सोशल मीडियाचे अधिराज्य असलेल्या आजच्या जगात लहानथोर सर्वांनाच सेल्फीचे एवढे वेड लागले आहे की सेल्फी घेण्याच्या नादात ते आपला जीवही धोक्यात घालण्यास मागेपुढे बघत नाहीत. त्यामुळे अशा सेल्फीवेड्यांना आवर घालण्याची वेळ आता केंद्र सरकारवर येऊन ठेपली आहे. यापुढे देशातील प्रमुख पर्यटन स्थळांवर ‘सेल्फी डेंजर झोन’ तयार केले जाणार आहेत. तशा आशयाचे निर्देशच केंद्राने सर्व राज्यांना दिले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये सेल्फीच्या नादात अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने तरुणांना रेल्वेमार्ग, उंच शिखरे, नद्या-समुद्रात सेल्फी काढणे हे एक साहस वाटू लागले आहे. या वर्षी गणराज्यदिनी आग्रा येथे ताजमहाल बघण्यासाठी गेलेले तीन महाविद्यालयीन युवक रेल्वे रुळावर सेल्फी घेत असताना वेगवान रेल्वेगाडीखाली चिरडले गेले होते. नागपूरजवळील एका तलावात नावेत सेल्फी काढण्याचा मोह आवरता न आल्याने सात तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. मुंबईच्या जोगेश्वरी रेल्वे यार्डमध्ये अशाच एका घटनेत १६ वर्षीय मुलाने आपला जीव गमावला होता. गाडीच्या छतावर उभे राहून सेल्फी काढण्याचे नको ते धाडस करीत असताना इलेक्ट्रिक वायरचा जोरदार शॉक लागला आणि त्याने आपले प्राण गमावले. एका २१ वर्षीय युवकाने असाच एक धाडसी प्रयोग करताना चक्क रिव्हॉल्वरच आपल्या कानशिलावर लावले आणि अनवधानाने रिव्हॉल्वरमधून बंदुकीची गोळी सुटली. तरुणांमधील सेल्फीच्या वेडाने किती कळस गाठला आहे, याची प्रचिती या घटनांमधून यावी. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक नवनवीन शोध लागत असले तरी या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सद्सद्विवेकबुद्धीने आणि योग्य मर्यादेत होणेही तेवढेच गरजेचे आहे. संशोधनाचा अतिरेकी अथवा गैरवापर झाल्यास त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात याची भूतकाळातील अनेक उदाहरणे आपल्यासमक्ष आहेत. आणि सेल्फीच्या बाबतीतही नेमके हेच घडत आहे. त्यामुळे सेल्फी डेंजर झोनचा शासन निर्णय योग्यच आहे. पण बेलगाम सेल्फीबहाद्दरांना नियंत्रणात आणण्यासाठी एवढेच पुरेसे नाही. गुजरातच्या बडोद्यात किंग कोब्रासह सेल्फी काढून तो फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या एका महाभागाला वनअधिकाऱ्यांनी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. अशाच प्रकारची कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा डेंजर झोनच्या फलकालाही हे जुमानणार नाहीत.
अनावर ‘सेल्फी’वेड
By admin | Updated: August 17, 2016 00:02 IST