काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदभार स्वीकारताना व्यक्त केलेले मनोगत आणि काँग्रेेसची राज्यातील सद्य:स्थिती याचा विचार केला तर आव्हानांच्या डोंगराखाली सपकाळ दबतील की काय अशी भीती वाटते. निराशेच्या गर्तेत असलेल्या काँग्रेसचे ‘हर्ष’वर्धन ते कितपत करू शकतील? ज्या संकल्पना घेऊन ते आले आहेत त्याच्या अगदी विपरित पक्षाची आज अवस्था आहे. नातीगोती आणि जातपातीचा विचार न करता जनाधार असलेल्या प्रामाणिक आणि निष्ठावंतांनाच पक्षात पदे दिली जातील, असे त्यांनी जाहीर केले आहे. ते ज्या जिल्ह्यातून येतात त्या बुलढाणा जिल्ह्याचे घाटावर आणि घाटाखालचे राजकारण असे दोन भाग आहेत. ते स्वत: घाटावरचे. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणातील कात्रजचा घाट ते अद्याप चढले वा उतरलेले नाहीत. तो ते चढतील, उतरतील तेव्हा त्यातील धोके त्यांच्या लक्षात येतीलच. गोतावळ्याच्या गाळात पुरत्या अडकलेल्या काँग्रेसला त्यातून बाहेर काढून निष्ठावंतांना सन्मान देताना त्यांची खरी कसोटी लागणार आहे.
प्रस्थापित त्यांना तसे कितपत करू देतील? गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसजनांच्या आणि त्या अनुषंगाने काँग्रेसच्या स्वभावाला जे रोग लागले आहेत ते दूर करण्यासाठीची ‘हर्षवर्धन घुटी’ कितपत कामाला येईल, हे नजीकच्या काळात कळेलच. काँग्रेसचे नेते वर्षानुवर्षे श्रीमंत, ताकदवान होत गेले आणि पक्ष कमजोर होत गेला. अनिर्बंध नेत्यांनी पक्ष कमकुवत होत असल्याची पर्वा केली नाही. पक्ष बुडाला तर आपणही एक दिवस बुडून जाऊ याचे भानच या नेत्यांना नव्हते; पण झाले तसेच. अनेक दिग्गजांना घरी बसावे लागले. काहींची नाव दोनेएकशे मतांनी किनाऱ्याला लागली. पण एकेकाळी एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेस पक्षाला आज विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचेही वांधे झाले आहेत. अशा आव्हानात्मक अवस्थेत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नवाकोरा, निष्ठावंत प्रदेशाध्यक्ष नेमला आहे. असा चेहरा दिल्यावर दोनच शक्यता असतात.
एकतर पक्षाला ते मोठे यश मिळवून देतील किंवा पक्षाचे नुकसान होईल. नुकसान होण्याची शक्यता यासाठी नाही की पक्षाचे जे व्हायचे ते नुकसान आता होऊन चुकले आहे. त्यामुळे झाला तर फायदाच होईल. ते काँग्रेस अंतर्गत कोणत्याही गटाचे नाहीत. त्यामुळे गटातटाच्या राजकारणात अडकलेल्या काँग्रेसला त्यातून बाहेर काढण्याची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षांना दिल्लीचे बळ किती आहे यावर बरेच काही अवलंबून असते. आजतरी सपकाळ यांना दिल्लीश्वरांचा पूर्ण आशीर्वाद असल्याने त्यांना निर्णयस्वातंत्र्य दिले जाईल. काँग्रेसला पुढे नेण्यासाठी सपकाळ हे काँग्रेसला मागे नेऊ पाहत आहेत. म्हणजे आजपासून तीस-चाळीस वर्षांपूर्वी ज्या मूल्यांवर काँग्रेस चालत होती त्या मूल्यांची रुजवात ते करू पाहत आहेत. आजच्या काँग्रेस नेत्यांना आणि त्यांच्या नादी लागलेल्या कार्यकर्त्यांना हा बदल स्वीकारणे फारच जड जाणार आहे. बिघडलेल्या काँग्रेसला सुधारण्यासाठी अनेक कटू निर्णय घ्यावे लागतील. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताना जोशपूर्ण भाषण करणे ही एक बाब झाली, पण या भाषणात व्यक्त केलेल्या भावना, अपेक्षित बदल अंमलात आणणे हे अतिकठीण काम आहे. सपकाळ जे करू पाहत आहेत ते सहकारसम्राट, शिक्षणसम्राट, संस्थानिक आणि तीन-चार पिढ्यांपासून आपल्याच कुटुंबात राजकारण फिरवत असलेल्या नेत्यांच्या कितपत पचनी पडेल? अशक्त काँग्रेसला सशक्त करण्यासाठीची जादूची कांडी आज कोणाहीकडे नाही. त्यातच पुढची साडेचार वर्षे केंद्र आणि राज्यातही सत्ता काँग्रेसकडे नसणार आहे.
फाटाफुटीचे ग्रहण लागलेली काँग्रेस सांभाळणे सोपे नाही. पक्ष चालवायचा म्हटले तर पैसा लागतो, सपकाळ खिशातून काढून तो देऊ शकतील अशी त्यांची आर्थिक स्थिती नाही. काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते निरपेक्षपणे पक्षासाठी योगदान देत राहतात तसे पक्षाच्या भरवशावर धनवान झालेले नेते पक्षाचे अर्थकारण सांभाळतील असा आशावाद सपकाळ यांनी बाळगायला हरकत नाही. काँग्रेसमध्ये कोणाचा नैतिक धाक, आदरयुक्त भीती अशी कोणाचीही आज पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर नेैतिकतेचा, निष्ठेचा आग्रह धरणाऱ्या तरुण नेत्याला प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणत त्यांच्या नेतृत्वात पक्ष कात टाकेल, अशी अपेक्षा आणि सदिच्छादेखील आहेच.