रामचन्द्र गुहा (विख्यात इतिहासकार आणि लेखक)अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ही जगातली सर्वाधिक बलवान व्यक्ती असल्याने तेथील अध्यक्षीय निवडणुकीकडे, निवडणूक प्रचाराकडे आणि तेथील दोन्ही मुख्य राजकीय पक्षांच्या धोरणांकडे जगाचे लक्ष वेधलेले असते. २०१६मध्ये होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार सध्या प्राथमिक स्तरावरच असला तरी सुरुवातीसच प्रभावी वाटणारे उमेदवार आहेत डेमोक्रॅटिक पक्षाचे व्हर्माउंट येथील सिनेटर बर्नी सॅन्डर्स. त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. ते आज ७४ वर्षांचे असून अध्यक्षीय शर्यतीतले सर्वात वयस्कर उमेदवार आहेत. ज्या देशात समाजवादी असणे म्हणजे रशिया वा चीनचा हस्तक असणे असे मानले जाते, त्या देशात आपण विचाराने समाजवादी आहोत हे त्यांनी स्वत:च जाहीर केले आहे. गेल्या वर्षी सॅन्डर्स यांची एक मुलाखत ‘दि नेशन’ या मासिकात प्रसिद्ध झाली होती व तिच्यात त्यांनी असे म्हटले होते की, काही निवडक अब्जाधीश कुटुंबांच्या हाती अमेरिकेचे आर्थिक आणि राजकीय नियंत्रण आपणास नको आहे. अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क म्हणून दर्जात्मक शिक्षण, साजेसा रोजगार आणि पुरेशा उत्पन्नाच्या हक्क मिळाला पाहिजे असेही त्यांनी या मुलाखतीत म्हटले होते. बड्या प्रसार माध्यमांवर कठोर टीका करताना ते म्हणाले होते की, डेन्मार्क, फिनलँंड, स्वीडन आणि नॉर्वे या देशांनी अलीकडच्या काळात प्रचंड प्रगती करुनही या माध्यमांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. या सर्व देशांमध्ये प्रदीर्घ काळापासून डेमोक्रॅटिक आणि लेबर पार्टीची सरकारेच आलटून-पालटून येत राहिली तरी त्यांच्याकडे उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि उत्कृष्ट शिक्षण यंत्रणा आहे. त्यांनी दारिद्र्य निर्मूलन आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्याबाबत अमेरिकेच्या तुलनेत फार मोठा टप्पा गाठला आहे. त्यांच्याकडून आपण सामाजिक तसेच आर्थिक बाबीत बरेच काही शिकू शकतो व आपण यावरच बोलणार आहोत, असेही त्यांनी या मुलाखतीत म्हटले होते.अमेरिकेने ज्या देशांचे अनुकरण करावे असे सॅन्डर्स यांना वाटते, त्या देशांची यादी मोठी मजेशीर आहे. पश्चिम युरोपातले बरेच देश भांडवलशाही आणि समाजवाद यांच्या समन्वयातून चांगले राज्य चालवण्याबाबत व चांगली धोरणे राबविण्याबाबत उल्लेखिली जातात. या देशांनी नेहमीच उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिले आहे आणि त्यासोबतच नागरिकांचे हक्कदेखील अबाधित ठेवले आहेत. हेच देश त्यांच्या नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि शिक्षणसुद्धा पुरवत आहेत. सॅन्डर्स यांच्या या मताशी अमेरिकेतले इतर राजकारणी सहमत होणार नाहीत हे खरे असले तरी काही अभ्यासकांनी अमेरिकेला युरोपीय देशांकडून काही शिकण्याचा सल्ला मात्र जरुर दिला आहे. इतिहासाचे एक अभ्यासक टोनी जुड यांनी त्यांच्या २०१० साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात अमेरिकेतील असमानतेवर प्रखर टीका केली असून अमेरिकेने स्वीडन आणि डेन्मार्क यांचा आदर्श घ्यावा असा सल्ला दिला आहे. जगातील सर्वात परिपूर्ण देश किंवा किमान अपरिपूर्ण देश म्हणजे डेन्मार्क, असे फ्रान्सीस फुकुयामा यांनीही त्यांच्या ‘राज्यपद्धतींचा तुलनात्मक अभ्यास’ या पुस्तकात म्हटले आहे. खुद्द अमेरिकेतल्या नागरिकांना मात्र नेहमीच असे वाटते की आपल्याइतके