शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यात होताहोता टळलेले अपघात होऊच नयेत म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:37 IST

दिनांक ४ ते ११ मार्चदरम्यान ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह’ साजरा होतो आहे. त्या निमित्ताने औद्योगिक सुरक्षेमागची महत्त्वाची सूत्रे विशद करणारा लेख.

राम दिगंबर दहिफळे,सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मराठवाडा 

सुरक्षा या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ रक्षण करणे अर्थात काळजी घेणे असा होतो. काम निर्धोक होण्यासाठी वापरायची कार्यपद्धती म्हणजेच सुरक्षा अर्थात सुरक्षितता. आपल्या रोजच्या जीवनात आपण हे करतोच. औद्योगिक सुरक्षा हा देखील आपल्या जीवन पद्धतीचा एक भाग आहे, औद्योगिक सुरक्षेमध्ये कामगार हा केंद्रबिंदू आहे. स्वस्थ आणि सुरक्षित कामगार देशाला समृद्ध बनवतात. कारखाना म्हणजे निर्जीव यंत्रांची सजीव माणसाशी सांगड एवढेच नव्हे! फक्त कारखान्याचे कामगारच नव्हे तर उत्पादन प्रक्रियेत काम करणारी प्रत्येक व्यक्ती सुरक्षित असावी, यावर कटाक्ष असला पाहिजे. कारखान्यात होणारे अपघात मुख्यत्वे सुरक्षा नियमांची पायमल्ली, बेपर्वा वृत्ती, अपुरे ज्ञान, निष्काळजीपणा, अर्धवट प्रशिक्षण इत्यादींमुळे होतात, असे निदर्शनास आलेले आहे. सुरक्षितता ही एक दिवसाची नसून वर्षाचे ३६५ दिवस, बारा महिने आणि २४ तास अविरत चालणारे चक्र आहे. कारखान्यात काम करणारा प्रत्येक कामगार सुरक्षित राहावा याकरिता व्यवस्थापनाने हे सुरक्षा चक्र सतत फिरवायचे आहे.

कारखान्यात वापरली जाणारी यंत्रसामग्री, रसायने, उत्पादन प्रक्रियांमधून निर्माण होणारा धूर, धूळ, उष्णता, प्रकाश, गरम वाफा, यंत्रांचा आवाज यामुळे कामगारांना शारीरिक इजा किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते. कारखान्यातील अपघातांची मुख्यत: तीन कारणे आहेत : पहिले - ‘असुरक्षित परिस्थिती’, दुसरे कारण - असुरक्षित क्रिया आणि तिसरे म्हणजे होताहोता टळलेला अपघात! असुरक्षित परिस्थिती म्हणजे दोषयुक्त यंत्रे, धोकादायक स्थिती निर्माण करण्यास कारण ठरणारी कारखान्यातील व्यवस्था किंवा प्रक्रिया, स्वयंसुरक्षा साधनांचा अभाव, अपुरी प्रकाश योजना, धूळ, सुरक्षा कुंपण/जाळी नसलेली अवजड यंत्रे, दोषयुक्त विद्युत रचना, यंत्राच्या धोकादायक भागावर सुरक्षा कुंपण नसणे, प्राणवायूचा अभाव इत्यादी.

असुरक्षित क्रिया म्हणजे करावयाच्या कामासंबंधी यथायोग्य ज्ञान तसेच कसब याचा अभाव! सुरक्षिततेसाठी दिलेली स्वयंसुरक्षा साधने न वापरणे, एकाग्रतेचा अभाव, अति आत्मविश्वास किंवा काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा मोह, अति घाई इत्यादी बाबींमुळे असुरक्षित क्रिया होऊन अपघाताला निमंत्रण दिले जाऊ शकते.

असुरक्षित स्थिती दूर करण्यासाठी कारखान्याच्या व्यवस्थापनास जागरूक राहावे लागते. यंत्रांच्या धोकादायक भागाला संरक्षक कुंपण अर्थात सुरक्षा गार्ड बसवणे, यंत्रांची नियमित देखभाल-दुरुस्ती करून त्यातील दोष वेळोवेळी काढून टाकणे, कामाच्या जागेची निगा राखणे, पुरेशा प्रकाशाची सोय करणे, स्वयंसुरक्षा तसेच कारखान्यातील सुरक्षा यासाठीची साधने उपलब्ध करून देणे व ती सहज मिळतील, वापरासाठी योग्य असतील हे पाहणे व्यवस्थापनाचे काम आहे. कारखान्यातील कामाच्या ठिकाणी धोका निर्माण करणाऱ्या उत्पादन प्रक्रियांच्याबाबतीत असे करा, असे करू नका अर्थात डू अँड डोन्ट तसेच सेफ ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करून कारखान्याच्या दर्शनी भागात लावावी. असुरक्षित क्रिया टाळण्यासाठी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षणाची आवश्यकता असते. यात व्यवस्थापनातील अधिकारी, कामगार, त्यांचे प्रतिनिधी, कामगार संघटनांचे पदाधिकारी या सर्वांचा यात समावेश असायला हवा.

कारखान्यात व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ‘सुरक्षा समिती’ स्थापन करून त्यातून सुरक्षा, व्यवसायजन्य आरोग्य विषयक बाबींची चर्चा, झालेल्या छोट्या-मोठ्या अपघाताची कारणे व करावयाच्या उपायोजनांची, विचारांची देवाणघेवाण करून कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तींचा सुरक्षा व्यवस्थापनात सक्रिय सहभाग मिळवता येऊ शकेल. या समितीत व्यवस्थापनाचे तसेच कामगारांचे प्रतिनिधित्व असायला हवेत.

अपघातांमुळे वित्तहानी होते, कामगारास अपंगत्व येते, प्रसंगी जीवित हानी सुद्धा होऊ शकते. आग लागणे, रसायनांची तसेच वायूची गळती, स्फोट इत्यादींमुळे राष्ट्रीय संपत्तीची हानी, वित्तहानी होऊन पर्यावरणाचे नुकसान होते. त्यामुळे उत्पादनाबरोबरच राष्ट्राचे नुकसान होते. औद्योगिक अपघातांमुळे उद्योगाच्या वाढीवर तसेच कामगारांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होतो. हे सारे टाळणे आपल्या हातात आहे, हे सर्वांनी ध्यानी धरले पाहिजे!