शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध आणि ताठ कण्याचा व्रतस्थ अभ्यासक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 07:52 IST

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना जागतिक प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ दि अर्थ’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यानिमित्ताने...

- उदय कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

‘झुकेगा नही सालाऽऽ’ हा ‘पुष्पा’ चित्रपटातील संवाद सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. ‘युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम’तर्फे प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ दि अर्थ’ हा पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना जाहीर झाला, तेव्हा नेमके हेच मनात आले. खुद्द डॉ. गाडगीळ यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना ‘आपण कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता व वस्तुनिष्ठ अभ्यास व तर्कशुद्ध मांडणी यांच्याशी फारकत न घेता आयुष्यभर काम केले’ याचा जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे. छोट्या-मोठ्या मोहांना बळी पडणाऱ्या विद्वानांची देशभरच नव्हे तर जगभर रेलचेल असताना व्रतस्थपणे शाश्वत विकासाचा विचार लोकांसोबत राहून मांडणारे डॉ. गाडगीळ यांच्यासारखे शास्त्रज्ञ हे सन्मानीय अपवाद! पर्यावरणासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्येही जहाल आणि मवाळ, असे दोन गट सुरुवातीपासून आहेत. जहाल गटातील कार्यकर्ते डॉ. गाडगीळ यांची संभावना ‘मवाळ’ अशी करत आले आहेत. 

 नोव्हेंबर १९८७ ते फेब्रुवारी १९८८ या दरम्यान  सहा राज्यांमध्ये शंभर दिवसांची ‘पश्चिम घाट बचाव’ मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेसाठी ख्यातनाम मानववंश शास्त्रज्ञ डॉ. के. सी. मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सल्लागार समिती गठित करण्यात आली होती. पश्चिम घाटाची पर्यावरणीय स्थिती आणि या घाट परिसरात राहणाऱ्या लोकांचे जीवन याबाबतचे वास्तव जाणून घेण्यासाठी ‘चिपको’ आंदोलनाचे चंडीप्रसाद भट, सुंदरलाल बहुगुणा तसेच डॉ. माधव गाडगीळ यांच्या सल्ल्याने कोणती माहिती स्थानिक लोकांशी बोलून संकलित करायची याबाबतची प्रश्नावली व नमुने तयार करण्यात आले होते. सहा राज्यांतील सुमारे एकशे साठ संघटनांचा या मोहिमेत सहभाग होता. पंचाण्णव  दिवस पश्चिम घाट पायाखाली तुडवत कार्यकर्त्यांनी सुमारे सहाशे वाड्या-वस्त्यांमधील रहिवाशांशी संवाद साधून नोंदी केल्या. कन्याकुमारीतून निघालेला जत्था व महाराष्ट्राच्या खान्देश भागातील नवापूर येथून निघालेला जत्था हे दोन्ही जत्थे गोव्यात रामनाथीला पाेहोचले. अहवाल निश्चितीच्या चर्चेत डॉ. गाडगीळ बोलत असताना जहाल गटाचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्यांना शास्त्रीय पायावरील मूलभूत मांडणी ऐकण्यात रस नव्हता, त्यांना आक्रमक कृती कार्यक्रम हवा होता.  डॉ. गाडगीळ शांतपणा ढळू न देता मांडणी करत राहिले. काही जहाल कार्यकर्ते यावर बैठकीचा बहिष्कार करत बाहेर पडले.

डॉ. गाडगीळ यांनी प्रश्न मांडताना नेहमीच जमिनीवर पाय ठेवून शास्त्रशुद्ध, वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध मांडणी केली. डॉ. गाडगीळ यांचा लोकशाही विकेंद्रीकरणावर ठाम विश्वास आहे. साहित्यातील दर्दी असल्याने मराठी साहित्यातील काव्यात्म संदर्भ देत सोप्या मराठीमध्ये ते पर्यावरणासारखा व जीवशास्त्रासारखा विषय सामान्य माणसापर्यंत पोहोचवू शकतात. पर्यावरणाचा व लोकांचा विचार न करता शासन व प्रशासनाने धोरणे निश्चित केली तर त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात, हे डॉ. गाडगीळ ठामपणाने सांगतात. केरळमधील वायनाडची दुर्घटना असो की महाराष्ट्रात दरडी कोसळून जीवित व वित्तहानी घडण्याचे प्रकार असोत; डॉ. गाडगीळ या आपत्तींची कारणे पुन:पुन्हा सांगत आहेत. केवळ जास्त पाऊस हे यामागील कारण नाही, तर विकासाच्या नावावर संपूर्ण पश्चिम घाट आपण खिळखिळा केला आहे. बेबंदपणे डोंगराळ भागात रिसॉर्ट्स उभारून श्रीमंत पर्यटकांसाठी त्यात कृत्रिम जलतरण तलाव केले जात आहेत. खाणी, बोगदे यांचा मोह अजूनही सुटत नाही. अशा बाबींमुळेच २०१३ साली डॉ. गाडगीळ समितीने पश्चिम घाट संरक्षण व संवर्धनासाठी उपाय सुचविणारा जो अहवाल दिला तो बासनात गुंडाळून ठेवण्यात आला. नव्याने डॉ. कस्तुरीरंगन समिती नेमली; पण तिचा विसविशीत अहवालही सत्ताधाऱ्यांना गैरसोयीचा वाटला. अजूनही पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील या श्रेणीत घातलेली पश्चिम घाटातील गावे आणि वाड्या-वस्त्या या श्रेणीतून वगळण्यासाठी आटापिटा सुरूच आहे.

या सगळ्या घडामोडी घडत असताना डॉ. माधव गाडगीळ यांनी आपली भूमिका बदलावी, काही बाबतीत तडजोडी कराव्या, असे दडपण डॉ. गाडगीळ यांच्यावर अनेकदा आले; पण अर्थशास्त्रज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचा हा मुलगा वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीदेखील पाठीचा कणा ताठ ठेवून आहे.- आणि म्हणूनच डॉ. गाडगीळ ‘चॅम्पियन्स ऑफ दि अर्थ’ या पुरस्कारास सर्वार्थाने पात्र आहेत. तरुणांनी त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला हवा!    udaykd@gmail.com

टॅग्स :environmentपर्यावरण