- बबनराव ढाकणेमराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र असावा म्हणून जो लढा झाला, त्यातून आजच्या महाराष्ट्राची निर्मिती झाली. या लढ्यात मीदेखील एक सैनिक होतो, याचा अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्रच नाही, तर पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्यासाठी जो लढा झाला, त्यातही महाराष्ट्रातील नेतेमंडळी सहभागी होती. महाराष्ट्राचा इतिहास हा लढाऊ आहे. चळवळीचा आहे. विचारांचा आहे.गत साठ वर्षांत सामाजिक पातळीवर आपले राज्य प्रचंड मागे गेले, असे आपणाला सातत्याने दिसले आहे. महाराष्टÑ हा विवेकी होता. दुर्बलांना संधी द्या, त्यांना कमी लेखू नका, ही शिकवण आपल्या राज्याने दिली. आपल्या संतांनीदेखील अंधश्रद्धा कधीही मानली नाही. नवसाने पोरेबाळे होत नाहीत, अशी आपल्या संतांची भाषाही वैज्ञानिक होती. फुले, शाहू, आंबेडकरांची ही भूमी आहे. देशाला आरक्षणाचे धोरण शाहू महाराजांनी शिकविले. सवर्ण-दलित ही दरी व अस्पृश्यता महाराष्टÑातून समूळ नष्ट व्हायला हवी होती; पण तसे झाले नाही. या पुरोगामी राज्यात जाती अधिक घट्ट झाल्या असे दिसत आहे. जातीच्या आधारे येथे हत्याकांडे झाली. राजकारण्यांनी स्वार्थासाठी हा जातीवाद पोसला आहे. पूर्वी राजकीय पक्ष राजकारण करताना उमेदवारांची जात पाहत नव्हते. पैशावर मते मागत नव्हते. आता पैसा व जात हे राजकाणात सर्वोच्च स्थानी आहेत. कुठलाही पक्ष त्यास अपवाद नाही. सत्ताधारीही निर्मळ नाहीत व विरोधकही. जे लोक समाजासाठी काम करत आहेत, चळवळी करत आहेत, ज्यांच्याकडे काही वैचारिक नीतिमत्ता आहे, असेच लोक पूर्वी जनतेतून निवडून जात होते. आता काय परिस्थिती आहे? मी जेव्हा राजकारणात सक्रिय होतो, तेव्हा गावात सरपंच व्हायला कुणी तयार नसायचे. कारण हे जबाबदारीचे पद आहे याची जाणीव होती. समाजासाठी काम करणारी प्रामाणिक व्यक्तीच या पदावर बसली पाहिजे, अशी भावना त्यात होती. आता जो दहा-वीस लाख खर्च करेल तो सरपंच होतो. नगरसेवक होतो. राजकारणात पैसा व जात महत्त्वाची बनली आहे. प्रत्येक नेत्याला सर्व पदे आपल्या स्वत:कडे व कुुटुंबातच हवीत, असे वाटू लागले आहे. सुसंस्कृत व पुढारलेला महाराष्टÑ असे कसे वागू शकतो?
Maharashtra Day 2020: वय वाढले तशी समज घटली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 03:04 IST