शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

कृतिशील विचारवंत

By admin | Updated: February 27, 2015 23:33 IST

या देशाचा हिंसक असहिष्णू इतिहास फार प्राचीन आहे. त्याचे वारंवार पुनरुज्जीवन होत अस

पी. बी. सावंत,

(निवृत्त न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय आणि माजी अध्यक्ष, प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया) -या देशाचा हिंसक असहिष्णू इतिहास फार प्राचीन आहे. त्याचे वारंवार पुनरुज्जीवन होत असते. निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या निमित्ताने. जात जमातवाद हा त्याचा पाया असतो. हा देश संतांचा व शूरांचा असे मानले जाते. तो सहिष्णुतेचा आदर्श असा डंकाही मिरवला जातो. अशाच प्रकारची इतर अनेक असत्य व अर्धसत्य विधानं काही इतिहासकारांनी आपल्या उथळ अभ्यासाच्या व निष्कर्ष शैलीच्या आधारावर केलेली आहेत. या देशात शूर झाले व संतही झाले; पण म्हणून हा देश फक्त संतांचा व शूरांचा नाही. इथे सैतानही झाले व आहेत. इथे भ्याड, पळपुटे, घरभेदी, खुनी, कटकारस्थानी, विश्वासघातकी, देशद्रोही व सत्तापिपासूही झाले व आहेत. प्राचीन व अर्वाचीन इतिहास याची साक्ष आहे.काही लोकांच्या बुद्धीची व मनाची वाढ ही शेवटपर्यंत होतच नाही. बालबुद्धी व दुराग्रह हे त्यांचे वैशिष्ट्य असते. काहींची बुद्धी नेहमी तिरकी व वक्र असते. सत्कृतीतही त्यांना विकृती दिसते व दुष्कृतीत ते आनंद मानतात. जेव्हा त्यांच्या अपरिपक्व बुद्धीला वादविवाद पेलवत नाहीत, तेव्हा ते गुद्यांंचा आश्रय घेतात व आपल्या नासमज मनाचे सांत्वन करतात. त्यांना माथेफिरू म्हणण्यापेक्षा बिनमाथ्याचे (बिनडोक) म्हणणे अधिक यथार्थ. या बिनडोकपणातही कुठला ना कुठला कालसापेक्ष हेतू दडलेला असतो. सामाजिक, धार्मिक व राजकीय कारणांमुळे आजवर झालेल्या हत्त्यांचे परीक्षण केल्यास हे सहज ध्यानात येईल.गोविंदराव पानसरेंची हत्त्या करून हल्लेखोरांनी काय साधले? त्यांच्या एका शत्रूचा नाश की त्यांच्या विचारांचा नाश? विचार म्हणून पानसरे केव्हाही नाश पावणार नाहीत. उलट त्यांच्या मृत्यूनंतर ते अधिक जिवंत राहणार आहेत. त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून व राखेच्या प्रत्येक कणातून अनेक पानसरे निर्माण होणार आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार आता अधिक गतीने व जोमाने होणार आहे. त्यांचं स्वप्न अधिक द्रुतगतीने आता साकार होणार आहे. ज्याकरता ते सर्व जीवनभर सतत धडपड करत होते व जे त्यांना कदाचित जिवंतपणी साधता आलं नसावं, ते त्यांचा मृत्यू साकार करील. कदाचित ही नियतीची इच्छा असेल. जे त्यांना चर्मचक्षूंनी पाहता आलं नसतं, ते, ते अंत:चक्षूंनी पाहतील.त्यांची हत्त्या करणाऱ्यांना त्यांना या जगातून शारीरिक रूपाने नाहीसं केल्याचं कितीही विकट समाधान लाभलं असलं, तरी ते क्षणभंगूर व विफल आहे. उलट या हत्त्येमुळे त्यांनी स्वत:चीच हत्त्या केली आहे. ज्या कारणाकरता त्यांनी पानसरेंची हत्त्या केली, ते कारण आता आकाशाएवढं रूप घेऊन जळी, स्थळी, काष्ठी वावरणार आहे. यातून निर्माण होणाऱ्या वणव्यात ते जळून भस्म होणार आहेत.पानसरेंच्या जीवनकार्याचं वैशिष्ट्य हे होतं, की ते नेहमी स्वतंत्र बुद्धीने विचार करत. राष्ट्रीय सेवादलातून ते साम्यवादी पक्षात दाखल झाले; परंतु पोथीनिष्ठ साचेबंद विचारसरणी त्यांनी केव्हाही स्वीकारली नाही. साम्यवादी पक्षाकडून ज्या ज्या चुका झाल्या व होत होत्या, त्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. परंतु, संघटनेशिवाय कार्य होऊ शकणार नाही, याचीही त्यांना तितकीच खात्री होती. नवीन विचार आत्मसात करणे हा त्यांचा पिंड होता. ठोकळेबाज काहीही त्यांना मान्य नव्हतं. कष्टकऱ्यांच्या संघटना बांधून त्यांना न्याय देण्याकरता लढे देत असतानाच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व धार्मिक क्षेत्रांतही ते सतत कार्यरत होते. अनेक नवे उपक्रम याही क्षेत्रांत सुरू करून समाजापुढील समस्यांचे निराकरण करण्याचा त्यांनी यथाशक्ती प्रयत्न केला. अंधश्रद्धा, पारंपरिक गैररूढी व समज, जातिभेद, धर्मभेद, असत्य व अर्धसत्य, इतिहासाचा विपर्यास, भोंदूगिरी व धर्मांध शक्ती यांविरुद्ध ते सतत लढत होते. मोकळे मन व स्वच्छंद बुद्धी, विवेक व वैज्ञानिक दृष्टी, स्पष्टवक्तेपणा, निर्भीड व निर्भय वृत्ती व त्याच्या जोडीला निर्मळ, मनमिळाऊ व सहृदयी स्वभाव यामुळे ते काही दुराग्रही सोडले तर सर्वांचेच सन्मित्र होते. सुलभ मुद्देसूद लेखन व फर्डे वक्तृत्व यामुळे ते लोकप्रिय झाले होते व केवळ कष्टकऱ्यांचेच नव्हे तर अभिजनांचेही लाडके होते. भूमीतून निर्माण झालेलं हे अस्सल दणकट नेतृत्व होतं. अशा नेतृत्वाची जनतेला नेहमीच गरज असते. आज त्याची या देशाला सर्वांत अधिक गरज आहे. पानसरे यांच्यावर झालेला हल्ला हा एका सत्याचा शोध घेणाऱ्या मानवतावादी विचारवंतावरील हल्ला आहे. एक-दोन दिवस शोक करून तो आपल्याला परतवता येणार नाही. त्याचा मुकाबला सर्व जनशक्ती संघटित करून करावा लागणार आहे. हा हल्ला म्हणजे भविष्यात येणाऱ्या त्सुनामी संकटाचा इशारा आहे. त्याच्याकडे एक प्रासंगिक घटना म्हणून पाहणं ही घोडचूक होणार आहे. हा फासीवाद (फॅसिझम) आहे. याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर हिटलर-मुसोलिनीच्या राजवटींची स्वप्नं पाहणाऱ्यांचा विजय होणार आहे. आमचे संविधान उखडून टाकण्यात येणार आहे.आपले इतर सर्व मतभेद बाजूला सारून, एकत्र येऊन हे आव्हान स्वीकारलं नाही तर पुढच्या पिढ्या त्यांना कधीही क्षमा करणार नाहीत.