- स्वामी ब्रह्मविहारीदासकाहीजण धर्माला विघटनकारी मानतात; पण माझ्या अनुभवात हिंदू परंपरा ही एकात्मतेची प्रेरक ठरली आहे. २२ जानेवारी २०२४च्या सकाळी, ‘सिया-राम’चे नामस्मरण करत, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाचे विधी सुरू होते. हा प्रसंग पाहात असताना केवळ विविधता नव्हे, तर ऐक्यही दिसून आले. शैव, शाक्त, वैष्णव, स्वामिनारायण, जैन, शीख, ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधव.. सर्वांनी एकच ओळख अनुभवली, ती म्हणजे ‘भारतीय’ म्हणून. हाच भारताचा मार्ग आहे. विविध धर्म, पंथ, देवतारूपे, भाषा, अन्नसंस्कृती आणि समुदाय यांचा संगम.
हिंदू धर्मात चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी आणि स्वामिनारायण जयंती एकत्र साजरी केली जाते. अयोध्येतील त्या दिवशीच्या सकाळचा प्रसंग मी आज अबूधाबीमध्ये असतानाही अंतःकरणात अनुभवतो आहे. हिंदू सनातन परंपरेत विविध संप्रदायांची हजारो वर्षांची परंपरा आहे. या भिन्नतेतून एकतेचे अधिष्ठान जन्माला आले आहे. वेगवेगळ्या भागातील जनतेला, वेगवेगळ्या भाषांतून, त्या त्या काळात धर्माचे सार्वत्रिक तत्त्वज्ञान प्राप्त झाले. श्रीराम हे मर्यादेचे, शिस्तीचे व सर्वांप्रति आदराचे प्रतीक ठरले. मी त्यांची कथा प्रथम बालपणात, अमर चित्रकथा मालिकेत वाचली. नंतर भारत, युरोप आणि मध्य-पूर्वेत प्रवचनांमधून ती पुन्हा पुन्हा सांगितली.
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील छपय्या या गावात श्री स्वामिनारायण यांचा जन्म झाला. दरवर्षी लाखो भाविक त्यांच्या शिकवणीस मान देण्यासाठी येथे येतात. केवळ अकराव्या वर्षी घर सोडून त्यांनी संपूर्ण भारताची यात्रा केली. शेवटी ते गुजरातमध्ये स्थायिक झाले. तेथे त्यांच्या सभेत भक्त, तत्त्वज्ञ, राजकीय व सामाजिक प्रतिनिधी, विविध सांस्कृतिक प्रवाहांचे कलावंत, सर्वांसाठी खुले व्यासपीठ होते. हे संवाद २७३ शिकवणींच्या ‘वचनामृत’ ग्रंथात संकलित झाले आहेत.
श्रीस्वामिनारायणांनी श्रीराम व श्रीकृष्ण या दोन परमावतारांना वंदन करून त्यांच्या शिकवणीचा प्रचार केला. हीच ‘अवतार’ संकल्पना. विविधतेतून एकता साधणे हे हिंदू तत्त्वज्ञानाचे खरे सार आहे. त्यांचे कार्य केवळ धर्मशिक्षणापुरते मर्यादित नव्हते, स्त्रियांचे स्थान उंचावण्यासाठी त्यांनी समाजसुधारणाही केल्या. कन्हैयालाल मुंशीसारख्या इतिहासकारांनी त्यांची स्तुती केली आहे. समाजातील अस्पृश्यता, अंधश्रद्धा व रूढी यांचे त्यांनी प्रभावी निर्मूलन केले. त्यांच्या शिकवणींनी भारतच नव्हे तर जगभरातील हिंदू अस्मितेला बळ दिले. आज न्यू जर्सीतील स्वामिनारायण अक्षरधाम, अबूधाबीतील भव्य बाप्स हिंदू मंदिर व दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील नवीन बाप्स मंदिर ही ठिकाणे हिंदू तत्त्वज्ञानाची शिकवण कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवतात.
या मंदिरात, जिथे मी सध्या अबूधाबीतील मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याखाली बसलो आहे, श्रीराम, श्री स्वामिनारायण आणि अनेक देवतांचे एकत्रित वंदन होते. येथे केवळ स्वामिनारायण अनुयायांनाच नव्हे, तर सर्व भाविकांना मग तो कोणत्याही धर्माचा असो, स्वागत व आशीर्वाद मिळतो. येथे फक्त प्रेम, शांती व सामंजस्य शिकवले जाते, जे आज जगाला अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे हिंदू धर्माचे मूलभूत मूल्य येथे प्रत्यक्ष अनुभवता येते.(लेखक अबूधाबी येथील हिंदू बाप्स मंदिराच्या निर्मिती व व्यवस्थापनाचे प्रमुख आहेत.)