- योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोडो अभियान सदस्य, स्वराज इंडिया
जगाच्या तख्तावर एक नवा राजा आलाय. खट आहे, उद्धट आहे, बदनामही आहे; पण शेवटी राजा आहे. सर्वत्र हाऽऽ गोंधळ माजला आहे. राजाच्या शीघ्रकोपी स्वभावामुळे सर्वांची गाळण उडाली आहे. आरंभी त्याच्या राज्यारोहण समारंभाच्या आमंत्रणासाठी चढाओढ लागून राहिली होती. आता तो कुणाला, कधी आणि कसे दर्शन देईल, याबाबत स्पर्धा चाललीय. ठिकठिकाणचे सुभेदार आमंत्रणासाठी रांगा लावून उभे आहेत. कोणे एकेकाळी साम्राज्यवादाविरुद्ध जोरदार आवाज उठवणाऱ्या, तिसऱ्या जगाला संघटित करण्याचे धैर्य दाखवणाऱ्या; पण आता गेली काही दशके ते सारे सोडून देऊन, बलवानाशी त्याच्या अटींवर करारमदार करायला शिकलेला आपला प्रिय देशही या रांगेत उभा आहे.
नवा राजा मनमानी आहे. ग्रीनलँड विकत घेणे, कॅनडाला घटकराज्य बनवणे, गाझा ताब्यात घेणे - असले काहीही बेधडक बोलतो. दक्षिण आफ्रिका सरकारला तेथील गोऱ्यांच्या हक्कांसाठी धमकावतो; पण आम्हाला फक्त आमच्या सौद्याची चिंता आहे. राज्यारोहण समारंभाचे नाही, पण सांत्वनपर बक्षिसी म्हणून एक दिवसाच्या अमेरिका दौऱ्याचे आमंत्रण तेवढे भारताच्या पदरात पडले. आपल्या दरबाराला प्रचाराची संधी मिळाली. वृत्तपत्रे, टीव्ही आणि व्हॉट्सॲप भरभरून वाहायला एवढी सामग्री पुरे होती. हा हळवा कोपरा अमेरिकनांना नीट माहीत होता. फोटो चांगला आला पाहिजे, मग हवा तर खिसा कापा किंवा गळा!
सुदैवाने गळा कापण्याची वेळ आली नाही. चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेला आपली गरज आहे. आपले स्वस्तात राबणारे इंजिनिअरही त्यांना हवेत आणि आपली बाजारपेठ तर हवीच हवी. मात्र, हे सगळे त्यांना स्वतःच्या अटींवरच हवे. अमेरिकी प्रशासनाने ते खुलेआम स्पष्ट केले. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी राजनैतिक शिष्टाचारात वर्ज्य असलेल्या सगळ्या गोष्टी अमेरिकेने आपल्या बाबतीत करून दाखवल्या. बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना बेड्या घालून, पवित्र पगडी काढायला लावून अपमानास्पदरीत्या भारतात परत पाठवले. पंतप्रधानांनी अमेरिकेत पाऊल ठेवले त्याच दिवशी ट्रम्प यांनी परस्परसमान आयात कर आकारण्याची धमकी दिली. हा सरळ सरळ इशारा होता- साहेबांचा मूड बिघडलाय, सर्वच वाटाघाटी अत्यंत कडवेपणाने केल्या जातील!
चर्चा कशाकशावर झाली, कशी झाली हे गुपित पुढे केव्हा तरी समोर येईल. भारत आणि अमेरिकेने व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि लोकसहयोग या क्षेत्रांतील आपले संबंध अधिक दृढ करण्याचा पुन्हा एकदा संकल्प केला. परस्परातील व्यापार दुपटीहून अधिक व्हावा म्हणून दोन्ही देशांनी येत्या काही महिन्यांत एक नवा व्यापारी करार करण्याची घोषणा केली. बेकायदेशीर स्थलांतर पूर्णतः थांबवण्यासाठी आणि कोणतेही गुन्हेगारी कृत्य रोखण्यासाठी परस्पर सहकार्याचे दोन्ही पक्षांनी अभिवचन दिले. वगैरे, वगैरे, वगैरे.
परंतु या साऱ्या मखलाशीचा भावार्थ लक्षात घेतला तर मधुर शब्दांमागच्या सौदेबाजीचा अंदाज आपल्याला येऊ लागतो. भारतातून होणाऱ्या आयातीवर भरभक्कम कर आकारण्याची धमकी अमेरिकेने दिली. त्यावर आपण थोडी मुदत मागितली. बरीच सौदेबाजी झाली. शेवटी भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि इंधन विकत घेईल, असा तोडगा निघाला. येत्या सहामाहीत त्याबाबत करार होईल. या करारात कृषी क्षेत्रातील खरेदीचा समावेश व्हावा, असा प्रयत्न अमेरिका जरूर करेल. आपल्या शेतकऱ्यांना याची झळ सोसावी लागू शकेल. सारांश अमेरिकेच्या अटी आपण मान्य केल्या, फक्त काही मुदत तेवढी आपल्याला मिळाली. या निवेदनात अमेरिका बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना देत असलेल्या वागणुकीचे नावसुद्धा काढलेले नाही. याचा अर्थ अशा २ ते ५ लाख लोकांना अमेरिका आता मर्जीनुसार परत धाडू शकेल. गुन्हेगारी कारवाया थांबवण्यासाठी सहकार्य करणे या जुमल्याचा सरळ अर्थ हाच की यापुढे भारतीय सुरक्षा यंत्रणा अमेरिकेत शिरकाव करून कोणतीही लुडबुड करू शकणार नाहीत. याबाबत कॅनडासमोर आम्ही कितीही फुरफुरत असलो तरी अमेरिकेपुढे तोंड मिटून बसू. याहीबाबत अमेरिकेचीच जीत झाली.
गेली दहा वर्षे भारताचे पंतप्रधान स्वदेशातील पत्रकार परिषद टाळत आले आहेत; पण अमेरिकेने पुन्हा एकदा, माध्यमांपुढे येणे त्यांना भाग पाडले. भारतातून गेलेल्या पत्रकारांनी या पत्रकार परिषदेत खुशामतखोरी केली खरी; पण अमेरिकेत चालू असलेल्या भ्रष्टाचारविषयक खटल्यातून अदानींची सुटका करण्याविषयी काही ठरले का, असे अमेरिकन पत्रकारांनी थेटच विचारले. पंतप्रधानांनी प्रसंग कसाबसा निभावून नेला, तरीही पाणी कुठेतरी मुरत असल्याचे चित्र जगाला दिसले. भारत अमेरिकेकडून एफ ३५ जातीची लढाऊ विमाने खरेदी करणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
आपल्या सरकारने अशा प्रकारच्या खरेदीला अद्याप सुरुवातसुद्धा केलेली नाही. मुळात हे विमान आपल्या लष्करी गरजांना अनुरूप नाही. शिवाय प्रत्यक्ष इलाॅन मस्क यांनीच या विमानाला टाकाऊ म्हटले आहे.स्थावर मिळकतीच्या व्यवसायात असलेले ट्रम्प देवघेवपटू म्हणून ओळखले जातात. तर यावेळी वॉशिंग्टनमध्येही एखादी गुप्त ‘देवघेव’ झाली असेल काय? - सध्यातरी या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ठाऊक नाही. आणि ज्यांना ते माहीत आहे ते म्हणताहेत , ‘‘ये दुनियावाले पूछेंगे, मुलाकात हुई, क्या बात हुई? ये बात किसीसे ना कहना!” yyopinion@gmail.com