शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

भैरप्पा, ‘सेंटर’ला कशाला? सरळ ‘उजवे’च व्हा की !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 05:34 IST

भैरप्पा सांगतात तसे ते उजवे नाहीत, हे खरे नाही. ‘राइट’ असलो, तरी ‘सेंटर’ला उभे आहोत, असा फसवा पवित्रा घेण्याऐवजी भैरप्पांनी राजरोसपणे उजव्या विंगेत जावे.

- श्रीमंत माने,  कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने परवा नागपुरात ख्यातनाम कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांची मुलाखत त्यांच्या बहुतेक लेखनकृतींचा मराठी अनुवाद करणाऱ्या उमा कुलकर्णी यांनी घेतली. नव्वदी ओलांडलेले भैरप्पा खूप दिवसांनी येताहेत, बोलताहेत म्हटल्यावर अनेकांना ते नवे काय सांगतात, याबद्दल उत्सुकता होती. ते बोलले भरभरून, पण त्यात फारसे नवे काही नव्हते. डाव्या-उजव्यांची जुनी व्याख्या पुन्हा सांगताना त्यांनी डाव्यांवर सडकून टीका केली. सगळे डावे स्वत:ला उदारमतवादी समजतात; पण तसे ते नसतात. आपण स्वत: मात्र डावे, उजवे असे काही नाही आहोत. फार तर मानवतावादी म्हणू शकता, असे थोडे या वैचारिक रिंगणाच्या परिघावर त्यांनी स्वत:ला ठेवले. डाव्यांना तडाखे लावताना त्यांनी गिरीश कर्नाड यांचा उल्लेख केला. अनेकांना भैरप्पांचे कर्नाडांशी, गेला बाजार यू. आर. अनंतमूर्ती यांच्याशी रंगलेले जुने वाद त्यामुळे आठवले. अनंतमूर्ती व भैरप्पा एका वयाचे. एखाद दुसरे वर्ष इकडेतिकडे. कर्नाड दोघांपेक्षा धाकटे. भैरप्पांनी शाळा सोडून भारतभ्रमंती केली, देश समजून घेतला व नंतर औपचारिक शिक्षण पूर्ण केले. बडोद्यात ते तत्त्वज्ञान शिकले, तर कर्नाडांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास ऑक्सफर्डमध्ये केला. या शैक्षणिक पृष्ठभूमीचे प्रतिबिंब दोघांच्या लिखाणात उमटले. कर्नाड पक्के वैश्विक, तर भैरप्पांच्या लिखाणाचा पाया भारतीयत्वाचा व त्यातही अधिक हिंदुत्वाचा. कर्नाड पक्के धर्मनिरपेक्ष, अंतर्बाह्य पुरोगामी. गौरी लंकेशच्या पहिल्या पुण्यतिथीला आजारी असतानाही ‘मी टू अर्बन नक्सल’ अशी पाटी गळ्यात लावून त्यांनी जाहीर निषेध केला. नेहरूंच्या समाजवादाचा त्यांच्यावर प्रभाव. भैरप्पा मात्र प्राचीन भारतीय दार्शनिक परंपरा पुढे नेणारे. नेहरूंवर त्यांचा राग. सरदार पटेलांचे त्यांना कौतुक. विशेषत: टिपू सुलतानच्या मुद्द्यावर भैरप्पा व कर्नाड ही दोन टोके. कर्नाड टिपूला धर्मनिरपेक्ष मानायचे, तर भैरप्पा त्याला कट्टर धार्मिक किंबहुना अतिरेकी मानतात. भारताच्या इस्लामीकरणाची सुरुवात टिपूने केली, हे ते नागपुरातही बोलले. असेच मतभेद अनंतमूर्ती व भैरप्पा यांच्यात होते. अनंतमूर्तींनी भाराभर