राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा होत आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय शहर आहे. देशातील सर्वोच्च पदे भूषविणारी मंडळी त्या शहरात निवास करते. त्यामुळे त्या शहरातील वायू प्रदूषण धोकादायक पातळीच्याही वर पोहोचत असेल, तर त्याची चर्चा होणे स्वाभाविकही आहे; मात्र याचा अर्थ देशातील इतर शहरांमधील हवा व पाण्याची स्थिती आलबेल आहे, असा अजिबात होत नाही. महानगरे तर सोडूनच द्या; पण छोट्या शहरांमध्येही श्वास घेणे हल्ली कठीण होत चालले आहे. देशातील एकाही नदीच्या पात्रातील पाणी थेट प्राशन करण्याजोगे राहिलेले नाही. पाणी किमान शुद्ध करून तरी पिता येते; पण हवेचे काय करायचे? ती तर तुमच्या फुफ्फुसांमध्ये शिरतेच! अद्याप तरी हवा शुद्धीकरणाची वैयक्तिक वापराची संयंत्रे बाजारात आलेली नाहीत. त्यामुळे भोवतालची हवा कितीही अशुद्ध असली तरी, त्या हवेतच श्वसन करणे, हे तुमचे प्रारब्ध ठरते. दुर्दैवाने, एखाद्या गोष्टीचा थेट परिणाम समोर येत असेल, तरच आम्ही हादरतो. त्यामुळे एखाद्या अपघातात बरीच प्राणहानी झाली, एखाद्या आजारामुळे मोठ्या संख्येने रुग्ण दगावले किंवा विषारी दारू प्राशन करून काही माणसे मरण पावली, तर आम्ही लगेच भडकतो आणि सरकारी यंत्रणांच्या विरोधात रोष प्रकट करतो; मात्र अशा कारणांच्या तुलनेत किती तरी जास्त प्रमाणात; परंतु अप्रत्यक्षरीत्या अथवा हळूहळू जीवितहानी होत असल्यास, आपल्याला काय त्याचे, अशा स्वरूपाची आमची प्रतिक्रिया असते. त्यामुळेच अगदी टोक गाठल्या जाईपर्यंत प्रदूषणादी समस्यांकडे आम्ही दुर्लक्षच करतो. भारतीयांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे संबंधित यंत्रणांचे आयतेच फावते! महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अकोला महापालिकेला, हवेतील धुळीच्या धोकादायक प्रमाणाबद्दल नुकतीच नोटीस बजावली. दुर्दैवाने कोणत्याही किरकोळ कारणास्तव रस्त्यांवर उतरून तोडफोड करणाºया संघटनांपैकी एकाही संघटनेला, या गंभीर मुद्यावर महापालिकेला साधा जाबही विचारावासा वाटला नाही. वास्तविक वायू प्रदूषणाचा विळखा अत्यंत भयंकर आहे. वायू प्रदूषणामुळे हृदय, रक्तवाहिन्या आणि श्वसनाशी संबंधित आजार बळावतात. दुर्दैवाने उच्चशिक्षितांमध्येही यासंदर्भात पुरेशी जागृती आढळत नाही. त्यामुळेच प्रदूषणासंदर्भात कितीही गंभीर स्वरूपाचे अहवाल आले, तरीही आमच्या देशात त्यावर अत्यंत क्षीण प्रतिक्रिया उमटतात, हा एकप्रकारे स्वत:च्या आरोग्याशीच खेळ नव्हे का?
वायू प्रदूषणानं सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आरोग्याची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 03:40 IST