शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

379 निरपराध व नि:शस्त्र स्त्री-पुरुषांच्या निर्घृण हत्येची क्षमायाचना नव्हे, माफी मागावी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 4:58 AM

जालियनवाला बागेत दि. १३ एप्रिल, १९१९ या दिवशी नृशंस हत्याकांड घडवून, त्यात ३७९ निरपराध देशभक्तांचा जनरल डायर या ब्रिटिश अधिकाऱ्याने बळी घेतला.

जालियनवाला बागेचे स्मारक उभे झाले ते जनतेच्या पैशाने आणि गांधीजींच्या प्रयत्नाने. आता त्या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा त्या प्रकाराची उपरती झालेल्या इंग्लंडच्या सरकारने पंतप्रधान तेरेसा मे यांच्याकडून भारताची क्षमायाचना केली आहे.जालियनवाला बागेत दि. १३ एप्रिल, १९१९ या दिवशी नृशंस हत्याकांड घडवून, त्यात ३७९ निरपराध देशभक्तांचा जनरल डायर या ब्रिटिश अधिकाऱ्याने बळी घेतला. त्यासाठी अवघ्या दहा मिनिटांत त्याने १६५० गोळ्यांच्या फैरी त्यांच्यावर झाडल्या. त्या घटनेचा पश्चात्ताप आता १०० वर्षांनी इंग्लंडच्या सरकारने व्यक्त केला आहे. जालियनवाला बाग हे क्षेत्र अमृतसरच्या सुवर्ण मंदिरासमोरच त्याच्या उजव्या हाताला आहे. त्याच्या आत जाणारा एकच अरुंद बोळ आहे. डायरने या बोळाच्या तोंडाशी एक तोफ उभी केली आणि बागेत सुरू असलेल्या स्वातंत्र्यवादी स्त्री-पुरुषांच्या सभेवर त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, गोळ्यांचा वर्षाव करण्याची आज्ञा आपल्या शिपायांना दिली. त्या अंदाधुंद गोळीबारापासून कुणाची सुटका नव्हती आणि बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. अनेक जण डायरच्या गोळ्यांना बळी पडले, तर काहींनी तेथील विहिरीत उड्या घेऊन आपले प्राण दिले. या बागेभोवतीच्या भिंतींवर डायरच्या गोळ्यांच्या खुणा आजही पाहता याव्यात, अशा आहेत. हा गोळीबार संपवून डायर ज्या रेल्वेने दिल्लीला परतला, त्या रेल्वेच्या त्याच डब्यातून तरुण नेहरूही प्रवास करीत होते. डायर हा आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना त्याच्या ‘अमानुष’ पराक्रमाची गाथा फुशारकीने ऐकवत होता आणि त्याच गोळीबाराच्या भीषणतेची कल्पना येत गेलेले नेहरू हादरत व संतापाने थरथरत राहिले.

सकाळी डायर दिल्लीच्या स्टेशनवर उतरला, तेव्हा त्याच्या अंगात पिवळ्या रंगाचा नाइट सूट होता... काँग्रेस पक्षाने या हत्याकांडाची चौकशी करण्याची जबाबदारी मोतीलालजींवर सोपविली. काही काळ हे काम केल्यानंतर त्यांनी ते पुढे नेण्यासाठी गांधीजींना बोलावून घेतले. गांधींच्या अमृतसरमधील प्रवेशाला सरकारने संमती द्यायलाच फार उशीर केला. मात्र, ती मिळाल्यानंतर गांधीजी तेथे दीर्घकाळ मुक्काम करून राहिले आणि त्या हत्याकांडाचा व नंतर डायरच्या हुकुमानुसार जनतेवर करण्यात आलेल्या जुलुमांचा सारा तपशील सांगणारा शेकडो पृष्ठांचा अहवाल त्यांनी तयार केला. अमृतसरच्या स्त्री-पुरुषांनी रस्त्यावरून चालत न जाता, चार पायांवर जनावरासारखे किंवा सापासारखे सरपटत व घुसत जावे, असाच कमालीचा अपमानकारक आदेशही त्याने दिला होता. त्याचा भारताएवढाच साºया जगाने निषेध केला. इंग्लंडच्या पार्लंमेंटने डायरला चौकशीसाठी बोलविले, तेव्हा त्याचा उद्दामपणा कायमच होता. ‘मी हे ठरवून केले आणि आपल्याजवळ तोफखाना असता, तर तोही मी चालविला असता,’ असे त्यावेळी तो म्हणाला.
