धुळे : कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे भल्याभल्यांचे अर्थचक्र थांबले होते. महानगरात मिळालेले काम बंद झाल्याने गावाकडे परतलेल्या तरुणांसह अनेक कुटूंबे शेतीकामासह रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करताना दिसली. सुदैवाने आता परिस्थिती रुळावर आली आहे.ग्रामीण भागातील अनेक कुटूंबे रोजगारासाठी मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, अहमदाबाद अशा शहरांमध्ये स्थलांतरीत झाली होती. पंरतु लाॅकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने रोजगार बंद पडला. पुन्हा कधी सुरू होईल याची कल्पना नसल्याने ही कुटूंबे आणि तरुणही गावाकडे परतले. बेरोजगार झालेल्या या तरुणांना गावात रोजगार हमी योजनेत काम मिळाले. तर कुटूंबातील महिला शेतशिवारांमध्ये काम करताना दिसल्या. लाॅकडाऊन काळात हे चित्र सर्वत्र सारखे होते आणि ग्रामीण भागामध्ये हा विषय अतीशय चर्चेचा ठरला होता. प्रशासनाने रोजगार हमी योजनेची कामे वाढविल्याने या तरुणांना रोजगार मिळाला.दरम्यान, शासनाने अनलाॅक केल्यापासून उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. अनेकांना पुन्हा रोजगार मिळाला आहे. गावी आलेले तरुण आणि इतर कुटूंबे पुन्हा शहरात परतली आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे सध्या कमी झाली आहेत. परंतु ज्यांना अजुनही रोजगार मिळाला नाही त्यांना याच कामांचा दिलासा आहे.वर्षात रोहयोची कामे वाढली लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील असंख्य कामगार गावाकडे परतले होते. अशा परिस्थितीत त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रोहयोची कामे सुरू केली होती. मे २०२० मध्ये २४३१ कामांवर ११ हजार ८०० मजूर होते तर जूनमध्ये पावसाळा लागल्याने कामांची संख्या १३४७ वर आली होती. त्यावेळी ६८३२ मजूर कामावर होते. गेल्या वर्र्षीच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे. पंरतु आता नोव्हेंबरमध्ये केवळ २६५ कामे आहेत.गावात काम नसल्याने गुजरातमधील सुरत शहरात चांगले काम मिळाले होते. लाॅकडाऊनमध्ये काम बंद झाल्याने पुन्हा गावाकडे परतलो. गावात आल्यावर रोजगार हमी योजनेत काम मिळाले. त्यामुळे लाॅकडाऊनमध्ये पोटापाण्याचा प्रश्न सुटला. - सोमनाथ सोनवणे, रोहयो कामगार,लाॅकडाऊनमध्ये कुणीही बेरोजगार राहू नये अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात रोहयो कामांची संख्या वाढविण्यात आली. मागेल त्याला काम देण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. परंतु आता शहरांमध्ये पुन्हा रोजगार मिळाल्याने मजुर कमी झाले आहेत.- गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी, रोहयो
लाॅकडाऊनमध्ये गावात परतलेले तरुण रोजगार हमी योजनेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 22:33 IST