धुळे : जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व पद्मभूषण पंडित डॉ. उदित नारायण मानव विकास संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व साक्षरता दिनानिमित्त परिसवांदाचे आयोजन करण्यात आले होते.
'निशाणी डावा अंगठा' या मराठी चित्रपटाचे अभिनेते नाट्य कलावंत सुभाष शिंदे यावेळी उपस्थितत होते. "स्वतः विषयीच्या न्याय हक्कांविषयी सजग राहून सर्वानुभूती समत्व पाहणे, ईश्वरत्व पाहणे यातच जीवनाची सार्थकता असून, केवळ अक्षर ओळख म्हणजे शिक्षण नव्हे तर अर्थपूर्ण जगता येणे हीच जीवनमूल्यांची साक्षरता आहे’’ असे प्रतिपादन चावरा इंग्लिश स्कूलचे फादर सीजन थॉमस यानी व्यक्त केले.
कलेतून जीवनाच्या विविधांगी विषयांना सहज स्पर्श करता येऊ शकतो. प्रबोधन हाच कलेचा उद्देश असावा, असे विचार नाट्य कलावंत सुभाष शिंदे यानी व्यक्त केले.
प्रबोधित असलेले नागरिकच साक्षर होऊन देशाप्रति स्वच्छ, विधायक विचार रुजवून लोकशाही न्याय समाजाची निर्मिती करू शकतात. यासाठी सुज्ञ नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपून इतरांनाही कायदेविषयक साक्षर केले पाहिजे. सोबत पर्यावरण, आरोग्य साक्षरता वृद्धिंगत केली पाहिजे, असे विचार विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश डॉ. डी .यू. डोंगरे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात व्यक्त केले.
प्रास्तविक व सूत्रसंचालन विधि सेवा प्राधिकरणाचे आधिव्याख्याता प्रा. पंडित घनश्याम थोरात यानी केले. आभार अमोल माळी यांनी मानले.