शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

वेध - अजातांची ‘जात’ कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:12 IST

जातीपासून मुक्त होण्यासाठी गणपती महाराजांनी अजात पंथ स्थापन केला. पण, या पंथाची ‘जात’ म्हणून सरकार दरबारी नोंद होत आहे. महाराजांच्या अनुयायांचा संघर्ष यासाठीच आहे.

 - गजानन जानभोरशंभर वर्षांपूर्वी गावखेड्यातला एक निरक्षर माणूस अस्पृश्यांना गावातील मंदिरात घेऊन जाण्यासाठी धडपडतो, जातीव्यवस्था, रूढीपरंपरेविरुद्ध पेटून उठतो, विधवेशी आंतरजातीय विवाह करतो, गुलामीचे प्रतीक असलेले मंगळसूत्र तोडून फेकतो आणि बांगड्या फोडायला लावतो. धर्ममार्तंडांना सहन होत नाही. ते चवताळतात, त्याला मारून टाकण्याचे प्रयत्न होतात, बहिष्कृतही केले जाते. शेवटी तो बंड करतो आणि सहका-यांना घेऊन जातीच्या बाहेर पडतो. त्याच्या मागोमाग हजारो माणसे येतात. त्यातूनच ‘अजात’ नावाचा एक संप्रदाय जन्मास येतो. महाराष्ट्राच्या समाज परिवर्तनाच्या इतिहासात मात्र त्या निरक्षर माणसाच्या क्रांतीची कुठेही नोंद होत नाही, त्याची दखलही घ्यावीशी कुणाला वाटत नाही. या क्रांतिकारकाला असे बेदखल का केले गेले, हा प्रश्न नेहमी अस्वस्थ करीत असतो.अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर या खेड्यातील एका कर्त्या सुधारकाच्या संघर्षाचा हा उपेक्षित इतिहास आहे. गणपती महाराज हे त्यांचे नाव. परवा गणपती महाराजांची पणती सुनयना अजात भेटली. पणजोबांच्या कार्याचा प्रसार व्हावा आणि त्यांनी स्थापन केलेला अजात संप्रदाय टिकून रहावा, यासाठी ती तळमळत असते. गणपती महाराज म्हणायचे, ‘निसर्गाने दोनच जाती निर्माण केल्या. एक स्त्री आणि दुसरी पुरुष, त्यामुळे माणसाने निर्माण केलेल्या जाती-पोटजाती या शोषणाची व्यवस्था निर्माण करतात’. म्हणून त्यांनी ही व्यवस्थाच झुगारून दिली. गणपती महाराज पंढरपूरची वारी नियमित करायचे. ‘वारी करून गावात परतल्यानंतर वारकरी पुन्हा जातीभेदात गुरफटतात. मग या वारीला अर्थ काय?’, महाराज सतत अस्वस्थ राहायचे. ‘मग या जातीलाच मूठमाती द्यायची’... गणपती महाराजांनी गावातील मित्रांना बोलावले, ‘आजपासून आपल्या आयुष्यातून जात कायमची हद्दपार’... कोण-कोण होते यात? तेली, कुणबी, माळी, गोंड, महार, लोहार, धनगर आणि ब्राह्मणही. सुरुवातीला विरोध आणि हेटाळणीही झाली. नंतर अनुयायी वाढत गेले. गणपती महाराजांनी या समुदायाला नाव दिले ‘अजात’. हाच तो संप्रदाय. या पंथीयांनी घरावर पांढरे झेंडे फडकावले. श्वेत वस्त्र परिधान करायला सुरुवात केली. आंतरजातीय विवाह सुरू केले. सर्वांनी मिळून जात अशी कायमची फेकून दिली. गावातील मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. महाराजांनी सत्याग्रह केला. घरावर दगड-धोंडे आले पण खचले नाहीत. शेवटी एके दिवशी अस्पृश्यांना घेऊन ते मंदिरात गेले आणि विठोबाची पूजा केली. ही गोष्ट १९२९ ची. वि.दा. सावरकरांनी रत्नागिरीतील पतीत पावन मंदिर दलितांसाठी खुले केले ते वर्ष १९३१. साने गुरुजींनी पंढरपुरातील मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा, यासाठी आमरण उपोषण केले ते साल १९४६. सावरकर, साने गुरुजींच्या पूर्वी महाराजांनी अस्पृश्यांसाठी हा सत्याग्रह केला. पण, इतिहासात नोंद सावरकर, साने गुुरुजींचीच झाली. गणपती महाराज इथेही उपेक्षित राहिले.गणपती महाराजांनी आयुष्यभर विवेकाची कास घट्ट धरून ठेवली. अमरावतीत अस्पृश्यता निवारण परिषद झाली. त्यात त्यांची भूमिका मोलाची होती. एक निरक्षर माणूस एवढी मोठी सामाजिक क्रांती घडवून आणतो, ही गोष्ट परिषदेत उपस्थित असलेल्या देशभरातील कार्यकर्त्यांसाठी अद्भूत होती. निरक्षरतेचा विज्ञानवादाशी तसा काहीच संबंध नसतो, हे सत्य भूत आणि वर्तमानालाही लागू पडते. विजय भटकरांसारखी प्रज्ञावान माणसे संशोधक असूनही अंधश्रद्ध असतात. निर्मला सीतारामन पुरोहिताकडून कर्मकांड केल्याशिवाय संरक्षण मंत्रिपद स्वीकारत नाहीत. दुसºया जातीची आहे म्हणून पुण्याच्या उच्च विद्याविभूषित महिलेचे सोवळे मोडते. पण गाडगेबाबा, गणपती महाराजांसारखी माणसे अक्षरशून्य असूनही आयुष्यभर डोळस राहतात. शेवटी अंत:स्फूर्तीच माणसाला घडवत असते. ती कुठल्याही जाती-धर्मातून येत नाही. ती उपजत असते आणि वेदनेतूनही येत असते. या वेदना ज्ञानेश्वर-तुकारामाला जशा भोगाव्या लागतात तशाच मरणप्राय कळा सावता माळी, चोखोबालाही सोसाव्या लागतात. जातीपासून मुक्त होण्यासाठी महाराजांनी अजात पंथ स्थापन केला. पण, या पंथाची ‘जात’ म्हणून सरकार दरबारी नोंद होत आहे. महाराजांच्या अनुयायांचा संघर्ष यासाठीच आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या क्रांतीचा अभिमान बाळगायचा की वैषम्य अशा कात्रीत ही माणसे सापडली आहेत. विदर्भातील एका छोट्याशा गावात शतकापूर्वी जाती व्यवस्थेविरुद्ध सुरू झालेल्या संघर्र्षाची ही अशी कहाणी आहे.

टॅग्स :Indiaभारत