शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात भारतीयांवर हल्ले वाढू लागले आहेत, कारण?

By रवी टाले | Updated: February 28, 2024 08:45 IST

अमेरिका, ब्रिटनमध्ये स्थलांतरितांच्या विरोधात रोष वाढताना दिसतो. तिथले भारतीय या द्वेषाचे बळी ठरू लागले आहेत. असे का व्हावे?

- रवी टाले, कार्यकारी संपादक, लोकमत, जळगावअमेरिका आणि ब्रिटनमधील भारतीय समुदायाच्या लोकांवरील, विशेषतः विद्यार्थ्यांवरील वाढते हल्ले हा भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय झाला आहे. अमेरिकेत जानेवारीत विवेक सैनी नामक भारतीय विद्यार्थ्याची एका बेघर व्यक्तीने एका दुकानात हातोडीने निर्घृण हत्या केली; तर नील आचार्य नावाचा भारतीय विद्यार्थी अनेक दिवस बेपत्ता होता आणि नंतर त्याचा मृतदेहच आढळला! फेब्रुवारी महिन्यात विवेक तनेजा नामक भारतीय व्यक्तीवर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. या तीन घटनांमध्ये हल्ला झालेल्या व्यक्तींना जीवाला मुकावे लागल्याने त्यांचे गांभीर्य अधिक आहे; पण जीवघेण्या न ठरलेल्या आणि त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये स्थान न मिळालेल्या अशा स्वरूपाच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. कॅलिफोर्नियात एका शीख व्यक्तीवर हल्ला करून, त्याचा फेटा बळजबरीने काढून घेण्यात आला. न्यू जर्सीत एका भारतीय अभियंत्याला केवळ द्वेषापोटी गोळ्या घालण्यात आल्या. ब्रिटनमधील बर्मिंगहॅम शहरात एक भारतीय पायी घरी जात असताना, त्याच्यावर हल्ला करून चीजवस्तू लुटण्यात आल्या. विद्यापीठांच्या ‘कॅम्पस्’मध्ये भारतीय विद्यार्थ्यांना उद्देशून द्वेषपूर्ण शेरेबाजी, शिवीगाळ, मारहाणीच्या धमक्या हे तर नित्याचेच झाले आहे.

अशा घटनांमागील कारणांचा शोध घेतल्यास, कोणतेही एकच कारण समोर येणार नाही; पण भारतीय समुदायाच्या व्यक्तींवरील हल्ल्यांमागचे एक समान सूत्र म्हणजे द्वेष!

ज्यांच्यावर राज्य केले, ज्यांना सातत्याने हीन वागणूक दिली, असे भारतीय आपल्याच देशांत येऊन आपल्यावर वरचढ ठरू लागले आहेत, ही कल्पनाच अनेक अमेरिकन, ब्रिटिश नागरिकांच्या पचनी पडत नाही. अनेक दशके उर्वरित देशांच्या तुलनेत किती तरी पुढे असलेले अमेरिका, ब्रिटन हे देश गत काही वर्षांत माघारू लागले आहेत. चीन, जपान, भारतासारखे देश त्यांच्यावर मात करू लागले आहेत. दुसरीकडे, याच देशांमधून अमेरिका, ब्रिटन इत्यादी पाश्चात्त्य देशांमध्ये विद्यार्थी, तसेच स्थलांतरितांचा ओघ सुरू असतो. त्यामुळे स्थलांतरितांच्या विरोधात रोष वाढताना दिसतो. स्वार्थ साधण्यासाठी काही राजकीय पक्षही या द्वेषाला खत-पाणी घालत आहेत.रोष सर्वच स्थलांतरितांच्या विरोधात असला तरी, स्थलांतराचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या समुदायांना सर्वाधिक फटका बसतो. त्यामध्ये अर्थातच भारतीय असतात. अलीकडे पाश्चात्त्य देशांमध्ये समाजमाध्यमे आणि काही प्रसारमाध्यमांमधूनही भारतीयांचे नकारात्मक चित्रण केले जाते. भारतीय श्रीमंत असतात, आक्रमक असतात; ते स्थानिकांच्या रोजगार संधी हिरावून घेतात असे चित्र निर्माण केले जाते. विदेशांमधील भारतीय समुदायात अलीकडे वाढीस लागलेली अस्मितेची भावना आणि  तिचे जाहीर प्रदर्शनही या हल्ल्यांना निमंत्रण देणारे ठरते आहे. अमेरिका आणि ब्रिटनमधील स्थलांतरित भारतीयांची संख्या जशी वाढीस लागली आहे, तसे ते संधी मिळेल तेव्हा एकत्र येऊन व्यक्त होऊ लागले आहेत. भारतात ज्याप्रमाणे दुसऱ्या राज्यात स्थायिक झालेले एखाद्या राज्यातील लोक समूह करून राहतात, वसाहती तयार करतात, संख्या वाढताच आपले सण-उत्सव गाजावाजासह साजरे करू लागतात, तसेच ते भारतीय अमेरिका-ब्रिटनमध्येही करतात. स्वाभाविकच मूळ रहिवाशांमध्ये भारतीयांसंदर्भात निष्कारण एक प्रकारची अढी निर्माण होते आणि मग कधीतरी ठिणगी पडून स्फोट होतो!

गेल्या काही वर्षांत सर्वच विकसित पाश्चात्त्य देशांत स्थलांतरितांचे प्रमाण वाढीस लागले आहे. भारतातून स्थलांतर करणारे प्रामुख्याने उच्चविद्याविभूषित असतात. इतर अनेक देशांमधून येणारे बहुतांश स्थलांतरित मात्र बेतास बात शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले आणि प्रामुख्याने निम्न दर्जाची कामे करणारे असतात. अनेकदा त्यांच्यापैकी काही अपराधांमध्येही लिप्त असतात. त्यामुळे सर्वच स्थलांतरितांविषयी स्थानिक नागरिकांच्या मनात अढी निर्माण होते आणि जेव्हा भावना प्रक्षुब्ध होतात, तेव्हा ओल्यासोबत सुकेही जळते! द्वेषमूलक हल्ल्यांना आळा घालायचा असल्यास, स्थलांतरित भारतीयांनाच पुढाकार घेऊन आपली प्रतिमा बदलावी लागेल. आम्ही तुमचे हक्क हिरावण्यासाठी नव्हे, तर तुमच्या देशाच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी आलो आहोत, हा विश्वास मूळ रहिवाशांमध्ये निर्माण करावा लागेल. भारतीय शांतताप्रिय आणि कायद्याचे पालन करणारे असतात, अपराध्यांना थारा देत नाहीत, हे आपल्या वर्तणुकीतून पटवून द्यावे लागेल. आपल्या वेगळ्या वसाहती निर्माण करण्याऐवजी, वेगळी ओळख जपण्याऐवजी ‘पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया वैसा’ या उक्तीनुसार त्या देशांतील मूळ नागरिकांसोबत मिळून-मिसळून राहण्यास प्रारंभ करावा लागेल. आपल्याप्रमाणेच (मूळ) भारतीयही या देशाचे नागरिकच आहेत, ही मूळ रहिवाशांमध्ये निर्माण झालेली भावनाच हल्ले रोखू शकेल, भारत सरकारची मुत्सद्देगिरी तिथे कामी येणार नाही!     ravi.tale@lokmat.com