शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

‘आप’ पक्षाचा झाला ‘मी’ पक्ष

By admin | Updated: March 11, 2015 22:52 IST

आम आदमी पक्षाने (आप) दिल्लीत लागोपाठ दुसऱ्यांदा मिळविलेले यश त्याच्या नेत्यांनाच पाहवत नाही असे दिसते. अरविंद केजरीवाल

आम आदमी पक्षाने (आप) दिल्लीत लागोपाठ दुसऱ्यांदा मिळविलेले यश त्याच्या नेत्यांनाच पाहवत नाही असे दिसते. अरविंद केजरीवाल हे त्या पार्टीचे नरेंद्र मोदी आहेत. त्यांचे साऱ्यांनी ऐकायचे आणि त्यांच्यातल्या कोणी त्यांना उलट प्रश्न विचारायचा नाही अशी त्या पार्टीची शिस्त आहे. प्रशांतभूषण आणि योगेंद्र यादव या दोन वरिष्ठ नेत्यांना त्या पक्षाने आपल्या निर्णय समितीतून ज्या अपमानकारकरीत्या काढले व तसे करताना त्यांना त्यांची बाजू मांडण्याची कोणतीही संधी दिली नाही त्यातून त्या पक्षावरील केजरीवालांचा एकाधिकारच स्पष्ट झाला. त्या दोघांना काढून टाकताना केजरीवाल पक्षाच्या बैठकीला हजर नव्हते. बंगलोरमध्ये कसल्याशा निसर्गोपचारासाठी ते निघून गेले होते. ही घटना पक्ष संघटनेवरील त्यांची एकहाती पकड व तिच्यातील इतरांचे हलकेपण सांगणारी आहे. दिल्लीच्या निवडणुकीत पक्षाने एकट्या केजरीवालांचे नाव चालविले. छायाचित्रे, पोस्टरे, सभा असे सारे त्यांचेच. बाकीचे पुढारी पंचायतनातल्या चित्रासारखे त्यांच्या मागे वा पुढे बसलेले. मोदींची तऱ्हाही हीच होती व आहे. निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर केजरीवालांनी आपला पक्ष फक्त दिल्लीवर लक्ष केंद्रित करील व त्याच्या विस्ताराचा विचार आजच करणार नाही हे घोषित केल्याने पक्षाचे राज्याराज्यातील इतर नेते हवालदिल व नाराज झाले. दिल्लीविजयाचा कैफ घेऊन साऱ्या देशात आप पार्टीचे झेंडे लावण्याची त्यांची ईर्ष्याच त्यामुळे मारली गेली. निराश झालेले कार्यकर्ते एकतर नेतृत्वाला नावे ठेवतात नाहीतर आपसात भांडत तरी असतात. आप पार्टीचे सध्याचे चित्र असे आहे. योगेंद्र यादव हे केवळ माध्यमांतून मोठे झालेले पुढारी असल्याने त्यांना फारसा जनाधार नाही. शांतीभूषण, त्यांचे चिरंजीव प्रशांतभूषण आणि त्यांची कन्या शालिनी यांनी मागल्या दाराने पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांना न्यायपीठात वजन असले तरी लोकमानसात त्यांनाही फारसे स्थान नाही. स्थान आहे ते एकट्या केजरीवालांना. त्यामुळे यादव आणि भूषणत्रय यांना पक्षाबाहेर काढून त्यांच्या जागा दाखविणे केजरीवालांच्या पाठिराख्यांना सहज शक्य झाले. मात्र त्याचे पडसाद आता साऱ्या देशात उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्रात मयंक गांधी आणि अंजली दमानिया यांच्यात कुस्ती लागली आहे. मयंक गांधी हे भूषण व यादव यांचे चेले असल्याचा व त्या साऱ्यांचा