आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महसुलाच्या प्रस्तावित केलेल्या नव्या ढाच्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यथाशक्ती विरोध करूनही दुबईत झालेल्या आयसीसीच्या बैठकीत मात्र भारत एकाकी पडला. प्रशासनातील सुधारणेसाठीच्या प्रस्तावाला भारत सोडून सर्व नऊ राष्ट्रांनी पाठिंबा दिला, तर महसुलातील हिश्श्याच्या बाबतीत केलेल्या नव्या प्रस्तावावर भारताला केवळ श्रीलंकेचे समर्थन मिळाले. झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांनी ‘शब्द’ देऊनही ऐनवेळी भूमिका बदलल्याने तिथेही बीसीसीआयला २-८ असा पराभव स्वीकारावा लागला. भारतातील क्रिकेट वेडामुळे या देशात टेलिव्हिजन प्रसारणाचे हक्क ‘मूह मांगे’ किमतीला विकले जातात, त्यामुळे आयसीसीला भरघोस उत्पन्न मिळते. इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आणि भारतामुळे आयसीसीला जास्त महसूल मिळतो म्हणून आम्हाला जास्त वाटा हवा, अशी भूमिका घेऊन एन. श्रीनिवासन यांच्या पुढाकाराने महसूल वाटपाचे नवीन सूत्र आयसीसीमध्ये राबविले गेले. यातून या तीन बड्या संघटनांना जास्त नफा मिळत गेला. या निर्णयाच्या विरोधात त्यावेळी इतर राष्ट्रांमध्ये असंतोष होताच; पण उघड बोलण्याचे धाडस कोणी करीत नव्हते. आयपीएलमधील बेटिंग आणि फिक्सिंगच्या मुद्द्यावरून श्रीनिवासन यांची बीसीसीआयमधील सद्दी संपुष्टात आल्यानंतर शशांक मनोहर अध्यक्ष बनले. त्यांनी स्वत:च या महसुलाच्या सूत्राला विरोध केला. पुढे जाऊन ते आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर या सूत्राविरोधातील आवाजाला बळकटी मिळाली. बीसीसीआयने आपली ताकद दाखविण्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती. त्या स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची वेळमर्यादा संपली तरी भारताने आपला संघ जाहीर केला नव्हता; पण या दबावाच्या राजकारणाचा काहीही परिणाम आयसीसीवर झाला नाही. शेवटी बुधवारी झालेल्या बैठकीत हे सूत्र बहुमताने मोडून काढण्यात आले. आता पुढील दिशा ठरविण्यासाठी बीसीसीआय विशेष सर्वसाधारण सभा बोलावणार आहे. त्यात चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय होणार आहे. भारताने बहिष्कार टाकला तर स्पर्धेच्या अपेक्षित उत्पन्नात प्रचंड तूट येणार हे निश्चित; पण बहिष्कार टाकून भारत एकटा करणार काय हे मात्र निश्चित नाही. जगमोहन दालमिया यांच्या व्यावसायिक दृष्टीने बीसीसीआयला समृद्ध बनविले. त्यातून त्यांनी आयसीसीलाही नफ्यात आणले. बीसीसीआयची आर्थिक सुबत्ता इतकी वाढली होती की, काही वेळेस आयसीसीच्या कर्मचाऱ्यांचे पगार बीसीसीआयच्या पैशातून झाले. त्यामुळे बीसीसीआयचे आयसीसीमध्ये वजन वाढले. जागतिक क्रिकेटमधील बीसीसीआय ही महासत्ता बनली. या महासत्तेला पहिला सुरुंग कालच्या घटनेने लागला आहे. महासत्तेच्या अंताची ही सुरुवात तर नसेल..?
भाष्य - महासत्तेला पहिला सुरुंग!
By admin | Updated: May 1, 2017 00:57 IST