ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात नसतात त्या सोडून द्यायच्या नसतात. त्या स्वत: प्रयत्न करून मिळवायच्या असतात. हिदर आणि अन्या या इंग्लंडमधील दोघी बहिणी. त्यांनी मे २०२४ मध्ये लिलावात १,७८,६८६ डाॅलर्सला एक घर विकत घेतलं. या घराच्या चाव्या त्यांना ऑगस्ट महिन्यात मिळाल्या. त्यांना वाटलं घराच्या भिंती लिंपल्या, रंगरंगोटी केली, जमिनीवर नवीन कार्पेट टाकलं; तर हे जुनं घर नव्यासारखं होईल. पण, त्या घराचं तसं नव्हतं. घराचा कोपरा न कोपरा दुरुस्त करावा लागणार होता. वायफळ गोष्टींवर पैसे उडवणाऱ्यातल्या त्या नव्हत्या. पण, घराची दुरुस्ती कम नूतनीकरण करणं गरजेचंच होतं. त्यांनी बिल्डरला आणून घर दाखवलं. थोडा पाडकामाच्या खर्चाचा अंदाज घेतला. बिल्डरने घरातली शेकोटी खोदून बाहेर काढण्याचं बजेट २५५ डाॅलर्स सांगितलं.
बिल्डरला काम सोपवून घराची दुरुस्ती आणि नूतनीकरण हे त्यांना फारच महागात पडणार होतं. मग हिदर आणि अन्याने आपणच हे काम करायचं असं ठरवलं आणि दोघी छिन्नी हातोडा घेऊन कामाला लागल्या. हिदर ही एका कॅफेमध्ये काॅफी सर्व्ह करते आणि सोबत बाॅनमाउथ येथील एका एचआर कंपनीत आहे. बाह्या सरसावून दोघीही घराची दुरुस्ती करायला भिडल्या. कित्येक महिने काम केल्यानंतर घराने जे रुप धारण केलं ते बघताना आज दोघींनाही स्वत:चा अभिमान वाटतो आहे. प्लम्बिंग, इलेक्ट्रिक वायरिंग यासारखी मोजकी कामं सोडून बाकी इतर सर्व कामं या दोघींनी स्वतःच्या हाताने करून तब्बल १०,२१० डाॅलर्स वाचवले. गवंडीकाम, सुतारकाम, रंगरंगोटी अशी सर्व कामं या दोघी बहिणींनीच केली.
बांधकाम क्षेत्रातला दोघींचाही अनुभव शून्य. पण टिकटाॅक व्हिडीओ, यूट्यूब व्हिडीओ आणि चॅटजीपीटी यांची मदत घेऊन त्यांनी काम सुरू केलं. घराचं प्रवेशद्वार अगदीच मोडकळीला आलेलं होतं. ते काम हिदरने तिच्या मैत्रिणीच्या भावाच्या मदतीनं केलं. दारं खिडक्यांच्या चौकटी हिदरने बसवल्या. बाथरूममधील टायलिंगचं कामही तिनेच केलं. हिदर ऑफिसला जाण्याआधी आणि ऑफिसमधून आल्यानंतर असे आठवड्यातले तीस तास या कामासाठी काढले, तर अन्याने आपला अभ्यास आणि परीक्षा सांभाळून आठवड्यातले १० तास घरासाठी काम केले. पेंटर किती पैसे घेईल याचा अंदाज नसल्याने अन्याने घराला स्वत:च रंग दिला. खिडक्यांच्या चौकटी बनवणे, बसवणे ही कामं त्यांनी यूट्यूबवरचे व्हिडीओ पाहून, चॅटजीपीटीला प्रश्न विचारून पूर्ण केली. या दोघींची धडपड बघून एका कंपनीने त्यांना रंग मोफत उपलब्ध करून दिला. वेअर हाउसकडून त्यांना सजावटीचे सामान आणि टाइल्स सवलतीत उपलब्ध झाल्या. पाडकाम आणि बांधकाम यासाठी लागणारं साहित्य, यंत्रसाधनं या गोष्टी एका कंपनीने त्यांना भाड्याने उपलब्ध करून दिल्या.
आता महिनाभरात त्यांचं घराचं काम पूर्ण होणार आहे. या कामाने हिदरला तर आपण सर्व कामं सोडून ‘होम रिनोव्हेशन’ याच क्षेत्रात काम करण्यासाठी उतरावं असं वाटू लागलं आहे. कोण म्हणतं स्वप्नं पूर्ण करण्याला पैसे लागतात म्हणून ! इच्छाशक्ती दांडगी असेल, शिकण्याची वृत्ती असेल, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून बांधकामाचे धडे घेऊन आपण आपलं घर नव्याने उभं करू शकतो, हे हिदर आणि अन्याने दाखवून दिलं आहे.