धुळे : येथील लळिंग किल्ल्यावर ११ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या काही विविध संस्थांनी एकत्र येऊन शुक्रवारी सकाळी लळींग किल्ल्यावर जमुन पर्वत पूजन करण्यात आले.या प्रसंगी निसर्ग प्रेमी व पक्षी अभ्यासक डॉ. विनोद भागवत म्हणाले की, पर्वत हा निसर्गाचा महत्त्वपूर्ण भाग असून पर्वत क्षेत्रात असणाऱ्या विविध इकोसिस्टीम कार्यरत असतात. त्यामुळे पर्यावरणातील संतुलन योग्य राखले जाते. सर्वच नद्यांचा उगम पर्वत क्षेत्रात होत असतो. त्यामुळे आपल्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी पर्वत क्षेत्राचे पर्यावरण व त्यात असणाऱ्या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन होणे अतिशय महत्त्वाचे आहे. संयुक्त राष्ट्र संघाने "पर्वतावरील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन" हे घोषवाक्य जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व सामान्य जनतेत याविषयी जनजागृती होणे गरजेची आहे. पर्वतीय प्रदेशात असणाऱ्या जैवविविधतेमुळे मानवाला अनेक फायदे मिळत असतात. त्यात औषधी वनस्पती, शुद्ध पाणी, शुद्ध हवा, व इतर अनेक लाभ मिळत असल्यामुळे अशा पर्वतीय जैवविविधतेचे रक्षण करणे अत्यावश्यक ठरते. लळिंग किल्ला परिसरात आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ जिल्हा यांचे सदस्य अनिकेत चौधरी, वैभव बेडसे, मयुर तमखाने, यश ईशी तसेच निसर्ग मित्र समिती चे आकाश बोरसे, राकेश जाधव, अमित भामरे तसेच निसर्ग वेध स्वयंसेवी संस्थेचे विनोद भागवत, प्रेमचंद अहिरराव, गोकुळ पाटील आणि राकेश जाधव यांनी सहभाग घेतला.
पर्यावरण प्रेमींनी केले लळींग किल्ल्याचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 20:47 IST