शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला इकडे येण्याची संधी, विचार करता येईल, विधिमंडळातच फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
7
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
8
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
9
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
10
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
11
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
12
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
13
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
14
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
15
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
16
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
17
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
18
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
19
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
20
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल

अमेरिकेतला वर्णभेदी हिंसाचार

By admin | Updated: June 27, 2015 00:29 IST

समाजातल्या उच्च वर्णियांनी जातीच्या उतरंडीवर तळातल्या मानल्या जाणाऱ्या समाजघटकांवर अमानुष अत्याचार केल्याचे प्रकार आपल्याकडे घडताना आपण पाहतो.

प्रा.दिलीप फडके, (ज्येष्ठ विश्लेषक)समाजातल्या उच्च वर्णियांनी जातीच्या उतरंडीवर तळातल्या मानल्या जाणाऱ्या समाजघटकांवर अमानुष अत्याचार केल्याचे प्रकार आपल्याकडे घडताना आपण पाहतो. पण अशा घटना केवळ आपल्याकडेच घडतात असे नाही, हे अमेरिकेत घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दक्षिण कॅरोलिना राज्याच्या चार्ल्सटन शहरातील एका आफ्रिकन-अमेरिकन चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार झाले. हे चर्च अमेरिकेतील एक अतिशय प्रतिष्ठीत आणि सर्वात जुन्या आफ्रिकन अमेरिकन चर्चपैकी एक आहे आणि त्या समाजात चांगलेच लोकप्रिय आहे. १८२२ मध्ये आफ्रिकन गुलामांचे नेते डेन्मार्क वर्सी यांनी या चर्चची स्थापना केली होती. चर्चची आजची इमारत १८६५ मध्ये कृष्णवर्णियांनी बांधलेली आहे. वर्णवादाच्या विरोधातल्या चळवळीत कृष्णवर्णीय अमेरिकनांचे नेते मार्टिन ल्युथर किंग यांनी या चर्चमध्ये प्रार्थनासभा घेतल्या आहेत. हा गोळीबार २१/२२ वर्षाच्या एका तरुणाने केला. त्याला पोलिसांनी पकडल्यावर त्याने काढलेल्या उद्गारातून त्याच्या मनात कृष्णवर्णियांबद्दल किती घृणा भरलेली आहे हे लक्षात येते. अमेरिकेसारख्या अतिविकसीत समाजात हे दिसते आहे, हे विशेष आहे. या घटनेचे पडसाद जगभरात आणि विशेषत्वाने अमेरिकेच्या प्रसारमाध्यमात उमटणे क्रमप्राप्तच आहे. मागच्या बुधवारी १७ तारखेला ही घटना घडली.डायलन स्टॉर्म रूफ या २१ वर्षाच्या तरुणाने अत्यंत थंडपणाने या गोळीबारात चर्चमध्ये प्रार्थना करणाऱ्या नऊ निरपराधांची हत्त्या केली. त्याचे सविस्तर वृत्त चार्ल्सटनहून निघणाऱ्या ‘दि पोस्ट अँड कुरियर’ तसेच ‘चार्ल्सटन डेली मेल’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यासारख्या तिथल्या वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळते. हा प्रकार घडला त्यावेळी चर्चमध्ये बायबल शिकण्यासाठी अकरा जण उपस्थित होते. रूफ त्यांच्यात सामील झाला. थंडपणाने उठला आणि त्याने आपली बंदुक काढली आणि माणसे टिपायला सुरुवात केली. ‘तुम्ही कृष्णवर्णीय अमेरिकन्स आमच्या महिलांवर बलात्कार करता, तुम्ही आमचा देश बळकावता, आता तुम्हाला संपवण्याशिवाय दुसरा उपाय नाही’ असे तो म्हणत होता, असे त्या घटनेचे साक्षीदार सांगतात.‘यू एस टुडे’ने आपल्या संपादकीयात या घटनेमुळे अमेरिकेमध्ये बदल घडण्याच्या प्रक्रियेची सुरुवात व्हावी अशी जनतेची इच्छा असल्याचे नमूद केले आहे. जनतेत फूट पडावी आणि काळे आणि गोरे यांच्यात संघर्ष सुरु व्हावा अशी मारेकऱ्याची इच्छा होती पण सगळा समाज एकत्रीतपणाने या घटनेच्या विरोधात एकवटला आहे, हे सांगून टुडेने १९६३ मध्ये घडलेल्या अशाच घटनेचा संदर्भ देत त्यावेळी देशातला वर्णभेद आणि त्यातून येत असलेला द्वेष आणि हिंसाचार संपावा अशी केनेडींनी व्यक्त केलेली इच्छा अजूनही फलद्रुप झालेली नाही हे नमूद केले आहे. यावेळी तरी हे होईल अशी अपेक्षा टुडेच्या संपादकीयात केलेली आहे.