेव्हा त्याचा सूड म्हणून गुजरातमध्ये दोन हजारांवर मुसलमानांची कत्तल केली गेली. माणसांचा आणि विचारांचा राग समाजावर काढायचा ही, सामान्यपणे ज्यांच्याकडे सत्ता वा संख्याबळ असते त्यांची वृत्ती आहे. त्यातूनच चंद्रावतासारखे राक्षसी लोक पुढे येतात. त्यातून राजकीय पक्षांजवळ एक छानशी पळवाटही असते. ती त्यांना या चंद्रावतांसारख्यांपासून वाचवीत असते. ‘ते एकट्या चंद्रावतांचे म्हणणे आहे. त्याचा आमच्याशी संबंध नाही’, असे म्हणून भाजपा व संघाला स्वत:ची सुटका करून घेता येते. तरीही एक गोष्ट येथे नोंदविणे आवश्यक आणि वैध आहे. ‘एखाद्याचा शिरच्छेद करा’ असे म्हणणे हाच मुळी कायद्यानुसार गुन्हा आहे. ही हत्त्येची प्रत्यक्ष चिथावणी आहे आणि त्या चिथावणीला एक कोटी रुपयांच्या बक्षिसाची जोड असणे ही बाब त्या खुनाचा इरादा मजबूत असल्याचे सांगणारी आहे. कोणत्याही लोकशाही देशात असे बोलणाऱ्याला तत्काळ जेरबंद करण्यात आले असते. पण भारतात असे सारे चालतच असते. कुणाची जीभ कापा, कुणाचे डोळे काढा, कुणाची लेखणी थांबविण्यासाठी त्याचा खून पाडा यासारख्या गोष्टी म्हणणे आणि त्या प्रत्यक्षात करणे हे आता भारतमातेच्या अंगवळणी पडलेले प्रकरण आहे. त्यामुळे चंद्रावताला उद्या कोणी धर्मवीर वा राष्ट्रवीर म्हणून गौरविले आणि त्याला त्याच्या विचारसरणीच्या संरक्षक सेनापतीची उपमा दिली तर त्याचे आपणही आश्चर्य वाटू देण्याचे कारण नाही. तरीही शिल्लक राहणारा प्रश्न आपल्या राजकारणाला जडलेली रक्ताची चटक कधी संपेल हा आहे. त्यातून ही चटक भारतमातेच्या पवित्र नावाला जोडून सांगितली जात असेल तर तो राष्ट्रीय अपराध होतो की नाही? मोदींचे सरकार या चंद्रावताच्या मुसक्या आवळते की त्याचा संकल्प तसाच जिवंत राहू देते हे यापुढे आपण पहायचे आहे.