इंग्लंडच्याही इतिहासाला काळे फासणारा हा माणूस आहे, अशी टीका तेव्हा तेथील वृत्तपत्रांनी केली. भारतीय स्वातंत्र्याला अखेरपर्यंत विरोध करणारे सर विन्स्टन चर्चिलही या घटनेने हादरले होते. त्यांनी या डायरचे वर्णन ‘सडलेले सफरचंद’ असे आपल्या लेखात केले. इंग्लंडच्या स्त्रियांनी मात्र सोन्याची तलवार देऊन डायरचा सन्मान केला. १८५७च्या युद्धात ब्रिटिश स्त्रियांची जी हत्या झाली, त्याचा डायरने सूड घेतला, ही त्यामागची त्यांची अनाकलनीय भावना होती. ब्रिटिश सरकारने डायरला परत बोलावले. पुढे त्याचा १३ मार्च, १९४० या दिवशी स्वातंत्र्य सैनिक उधमसिंग याने इंग्लंडच्या कस्टन हॉलमध्ये खूनच केला. जालियनवाला बागेतील हत्याकांडाने सारा देश जागविला व त्याला स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी एकत्र आणले. या हत्याकांडाचे स्मारक बनविण्यासाठी गांधीजींनी देशबांधवांकडे देणग्या मागितल्या. त्या पुरेशा आल्या नाहीत, तेव्हा ‘तुम्ही पैसे देणार नसाल, तर मी साबरमती आश्रमाचा लिलाव करून पैसे उभे करेन आणि हे स्मारक बांधीन,’ असे त्यांनी देशाला ऐकविले. हा माणूस बोलतो तसे करतो, हे तोवर ठाऊक झालेल्या देशाने मग त्यांना भरभरून देणग्या दिल्या. त्यातून जालियनवाला बागेचे स्मारक उभे झाले ते जनतेच्या पैशाने आणि गांधीजींच्या प्रयत्नाने. आता त्या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा त्या प्रकाराची उपरती झालेल्या इंग्लंडच्या सरकारने पंतप्रधान तेरेसा मे यांच्याकडून भारताची क्षमायाचना केली आहे. एवढ्या वर्षांनी त्या भीषण घटनेची अशी उपरती होणे हा प्रकार दांभिक म्हणावा असा आहे. शिवाय ३७९ निरपराध व नि:शस्त्र स्त्री-पुरुषांच्या निर्घृण हत्येची अशी साधी माफी मागणे पुरेसेही नाही. देशाचे स्वातंत्र्य मागण्यासाठी ब्रिटिश सत्तेशी हाती शस्त्र न घेता लढलेल्या व मृत्यू पावलेल्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांचीही इंग्लंडने अशी माफी मागणे आता आवश्यक आहे. १९४२च्या ‘चले जाव’ या संग्रामात सरकारच्या मते ९०० हून अधिक स्त्री-पुरुष मारले गेले. नेहरूंचा त्याविषयीचा अंदाज १० हजारांवर जाणारा आहे. त्या आधीचे सत्याग्रह, असहकाराचे आंदोलन, सविनय सत्याग्रह, दांडीचा संग्राम, शिवाय देशाच्या अनेक भागांत लोकांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेले स्वातंत्र्याचे लढे ब्रिटिशांच्या दमनकारी सत्तेने पार चिरडून टाकले. वायव्य सरहद्द प्रांत हा या लढ्यात सरहद्द गांधींच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या पठाणांचा प्रदेश आहे. पठाणांचा इतिहास हिंसाचाराचा व युद्धाचा आहे. डोळ्यासाठी डोळा आणि प्राणासाठी प्राण घेणे ही त्यांची परंपरागत मानसिकता आहे. मात्र, गांधीजींच्या प्रभावामुळे या पठाणांनीही ब्रिटिशांच्या गोळ्या छातीवर घेतल्या आणि देशभक्तीची गाणी म्हणत प्राण सोडले. या साºया देशभक्तांच्या प्राणत्यागाची