उज्ज्वला बर्वेमाध्यम अभ्यासक,चित्रकार अॅना मारी रॉबर्टसन मोझेस यांचं १९६१ साली निधन झालं, तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी संपूर्ण देशाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली. अवघ्या वीस-बावीस वर्षाच्या कालावधीत रॉबर्टसन मोझेस यांनी चित्रकार म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं आणि त्यांची चित्रं लाखो डॉलर्सना विकली जात होती. अॅना मारी यांचं वेगळेपण असं की, त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी चित्रं काढायला सुरुवात केली आणि पुढची जवळपास वीस-बावीस वर्षे, म्हणजे शंभरी ओलांडल्यानंतरही त्या चित्रं काढत राहिल्या.
त्यांचा जन्म १८६० सालचा. सगळं लहानपण ग्रामीण भागात, गरीब शेतकरी कुटुंबात गेलं. वयाच्या बाराव्या वर्षी त्या एका श्रीमंत कुटुंबात मोलकरीण म्हणून राहायला गेल्या. सत्तावीसाव्या वर्षी थॉमस मोझेस या शेतकऱ्याशी लग्न झाल्यानंतर त्या स्वतःच्या शेतावर राहायला गेल्या. त्यांना दहा मुलं झाली. घरखर्चाला हातभार लागावा, म्हणून त्या घरच्या गायींच्या दुधाचं लोणी विकण्याचा व्यवसाय करायच्या. साहजिकच उसंत, सवड हे शब्दही त्यांना माहीत नव्हते.
सत्तरीच्या आसपास नवरा वारला. तोवर मुलं शेतीचा कारभार बघायला लागली होती आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना मोकळा वेळ मिळाला. विरंगुळा म्हणून त्यांनी भरतकाम करायला सुरुवात केली. पण, काही वर्षानी संधिवातामुळे भरतकाम जमेनासं झालं. बहिणीने चित्रं काढण्याचा पर्याय सुचवला आणि वयाच्या ७८ व्या वर्षी अॅना मारीच्या हातात कुंचला आला.
घरातले उरलेले रंग, कशातून तरी उरलेला कॅनव्हास, एखादं लाकूड अशा मिळेल त्या साहित्याचा वापर करून त्या चित्रं काढायला लागल्या. पहिल्या दोन वर्षांत अनेक चित्रं काढून झाली. पाहणाऱ्यांनाही ती फार आवडायची. पण, तिथे विकत कोण घेणार? काही घरात ठेवून दिली, काही गावातल्या एका दुकानाच्या खिडकीत लटकवून ठेवली.
१९३८ साली त्यांच्या गावात आलेल्या कॅल्डर नावाच्या कलासंग्राहकाने ती चित्रं पाहिली आणि तो अवाक् झाला. त्याने ती सगळी विकत घेतली, मग अॅना मारीच्या घरी जाऊन आणखी काही चित्रं विकत घेतली. पुढचे वर्षभर तो देशातल्या वेगवेगळ्या संग्रहालयांना, कलादालनांना ती चित्रं दाखवत फिरत होता. चित्रं छान आहेत, पण चित्रकार इतकी म्हातारी आहे. तिच्यात केलेली गुंतवणूक वाया जाईल, असं वाटल्यामुळे फारसा कुणी त्यात रस दाखवला नाही.
अखेर वर्षानंतर म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये तिची तीन चित्रं लावण्यात आली. त्यानंतर भरवण्यात आलेल्या तिच्या चित्रांच्या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि ८० वर्षाच्या अॅना मारीकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. मोझेस आजी-ग्रँडमा मोझेस, असं लाडाचं नावही त्यांना मिळालं.
१९५३ साली त्या टाइम साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर झळकल्या. त्यांची चित्रं ज्यांवर छापलेली होती, अशी तब्बल दीड कोटी शुभेच्छापत्रं विकली गेली. काचेच्या ताटल्या, कापड, टाइल्स यांवरही चित्रं झळकायला लागली. काही लिलावात लक्षावधी डॉलर्सना विकली गेली. ही चित्रं इतकी लोकप्रिय झाली, कारण त्यामध्ये अमेरिकेचं प्रसन्न रूप दिसतं. बर्फाच्छादित डोंगर, बहरलेली शेतं, चिमुकली गावं, गुरंढोरं, सणवार यांच्या प्रतिमा बघणाऱ्याला आनंदित करतात, जीवनाविषयी उत्साह, आशा निर्माण करतात. अर्थात एका आजीने काढलेली चित्रं हे कौतुकही बघणाऱ्याच्या मनात उत्साह निर्माण करतं.
त्यांनी एकूण पंधराशे चित्रं काढली. त्यातली पंचवीस चित्रं, तर शंभरी ओलांडल्यावर काढली! मोझेस आजींच्या मते चित्रं काढण्यापेक्षा सतत काहीतरी करत राहणं, हात आणि मन गुंतलेलं राहणं जास्त महत्त्वाचं आहे. प्रसिद्धी, पैसा यांमध्ये त्या वाहत गेल्या नाहीत. जे आयुष्य वाट्याला आलं ते समरसून जगणारी साधी गृहिणी हीच त्यांची स्वतःबद्दलची धारणा होती. मुलं-नातवंडं यांच्यात त्यांचा जीव गुंतलेला असायचा. नातवंडांसाठी स्वतःच्या हातांनी केलेला जॅम उत्तम जमला की, चांगल्या उतरलेल्या चित्राइतकाच त्यांना आनंद व्हायचा. आजी होत्याच तशा भारी !
Web Summary : Anna Mary Robertson Moses, or Grandma Moses, began painting at 78. Her artwork, depicting American rural life, gained immense popularity. She painted over 1500 pictures, achieving global recognition and financial success late in life.
Web Summary : एना मैरी रॉबर्टसन मोसेस, या ग्रैंडमा मोसेस, ने 78 साल की उम्र में चित्रकारी शुरू की। उनकी कलाकृति, अमेरिकी ग्रामीण जीवन को दर्शाती है, को अपार लोकप्रियता मिली। उन्होंने 1500 से अधिक चित्र बनाए, जिससे उन्हें जीवन के अंत में वैश्विक पहचान और वित्तीय सफलता मिली।