संतुष्ट असलेले लोक जगाच्या पाठीवरील अन्य कोणत्याही देशात असू शकत नाहीत. अमेरिकेतल्या राजकारण्यांना आणि विद्वानांनाही त्यांचा देश म्हणजे मानवतेची अखेरची व उत्कृष्ट आशा आणि जगभरातील पीडितांचे आणि आर्थिक दुर्बळांचे एकमात्र आशास्थान आहे, असे वाटत असते. स्वीडन आणि डेन्मार्कसारखीच उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या सोयी असूनही सॅन्डर्स यांनी या यादीत कॅनडाचे नाव मात्र घेतलेले नाही. एके काळी हा देश गोऱ्यांचाच होता पण आता तिथे भारतीय उपखंडातले, पूर्व आशियातले आणि कॅरेबियन बेटातले बरेच लोक स्थायीक झाले आहेत. सांस्कृतिक विविधतेच्या आघाडीवर कॅनडा अमेरिकेपेक्षा खूपच पुढे गेला आहे. मागील दशकात मी तीन वेळा कॅनडात जाऊन आलो. तिथल्या प्रमुख शहरांना भेटी देण्याबरोबरच तिथल्या विविध क्षेत्रातील लोकांशी मी चर्चासुद्धा केलीे. काही विद्यापीठांमध्ये भाषणे दिली व इस्पितळात उपचारसुद्धा घेतले. या दोन्ही गोष्टींनी मी फार प्रभावित झालो. तिथली स्त्री-पुरुष समानता आणि सार्वजनिक प्रसारण सेवा व स्वातंत्र्य खरोखरीच नोंद घेण्यासारखे आहे. तेथील आशियायी, आफ्रिकन, युरोपीय आणि अमेरिकी मूळ असलेल्या नागरिकांचे एकमेकांशी असलेले वर्तन पाहून तर मी अधिकच प्रभावित झालो. न्यूयॉर्क शहर आपल्या बहुसांस्कृतीकतेचा दावा आणि प्रदर्शन करीत असले तरी, टोरांंटो शहराचा बहुसांस्कृतिकपणा अधिक नैसर्गिक वाटतो. नागरिकांना त्याची शेखी मिरवण्याची गरज भासत नाही. कॅनडातल्या उत्कृष्ट आरोग्य सेवेचीही खरे तर सॅन्डर्स यांनी प्रशंसा करायला हवी होती. पण त्यांनी डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड आणि नॉर्वे यांची नावे घेताना कॅनडाचे नाव घेणे मात्र टाळले आहे. वास्तविक पाहता सॅन्डर्स ज्या व्हर्माउंट राज्याचे प्रतिनिधित्व करतात त्याची सुमारे ९० मैल लांबीची सीमारेषा कॅनडाला लागून आहे. सॅन्डर्स यांनी वेळोवेळी कॅनडातील आरोग्यसेवेची प्रशंसाच केली आहे. पण अमेरिकेने ज्या देशांकडून काही धडे घ्यावेत असे त्यांना वाटते त्या देशांच्या यादीत त्यांनी कॅनडाचा नमोल्लेख जाणूनबुजून टाळला की अपघाताने तसे घडले हे कुणीच सांगू शकत नाही. पण म्हणून त्यांच्याकडे कुणी प्रतिकूल नजरेने बघू नये. अर्थात अमेरिकेने नेहमीच आपल्या उत्तेरकडील शेजाऱ्यांवर कृपादृष्टी ठेवली असल्याचे सॅन्डर्स चांगलेच जाणून आहेत. कॅनडा अमेरिकेचे ५१वे राज्य आहे. केवळ युद्धप्रसंगी त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होते आणि युद्ध करण्यास तयार नसणारा कुणीही तरुण कॅनडात जाऊन आश्रय घेऊ शकतो.२००९ साली अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी, ब्रिटन आणि ग्रीस यांच्या प्रमाणे अमेरिकासुद्धा इतरांच्या तुलनेत वेगळी आणि अपवादभूत असल्याचा तिला विश्वास आहे, असे उद्गार काढले होते. पण या वक्तव्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी सारवासरव केली. पण २०१४ साली अमेरिकेच्या लष्करी अकादमीत बोलताना त्यांनी पुन्हा अमेरिकेच्या अपवादात्मकतेवर आपला अंत:करणापासून विश्वास असल्याचे म्हटले. या पार्श्वभूमीवर युरोपातील काही देशांमध्ये अमेरिकेपेक्षा चांगला कारभार असल्याचे उद्गार सॅन्डर्स यांनी काढणे धारिष्ट्याचे वाटते. अर्थात त्यांनी या देशांमध्ये कॅनडाचेही नाव घेतले असते तर मात्र त्यांना तीव्र टिकेला सामोरे जावे लागले असते.
अमेरिकी अध्यक्षीय उमेदवार सॅन्डर्स यांचा पवित्रा
By admin | Updated: September 25, 2015 22:29 IST