-वसंत भोसलेसुती पँट आणि शर्ट घालणारे, स्कूटरवरून फिरणारे आणि अखेरच्या श्वासापर्यंत स्वत:चे कपडे स्वत: धुणारे वि. रा. जोगळेकर महाराष्ट्राची वरदायिनी कोयना नदीवरील धरणाच्या उभारणीचे साक्षीदार होते, हे आताच्या पिढीला सांगितले, तर पटणारही नाही. सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेऊन महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात ते नोकरीला लागले. महाराष्ट्र निर्मितीचा तो काळ होता. कोयना धरण उभारणाऱ्या अभियंत्यांच्या संघात त्यांची नियुक्ती झाली. परदेशात जाऊन प्रशिक्षणही घेऊन आले. सलग तेरा वर्षे या धरणाच्या उभारणीतील ते भागीदार होते.कोयना धरणाची उभारणी प्रामुख्याने वीजनिर्मितीसाठी करण्यात आली आहे. महाबळेश्वर ते हेळवाकपर्यंत कोयना नदी उत्तर-दक्षिण वाहते, हेळवाक-पासून पूर्ववाहिनी होते. आताचे कोयनानगर गाव आहे तेथे धरणाचा पाया काढण्याची सुरुवात करण्यापासून ते पूर्ण करेपर्यंत वि. रा. जोगळेकर यांनी कष्ट उपसले आहेत. त्यांच्या शब्दांत सांगायचे, तर ती नोकरी नव्हती, राष्ट्र उभारणीचे कार्य चालू होते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पडणारे मान्सूनचे प्रचंड पाणी अडवून पश्चिमेला वळविण्यात आले होते. धरणाच्या जलाशयातून बोगद्याद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात वळविण्यात आले. तेथे वीज निर्मितीगृह उभारले होते. तांत्रिकदृष्ट्या तो एक चमत्कारच आहे.धरण पूर्ण झाले आणि जोगळेकरांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. सह्याद्री पर्वतरांगांत पडणारे निसर्गाचे पाणी नैसर्गिकरीत्या पूर्वेला विजयवाड्यापर्यंत वाहत जाते. ते अडवून पश्चिमेस विजेच्या आशेने सोडणे, हे निसर्गाच्या विरोधी काम झाले. ऊर्जाच हवी होती, तर पूर्वेला वाहणाºया पाण्याच्या आधारे आणि शेतकऱ्यांच्या मदतीने गावोगावी शाश्वत ऊर्जा निर्माण करता आली असती. आपण एका मोठ्या राष्ट्रीय कार्याच्या उभारणीत खारीचा वाटा उचलला असला, तरी तो चुकीचा मार्ग होता, या निकषापर्यंत आले आणि तेराव्या वर्षीच त्यांनी नोकरी सोडली. अन्यथा ते महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याच्या सचिवपदापर्यंत गेले असते. या तेरा वर्षांत काम करत असतानाच १0-११ डिसेंबर १९६७ च्या पहाटे कोयना धरण परिसरात मोठा भूकंप झाला. तेव्हा वि. रा. जोगळेकर पोफळी येथे वीजगृहाजवळच्या शासकीय निवासस्थानी राहत होते. पहाटे जीप घेऊन भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या कोयनानगर वसाहतीत पोहोचणारे ते पहिले अधिकारी होते. ‘शाश्वत ऊर्जेच्या शोधात’ या आत्मचरित्रात त्यांनी याचे सविस्तर वर्णन केले आहे. त्या भूकंपाची तीव्रता, झालेला विध्वंस आणि धरणाच्या सुरक्षिततेच्या काळजीने त्यांच्या मनाचा थरकाप झाला होता. तेव्हाच त्यांनी नोकरी सोडली आणि ऊर्जा निर्मितीचे हे मार्ग सोडून दिले पाहिजेत म्हणून शाश्वत ऊर्जेच्या शोधात या गांधीवादी विचाराच्या माणसाने कोयनानगर सोडले.
कोयना धरणाच्या उभारणीचा साक्षीदार पडद्याआड !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:53 IST