डॉ. दीपक शिकारपूर, उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक -कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा सध्याचा परवलीचा शब्द आहे. एआय नजीकच्या काळात अनेक क्षेत्रांवर आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करेल. अनेक क्षेत्रे या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदलतील. गेल्या काही वर्षात जेन आय टूल्सचा (उदा. जेमिनी, चॅटजीपीटी) वापर वाढला. त्यामुळे माहितीची (अगदी चित्र, ध्वनी, व्हिडीओ सकट) निर्मिती करणे सुलभ व वेगवान झाले. आता पुढचा टप्पा गाठायची वेळ आली आहे. हा टप्पा असेल अजेंटिक एआयचा! अजेंटिक एआय केवळ ‘स्मार्ट’ नाही - ते ‘स्वायत्त’ आहे. म्हणजेच, हे एआय स्वतः विचार करून कृती करू शकते, त्यामुळे डिजिटल सहकार्याचे रूप बदलू शकते.
स्मार्ट म्हणजे मानवी उत्पादकता वाढवणाऱ्या प्रणाली व उत्पादने. अजेंटिक ही त्याच्या पुढची पायरी आहे. ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वायत्तपणे कार्य करू शकते, निर्णय घेऊ शकते आणि मर्यादित मानवी देखरेखीसह कृतीही करू शकते. हे पारंपारिक एआयच्या पलीकडे एक पाऊल आहे. अजेंटिक एआय सिस्टीममध्ये अनुभवातून शिकण्याची, गतिमान वातावरणाशी जुळवून घेण्याची आणि जटिल उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इतर एआय सिस्टीमशी सहयोग करण्याची क्षमता अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. हे थोडेफार मानवी मेंदूसारखे आहे.
पारंपरिक एआयला मानवी इनपुट आणि मार्गदर्शन आवश्यक आहे, तर अजेंटिक एआय स्वतंत्रपणे काम करू शकते. पारंपरिक एआय पूर्व-परिभाषित नियमांचे पालन करते, तर अजेंटिक एआय अनुभवातून शिकते आणि बदलांशी जुळवून घेते. पारंपरिक एआयचे निर्णय पूर्व-प्रोग्राम केलेले असतात, तर अजेंटिक एआय स्वतंत्र निर्णय घेऊ शकते. सोपी कामे आणि कार्यप्रवाह हाताळण्यासाठी पारंपरिक एआय उपयुक्त आहे, अजेंटिक एआयला जटिल, बहु-चरणीय कामे सहज हाताळता येऊ शकतात. अजेंटिक एआयचा वापर करून उद्योग अधिक कार्यक्षम, उत्पादक आणि स्पर्धात्मक बनू शकतात. शिक्षण क्षेत्रात हे तंत्र महत्त्वाची कामगिरी बजावू शकते. शिक्षकांसाठी हे एआय उत्तम सहायकाची भूमिका बजावेल.
सध्या पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांना अनेकदा अशैक्षणिक (कारकुनी) काम मोठ्या प्रमाणावर करावे लागते. हे काम अजेंटिक एआय करेल व त्यामुळे शिक्षकांची शैक्षणिक उत्पादकता अनेक पटीने वाढेल. विशेषतः विज्ञान आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये हे एआय व्हर्च्युअल लॅब्स आणि इमर्सिव्ह लर्निंगसाठी पूरक वातावरणाची निर्मिती करेल. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवासारखे शिक्षण मिळेल. अनेकदा प्रात्यक्षिकांसाठी उद्योगांमध्ये प्रत्यक्ष भेट आवश्यक ठरते. आता विद्यार्थी आपल्या संगणकाच्या पडद्यावर हा ‘अनुभव’ घेऊ शकतील.
परीक्षा पद्धतींमध्ये बदल करून केवळ स्मरणशक्ती नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कौशल्यांचे मूल्यांकन करण्यावर भर दिला जाईल. विद्यार्थ्यांच्या उत्तरांचे पृथःकरण करून कुठे जास्त अभ्यासाची गरज आहे हे सप्रमाण सादर केले जाऊ शकते. कसा अभ्यास करून जास्त गुण मिळवता येऊ शकतील याचे मार्गदर्शन अजेंटिक एआय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना देईल. याचा मोठा फायदा ग्रामीण व निमशहरी भागातील शैक्षणिक संस्थांना होईल, कारण अशा ठिकाणी चांगले शिक्षक मिळणे अवघड असते.
अजेंटिक एआय टूल्स आता केवळ प्रयोगशाळांपुरती मर्यादित नाहीत - अशी टूल्स आता व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रात प्रत्यक्षात वापरली जात आहेत. ही त्यातली काही : खानमिगो एआय ट्यूटर (वैयक्तिक शिक्षण मार्गदर्शन), सॉक्राटिक (प्रश्नांची उत्तरे देऊन गृहपाठात मदत), ड्यूलिंगो (संवादात्मक भाषा शिक्षण- भाषेचा सराव व सुधारणा), क्लासपॉईंट (शिक्षकांसाठी स्मार्ट सहायक).
एकंदरीत, अजेंटिक एआयमुळे भारतातील उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होतील. उत्पादकतेत वाढ, नवीन नोकऱ्यांची निर्मिती आणि शिक्षणात क्रांती घडवून आणण्याची क्षमता यात आहे. मात्र, यासोबतच डेटाची गोपनीयता आणि नैतिक वापर यांसारख्या आव्हानांवर मातही करावी लागेल. deepak@deepakshikarpur.com