लिहिले नाही. जे लिहिले ते जागतिक दर्जाचे. भैरप्पांना हिंदू धर्म अन् कादंबरीलेखन दोन्हीही समजलेले नाही, अशी घणाघाती टीका अनंतमूर्तींनी केली होती. तेव्हा भैरप्पांचे समर्थक अनंतमूर्ती यांच्यावर प्रामुख्याने त्यांच्याएवढे लिहा व मग बोला, या मुद्द्यावर तुटून पडले होते. एका बाजूला भैरप्पा व दुसऱ्या बाजूला कर्नाड व अनंतमूर्ती असा वैचारिक संघर्ष किमान चाळीस-पंचेचाळीस वर्षे चालला. गिरीश कर्नाड यांनी त्यांचा पहिला सिनेमा ‘संसार’ अनंतमूर्तींच्या कादंबरीवर बनविला, तर दुसरा ‘वंशवृक्ष’ भैरप्पांच्या कादंबरीवर. ‘वंशवृक्ष’साठी त्यांना सत्तरच्या दशकात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचवेळी गोहत्याबंदीच्या मुद्द्यावर दोघांमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली. भैरप्पांनी लिखाणात गोहत्याबंदीचे समर्थन केलेले, तर कर्नाड यांनी त्यावर चित्रपट बनविताना बदल करून बंदीला विरोध दाखविला. कन्नड साहित्यातील शिवराम कारंथ, यू. आर. अनंतमूर्ती, गिरीश कर्नाड, एस. एल. भैरप्पा, एम. एम. कलबुर्गी ही नावे महाराष्ट्रात अगदी घराघरात पोहोचलीत. हिमालयाच्या उंचीची सारी माणसे. कारंथ, अनंतमूर्ती, कर्नाड यांना ज्ञानपीठ, तर भैरप्पांना दोन साहित्य अकादमी पुरस्कार, नंतर अकादमीची फेलोशिप. तेव्हा, या महान लेखकांमध्ये डावे-उजवे करण्यासारखे काही नाही. खंत एवढीच की, आता भैरप्पांना उत्तर देण्यासाठी ना कर्नाड आहेत ना अनंतमूर्ती. अनंतमूर्तींना जाऊन आठ वर्षे झाली, तर कर्नाड २०१९ मध्ये जग सोडून गेले. त्यांना डावे डावे म्हणून हिणवले, तरी प्रत्युत्तरात उजवे उजवे म्हणून हिणवायला ते हयात नाहीत. ज्या भारतीय संस्कृतीचा, तिच्या महत्तेचा भैरप्पा रोज गौरव करतात, ती सांगते की, मरणान्तानि वैराणि. तेव्हा गेलेल्या माणसांबद्दल बोलणे भैरप्पांनी टाळायला हवे होते. भैरप्पा सांगतात तसे ते उजवे नाहीत, हेही खरे नाही. आतापर्यंत भलेही उजवेपण मिरविणे जरा अडचणीचे असेल. सध्या नक्की तसे नाही. किंबहुना आजकाल तसे असणे हीच गुणवत्ता व देशभक्तीचे प्रमाणपत्र आहे. तसेही गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळात भैरप्पांनी जे लिहिले त्यात उजवेपणाचे दर्शन जागोजागी झालेच आहे. कर्नाड, अनंतमूर्ती यांसारखे समकालीन लेखक, कलावंत इतिहासाच्या आधारे समाजात दुही, द्वेष पसरविण्याचा विरोध करीत असतानाही, भैरप्पांनी त्यांचा मार्ग सोडला नव्हता. आता तो सोडण्याची गरजच नाही. तेव्हा ‘राईट’ असलो, तरी ’‘सेंटरला उभे आहोत, असा फसवा पवित्रा घेण्याऐवजी भैरप्पांनी राजरोसपणे उजव्या विंगेत जावे. आयुष्याच्या सायंकाळी त्यातून झालाच तर फायदा होईल, नुकसान नक्की नाही.