वॉल स्ट्रीट जर्नलचे संपादकीय सुद्धा अशाच प्रकारचा सूर लावते आहे. बावन्न वर्षापूर्वी असाच हिंसाचार झाला होता पण त्यानंतरही वर्णभेदी वृत्तीच्या अतिरेकी गटांकडून खून आणि हिंसाचाराच्या अनेक घटना घडलेल्या होत्या, असे जर्नलने सोदाहरण दाखवून दिले आहे. १९६२ मधल्या मार्टिन ल्युथर यांच्या भाषणाचा आधार घेत ओबामांनी या घटनेनंतर अमेरिकेतल्या एकोप्यासाठी आणि एकसंध अमेरिकेचे स्वप्न साकारण्यासाठी आपण सर्वांनी अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे म्हटले आहे. रूफसारखा तरूण इतक्या मोठ्या हिंसाचाराला प्रवृत्त का होतो हा प्रश्नच आहे आणि याचे स्पष्टीकरण देता येणे अवघड आहे, असे नमूद करून जर्नल पुढे म्हणते की त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट इतकीच की असे अमानुष कृत्य करणारा रूफ हा आज एकांडा आहे. त्याला फारसा कुणाचा पाठिंबा नाही, हीच एक काहीशी समाधानाची गोष्ट आहे. ‘चार्ल्सटनच्या शोकापलीकडे’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या आपल्या संपादकीयात ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने अतिशय खरमरीत शब्दात या घटनेची चिकित्सा केली आहे. संतप्त झालेल्या लोकांकरवी शस्त्रे धारण करण्याच्या अधिकाराचा होत असलेला वाढत्या प्रमाणावरील वापर, समाजातल्या वर्णभेदाच्या भावनेत होणारी भयावह वृद्धी, समाजात दिसून येणारा सर्वसाधारण माणसांमधला षंढपणा आणि या सगळ्या समस्यांवरचे उत्तर शोधण्याची जबाबदारी कालबाह्य, प्रतिगामी आणि स्वत:च्या अस्तित्वाच्या विवंचनेपायी दबलेल्या राजकीय व्यवस्थेकडे असणे या राष्ट्राच्या समोरच्या खऱ्या समस्या आहेत हे या घटनेने दाखवून दिले आहे. या संदर्भात टाईम्सने दक्षिण कॅरोलिना राज्याच्या मुख्यालयावरचे सर्व ध्वज अर्ध्यावर आलेले असताना जुन्या वर्णयुद्धाच्या काळातल्या आठवणी जागवणारा ‘कॉन्फडरेट फ्लॅग’ मात्र खुशाल फडकत ठेवण्यात आलेला होता याचा मुद्दाम उल्लेख केला आहे. हाच झेंडा हातात घेतलेल्या स्टॉर्म रूफचा फोटो या घटनेनंतर वृत्तपत्रांनी प्रसिध्द केला होता आणि या झेंड्याच्या इतिहासाचा सविस्तर पंचनामा अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाला आहे. शत्रे बाळगण्याच्या कायद्यात बदल करून आजची सुलभ रितीने शत्रे उपलब्ध होऊ देणारी व्यवस्था बदलण्यात यावी या सूचनेबरोबरच या ध्वजाच्या वापरावर बंदी घालण्याच्या मागणीची चर्चाही झालेली वाचायला मिळते. आपण भावाभावांसारखे एकोप्याने राहिले पाहिजे नाहीतर मूर्खासारखे नष्ट होऊ या मार्टिन ल्युथर किंग यांच्या वचनाची आठवणही टाईम्सने करून दिली आहे. ‘दि नेशन’ने रे. डॉ. विल्यम बार्बर यांचा ‘जस्टीस आफ्टर चार्ल्सटन’ हा अत्यंत परखड लेख प्रकाशीत केला आहे. या घटनेवर नुसते अश्रू ढाळत बसून या घटनांमागच्या कारणांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही, हे सांगतानाच या घटनेतला हल्लेखोर जरी पकडला गेला तरी त्याच्या मागे असणारे खरे गुन्हेगार अजून मोकाट आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. दक्षिण कॅरोलिनामधले अनेक राजकीय नेते या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करीत असतानाच त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी वर्णभेदी विचारांवरचे आपले राजकारण अजूनही सुरु ठेवीत आहेत. या हत्याकांडाबद्दल दु:ख व्यक्त करतानाच कृष्णवर्णीयांच्या मतदानाच्या अधिकारावर मर्यादा आणणे, शिक्षण, आरोग्य , रोजगार आणि वेतन यासारख्या त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी असणारी आर्थिक तरतूद कमी करणे आणि वर्णभेदी वृत्तींना प्रोत्साहन देणाऱ्या कॉन्फडरेट फ्लॅगसारख्या प्रतीकांना प्रोत्साहन देणे यासारख्या गोष्टी अजूनही होत आहेत हे सांगतानाच केवळ डायलन स्टॉर्म रूफ ह्या तरूणावर लक्ष केंद्रित करून ह्या वृत्तीला जबाबदार असणा-या जुन्या अपप्रवृत्तींकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे नेशनने सांगितले आहे .