वेबिनारचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. एन.पी. वाडिले यांच्या हस्ते धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. वेबिनारला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. ए.डी. वळवी (पी.आर. हायस्कूल संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव) हे ऑनलाइन उपस्थित होते. डॉ. वळवी म्हणाले की, आदिवासी संस्कृती ही प्राचीन, वैशिष्ट्यपूर्ण व आगळीवेगळी आहे. आदिवासी संस्कृतीत निसर्ग पूजनाला महत्त्व असल्यामुळे जल, जमीन व वृक्ष यांची पूजा केली जाते. गावावर अरिष्ट येऊ नये याकरिता वाघ, साप यांचे प्रतीकात्मक पूजन केले जाते. अशा विविध प्रथांमुळे आदिवासी संस्कृती ही निसर्गपूजक असल्याचे सिद्ध होते. आदिवासी संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे वाक्प्रचार, म्हणी, उखाणे, गाणी आहेत; पण आदिवासी संस्कृतीची वेगळी लिपी नसल्याने त्यांचा व्यापक प्रमाणात प्रसार होऊ शकला नाही. वर्तमान काळात नागरी संस्कृतीशी जवळ आल्याने आदिवासी संस्कृतीतदेखील आमूलाग्र बदल होत आहेत, असेही डॉ. वळवी म्हणाले. वेबिनारचे अध्यक्ष डॉ. गावित आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक रचनेत आमूलाग्र बदल झाले. जागतिक शांतता, सुरक्षा व अखिल मानवजातीच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेकडे आशेने बघितले गेले. नव्वदच्या दशकात उदारीकरण, त्यातून आलेले जागतिकीकरण यामुळे विकासाची अनेक द्वारे खुली झाली; पण जगाच्या विविध क्षेत्रांत आपले पारंपरिक आयुष्य जगणाऱ्या आदिम जमाती मात्र विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळ्या पडल्या होत्या. तेव्हा या आदिम जमातीच्या समस्या सोडविण्यासाठी किंबहुना त्याकडे लक्ष वेधण्यासाठी 1994 पासून 9 ऑगस्ट हा आदिवासी गौरव दिन संयुक्त राष्ट्राने घोषित केला आहे केला आहे. हा दिवस जगभरात आदिवासी समूहांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, असे डॉ. गावित म्हणाले. वेबिनारचे सूत्रसंचालन प्रा. एस.एम. बोरसे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. टी.आर. शर्मा यांनी करून दिला, तर आभारप्रदर्शन प्रा. एम.डी. रणदिवे यांनी केले. वेबिनार संयोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. व्ही.डी. झुंजारराव यांनी केले होते.
वेबिनारला प्राध्यापक, इतर कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.