पूर्ण माहिती घेऊनच, ब्रिटिशांनी त्याविषयीचा आपला पश्चात्ताप आता व्यक्त केला पाहिजे. इतिहासाने शेकडो लढाया पाहिल्या. त्यात दोन्ही बाजूंनी लढणारी माणसे हाती शस्त्रे घेतलेली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे वैशिष्ट्य हे की, यात सरकारच्या हाती शस्त्रे आणि लढणाºयांचे हात रिकामे होते. गांधीजींच्या जीवनावर एक अद्वितीय चित्रपट काढणारे पाश्चात्त्य निर्माते व दिग्दर्शक सर रिचर्ड अ‍ॅटनबरो म्हणाले होते, ‘आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाती तलवार घेऊन लढणारे लोक व नेते जगात सर्वत्र झाले. मात्र, स्वातंत्र्यासाठी हाती तलवार न घेणारे लोक व लोकनेते फक्त भारतात झाले. त्यांचा त्याग अधोरेखित करण्यासाठी मी हा चित्रपट तयार केला.’ जालियनवाला बागेत जमलेले लोक स्वातंत्र्याची मागणी करणारी सभा घेणारे होते. ती सभा नि:शस्त्र होती. तिची सरकारला पूर्वकल्पना देण्यात आली होती, शिवाय या सभेला सरकारची परवानगीही होती. या पार्श्वभूमीवर बागेच्या बंद जागेत अडकलेल्या लोकांना टिपून ठार मारण्याचे जन.डायरचे कृत्य केवळ अमानुषच नव्हे, तर जगाला कायम अस्वस्थ करणारे राहणार आहे. या बागेला आपण भेट देतो, तेव्हा तिच्या नुसत्या दर्शनानेही आपल्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. ही बाग आजही तशीच राखली गेली आहे. तिच्यात प्रवेश करण्यासाठी असलेला अरुंद बोळही तसाच आहे. बागेभोवतीच्या भिंतींवर बंदुकांच्या गोळ्यांचे व्रण कायम आहे. या व्रणांभोवती काचेच्या चौकटी आता बसविण्यात आल्या आहेत. ते व्रण नुसते पाहिले, तरी त्या गोळीबारातील गोळ्यांच्या खोलवर घुसण्याच्या क्षमतेची कल्पना येते. ज्या विहिरीत स्त्री-पुरुषांनी उड्या घेऊन प्राण दिले, त्या विहिरीही तशाच आहेत. पाहणाºया कोणत्याही संवेदनशील माणसावर कायमच्या देशभक्तीचा संस्कार करणारे ते ठिकाण आहे. माणसे त्यासमोर आपोआप नम्र होतात आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या पिढीने केलेल्या त्यागाचे कृतज्ञ स्मरण करतात. गेल्या काही वर्षांत आपण इतिहासात केलेल्या अशा पापकृत्यांचे स्मरण करण्याची एक चांगली परंपरा निर्माण होऊ लागली आहे. तिचा आरंभ आॅस्ट्रेलियाने केला. त्या खंडात राहणाºया मूळ आदिवासींचा समूळ नायनाट करून, तेथे राहायला गेलेल्या गोºया लोकांनी आजचा आॅस्ट्रेलिया हा देश वसविला आहे. त्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या या रक्तरंजित व अन्यायकारी इतिहासासाठी मूळ आॅस्ट्रेलियन आदिवासींची माफी मागितली आहे. त्यानंतर, अमेरिकेतील रेड इंडियन्सच्या हत्येविषयीचा असा पश्चात्ताप अमेरिकेच्या सरकारने व्यक्त केला आहे. आता तो कित्ता इंग्लंडने गिरविला आहे. मात्र, तो पुरेसा नाही. ज्या प्रदेशाच्या रक्षणाची व विकासाची प्रतिज्ञा त्याने केली, त्याचाच नायनाट करण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह म्हणावा असा आहे.