५० हजार वर्षांचे सीक्रेट: निअंदरथल-सेपियन्स भाई भाई!
By Shrimant Mane | Published: October 8, 2022 08:22 AM2022-10-08T08:22:53+5:302022-10-08T08:23:24+5:30
उत्क्रांत होत जाणाऱ्या मानव प्राण्याच्या जनुकांचा लाखो वर्षांचा मागोवा घेण्याचे नवे शास्त्र स्वान्ते पेबो यांनी जगाच्या हाती दिले. त्यांचे हे संशोधन अद्वितीय आहे.
- श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर
विद्वत्तेला, ज्ञानाला, अलौकिक कार्याला नोबेलच्या रूपाने जिथून सलाम केला जातो, त्या स्वीडनने यंदा शरीरविज्ञानातील थोर नोबेल विजेता जगाला दिलाय. स्वान्ते पेबो हे त्यांचे नाव. बरोबर चाळीस वर्षांपूर्वी त्यांचे वडील सुन बर्गस्ट्रोम यांनाही संयुक्तरित्या शरीरविज्ञानाचे नोबेल मिळाले. वेगळा कंगोरा हा, की स्वान्ते हे त्यांचे विवाहबाह्य अपत्य. आईने वाढविलेल्या स्वान्ते पेबो यांनी जगाच्या हाती, उत्क्रांत होत जाणाऱ्या मानवप्राण्याच्या जनुकांचा हजारो, लाखो वर्षांचा मागोवा घेण्याचे नवे शास्त्र दिले. निअंदरथल या आम्हा सेपियन्सच्या सर्वांत जवळच्या भावंडांबद्दलचे त्यांचे संशोधन अद्वितीय आहे.
हे सारेच प्रचंड रोमांचकारी आहे. तसेही माणसाला आपण कोण, कोठून आलो, पूर्वज कोण, वगैरेंचे कमालीचे कुतुहल असतेच. आता तमाम मनुष्यप्राण्यांची जात एकच असली तरी कधी काळी चार-सहा मानवजातींचा पृथ्वीवर रहिवास होता. काही जाती तर एकाचवेळी शेजारीशेजारी राहात होत्या. त्याच्या वीसेक लाख वर्षे आधी होमो हबिलीसपासून माणसांच्या जातींचा प्रवास सुरू झाला. नंतर होमो इरेक्टस उत्क्रांत झाले. सध्याचे आपण होमो सेपियन्स. आपली सर्वांत जवळची जात म्हणजे निअंदरथल. होमो सेपियन्स आफ्रिकेत तर होमो निअंदरथल युरोपमध्ये एकाचवेळी वास्तव्याला होते.
माणसाच्या उत्क्रांतीचे जनुकीय मोजमाप हे स्वान्ते पेबो यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य. १९८४ साली त्यांनी २४०० वर्षे जुन्या इजिप्शियन ममीची जनुकीय रचना व त्यापुढे अगदी मानवी जीवाश्मातील जनुके शोधून काढण्याचे तंत्र शोधले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात सापडलेले निअंदरथल प्रजातीच्या आणि सायबेरियातील डेनिसोवा गुफांमधील मानवी जीवाश्मातील जनुकांचा अभ्यास, संपूर्ण जनुकीय रचना सिद्ध करण्याचे त्यांचे काम निव्वळ अदभूत आहे.
तथापि, पेबो यांच्या संशोधनाचा खरा धक्का वेगळाच आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी कोविड महामारीने जग कवेत घेतले. कोट्यवधी लोक संक्रमित झाले. लाखोंचे बळी गेले. दक्षिण यूरोपमध्ये स्थिती चिंताजनक का होती? मध्यपूर्वेत किंवा दक्षिण आशियातील महामारी अधिक जीवघेणी का होती? जपानमधील ओकिनावा इन्स्टिट्यूटसाठी ह्युगो झेबर्ग व स्वान्ते पेबो यांनी केलेल्या संशोधनात आढळले, की होमो निअंदरथलचा जनुकीय अंश ज्या टापूतल्या होमो सेपियन्समध्ये आहे, तिथे हॉस्पिटलायझेशनची गरज अधिक आहे. विषाणू बाधेच्या सौम्य किंवा तीव्र लक्षणासाठी, हॉस्पिटलमध्ये भरतीसाठी किंवा व्हेंटिलेटरसाठी वय, प्रतिकारशक्ती, सहव्याधी या गोष्टी कारणीभूत असल्या तरी त्याहून मोठे जनुक हे कारण आहे. गुणसूत्रांमध्ये निअंदरथल व्हेरिएंट असलेल्यांना इतरांपेक्षा काेविडचा धोका तिपट्ट आहे.
माणसांची जनुकीय रचना, डीएनए आणि गुणसूत्रे, साधारण बावीस व एक लिंग गुणसूत्र अशा गुणसूत्रांच्या तेवीस जोड्या, अनुवंशिकता, वडिलांकडून मुलाकडे व आईकडून मुलीकडे गुणधर्मांचा प्रवास, मॅटडीएनएचे महत्त्व, हे साऱ्यांना माहिती आहेच. पेबो व झेबर्ग यांनी गुणसूत्रांचा कोविड संक्रमणावरील प्रभाव शोधला. तेव्हा आढळले, की सौम्य व तीव्र कोविडची गोम सेपियन्सच्या गुणसूत्र क्रमांक ३ मध्ये आहे. निअंदरथल व्हेरिएंटचा सेपियन्सच्या आजारावर परिणाम होतो. हा व्हेरिएंट एकतर आठ लाख वर्षांपूर्वी दोन्ही जातींच्या सामाईक पूर्वजांकडून निअंदरथल व सेपियन्स या दोन्हीमध्ये आला असावा अथवा पन्नास हजार वर्षांपूर्वी माणसांच्याच या दोन्ही जातींचा एकमेकांशी संपर्क झाला असावा. शरीरसंबंध आले असावेत. यूरोपीय, निम्मे दक्षिण आशियाई, एक तृतिआंश बांगलादेशींमध्येही ते अंश आहेत. सायबेरियातील डेनिसोवा गुफांमध्ये सापडलेल्या मानवी जीवाश्मांमध्ये निअंदरथलचे सर्वाधिक अंश आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"