प्रयत्न दिल्लीत पक्षाला स्वबळावर बहुमत मिळू न देण्याचा होता असे दमानियाबार्इंचे म्हणणे आहे. त्या स्थितीत केजरीवालांना पक्षाच्या निमंत्रक पदावरून बाजूला हटवून यादवांना तेथे आणण्याचा व त्यांच्या मार्फतीने पक्षाची सारी सूत्रे स्वत:च्या हाती घेण्याचा भूषण कुटुंबाचा डाव होता असे त्यांचे सांगणे आहे. दमानियाबार्इंनाही महाराष्ट्रात वजन नाही हे गेल्या निवडणुकांनी जनतेला दाखवून दिले आहे. त्यामुळे मयंक गांधी व दमानिया यांचे भांडण पतंगांच्या काटछाटीएवढेच महत्त्वाचे आहे हे आपण लक्षात घ्यायचे... महत्त्वाचा प्रश्न या साऱ्या घटनांनी जनतेत आप पक्षाच्या घालविलेल्या अब्रूचा आहे. ज्यांना भाजपाचे धर्मांध राजकारण नको आणि कॉँग्रेसचे दिशाहीन स्वरूपही नको त्यांचा मोठा वर्ग केजरीवाल आणि आम आदमी पार्टीकडे नव्या आशेने पाहू लागणाऱ्यांचा आहे. त्यांच्या रूपाने देशात एका नव्या राजकीय परिवर्तनाची सुरुवात होते असे त्यांना वाटले आहे. काँग्रेस व भाजपा यांचा पर्याय म्हणून त्या पक्षाकडे पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. काँग्रेस व भाजपावगळता देशातील इतर पक्षांचे स्वरूप प्रादेशिक आहे. आप या पक्षाचे नशीब असे बलवत्तर की तो अण्णा हजाऱ्यांच्या आंदोलनाने दिलेल्या पार्श्वभूमीवर व दिल्लीत एकत्र असलेल्या प्रसिद्धिमाध्यमांच्या जोरावर एकाएकी नाममात्र का होईना ‘राष्ट्रीय’ बनल्याचा आभास देशात निर्माण झाला. देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतील व शहरांतील तरुणांनी स्वखुशीने एकत्र येऊन आप पार्टीच्या शाखा काढल्या. काहींनी त्याची कार्यालये थाटली. स्वत:ला त्या पक्षाचे म्हणवून घेणारे अनेक तरुण आज देशात ठिकठिकाणी आढळणारे आहेत. केजरीवाल विरुद्ध भूषण आणि इतर या भांडणाने या साऱ्यांचाच प्रचंड विरस होऊन पक्षाचे भवितव्यच अंधारे केले आहे. भ्रष्टाचारमुक्ती, स्वस्ताईचे अर्थकारण, खुले व जनताभिमुख राजकारण आणि धर्मनिरपेक्ष सामाजिकता अशी जी वैशिष्ट्ये आम आदमी पार्टीने आपल्या राजकारणात आणली ती मध्यममार्गी लोकांना सुखविणारीही होती. शिवाय काँग्रेस व भाजपामधील सीमेवरच्या लोकांना तो पक्ष जवळचा वाटणाराही होता. केजरीवालांचे व्यक्तिमत्त्वही मित्रासारखे दिसणारे होते. आताच्या घटनाक्रमाने हे चित्र बदलले आहे. केजरीवाल हेही मुरब्बी व आतल्या गाठीचे राजकारणी आहेत, आपल्या विरोधकांना केवढ्या कठोरपणे वाटेला लावायचे ते त्यांना ठाऊक आहे आणि दिल्लीतच नव्हे तर साऱ्या देशात आपल्याला एकनिष्ठ असणाऱ्यांचाच एक गट उभा करण्याचे राजकारण ते करीत आहेत हे देशाला कळले आहे. यात भ्रष्टाचारमुक्ती संपली, धर्मांधतेला असलेला विरोध संपला आणि जनताभिमुख राजकारणही संपले व सबकुछ केजरीवाल असेच त्या पक्षाचे चित्र जनतेसमोर आले.