शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

बहेनजींचेही पाय मातीचे...बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहेनजी मायावती पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 07:55 IST

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहेनजी मायावती पुन्हा चर्चेत आहेत.

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहेनजी मायावती पुन्हा चर्चेत आहेत. पाच राज्यांच्या निवडणूक निकालात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या मोठ्या राज्यांमध्ये विरोधकांचा पराभव झाला आणि जणू राजकीय विजनवासातून बाहेर आल्यासारख्या त्या खूप दिवसांनंतर बोलल्या. कधीकाळी जय- पराजयाचे पारडे झुकविण्याची ताकद असलेल्या बसपाची तिन्ही राज्यांत काँग्रेसपेक्षाही मानहानीजनक पिछेहाट झाली. त्यावर त्यांनी त्यांच्या परीने विश्लेषण केले. उत्तर प्रदेशातील अमरोहाचे बसपा खासदार दानिश अली यांच्यावर भाजपचे दिल्लीतील खासदार रमेश बिधुडी यांनी लोकसभेत अश्लाघ्य भाषेत आक्षेपार्ह विधाने केली. तेव्हा, पक्ष अलींच्या पाठीशी उभा राहिला नाही. उलट, बडतर्फ तृणमूल खासदार महुआ मोड़त्रा यांच्या समर्थनार्थ सभात्याग ही दानिश अली यांची कृती पक्षविरोधी ठरवून त्यांना पक्षाने काल काढून टाकले. हा बडतर्फीचा आदेश पक्षविरोधी कारवायांसाठी आहे की भाजपला नाराज केले म्हणून, हा प्रश्न चर्चेत आहे.. आणि आता मायावतींनी आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा, राजकीय वारसदाराविषयीचा निर्णय जाहीर केला आहे. 

आकाश आनंद हे भाचे, म्हणजे बंधू आनंद कुमार यांचे चिरंजीव आपले राजकीय वारसदार असतील असे मायावतींनी जाहीर केले आहे. क्रांतीच्या गोष्टी करणाऱ्या बहुतेकांचे पाय अखेर मातीचेच निघतात, हे यातून अधोरेखित झाले आणि मायावतींबाबत अशा अनुभवाची ही पहिली वेळ नाही. या निर्णयाचा दुसरा अन्वयार्थ हा की, याबाबतीत कांशीराम यांना जमले ते मायावतींनी साधले नाही. कारण, कांशीराम यांच्याशी मायावतींचा कौटुंबिक संबंध नव्हता. मायावतींच्या हाती बसपाची धुरा सोपविताना कांशीराम यांनी केवळ वैचारिक वारशाचा विचार केला. त्यातही आयुष्यभर प्रस्थापितांचे राजकारण, घराणेशाहीवर टीका करणाऱ्या, त्याच आधारे बहुजनांमध्ये राजकीय जागृती घडविणाऱ्या, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी विचारांना राजकीय चेहरा देणाऱ्या मायावतींना बामसेफ किंवा बसपाचे नेते-कार्यकर्ते यात वारस दिसला नाही. त्यासाठी त्या स्वतःच्याच घरात डोकावल्या. यात आश्चर्य नसले तरी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना खंत वाटणारच. कारण, दिवंगत कांशीराम व मायावतींचे बहुजन समाज पक्षाचा उदय हे भारतीय राजकारणातील सामाजिक अभिसरणाचे अभूतपूर्व पर्व आहे किंवा होते, असे म्हटले तर ती अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. 

'जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी' अशी घोषणा देत कांशीराम यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्वाचा पाया दलित, आदिवासी, ओबीसी मिळून सगळ्या बहुजनांच्या राजकारणाला दिला. सोशल इंजिनिअरिंग शब्द प्रचलित झाला. बहुजनांमध्ये राजकीय जागृती आली. प्रस्थापित राजकारणाला नवा पर्याय म्हणून बसपाचा राजकीय क्षितिजावर उदय झाला. किमान वीस-पंचवीस वर्षे देशाचे राजकारण ढवळून निघाले. त्यामुळे उच्चवर्णीयांचे राजकारण करणाऱ्या बड्या प्रस्थापित राष्ट्रीय पक्षांनाही जातीपातींचा आधार गरजेचा वाटू लागला. कांशीराम यांच्या हयातीतच उत्तर प्रदेश या सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रिपद मायावतींच्या पदरात पडले. त्या देशातील पहिल्या दलित महिला मुख्यमंत्री ठरल्या. कधी भाजपच्या पाठिंब्यावर, तर कधी स्वबळावर अशा चारवेळा त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या. त्यांच्या कारभाराचा चेहराही बहुजन होता. फुले, शाहू, आंबेडकर या महाराष्ट्रातील महापुरुषांना मायावतींमुळेच उत्तर प्रदेश व उर्वरित भारतात मोठी प्रतिष्ठा मिळाली. त्यांची विशालकाय स्मारके उभी राहिली. देशभरातील बहुजन समाज त्यामुळे भारावला. एक मोठा कालखंड अशा भारावलेपणाचा होता. महाराष्ट्रात तर मायावतींना जमते ते स्थानिक नेत्यांना का जमत नाही, हाच अनेक वर्षे दलित, बहुजन समाजाचा आक्षेप राहिला. अशा क्रांतिकारी मायावती नंतर आरोपांच्या गर्तेत सापडल्या. वाढदिवसाला भेट म्हणून पक्षनिधी घेणाऱ्या मायावतींचा चेहरा उघडा पडला. ताज कॉरिडॉर, आंबेडकर मेमोरिअल पार्क वगैरे प्रकल्पांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. चौकशांचा ससेमिरा मागे लागला. लढवय्या म्हणविल्या जाणाऱ्या मायावतींनी एकप्रकारे शरणागती पत्करली. विशेषत: गेल्या दहा वर्षांत त्या तपास यंत्रणा ज्यांच्या हातात त्या भारतीय जनता पक्षाच्या कलाने राजकारण करू लागल्या. सतत सत्ताधाऱ्यांच्या सोयीची भूमिका घेऊ लागल्या. दानिश अलींची बडतर्फी ही अशीच भूमिका तर अननुभवी आकाश आनंद यांच्या हाती बसपाची सूत्रे हा येत्या निवडणुकीत प्रासंगिक राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.