सोनगीर : दोंडाईचाकडून धुळ्याच्या दिशेने जाणारे पिकअप वाहन संशयास्पदरित्या जाताना सोनगीर पोलिसांना आढळल्याने पाठलाग करुन वाहन पकडण्यात आले़ मात्र, चालक वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला़ वाहनाच्या तपासणीत लसणाच्या गोण्या आढळल्या असल्यातरी त्यामध्ये गुरे कोंबलेली होती़ हा प्रकार रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडला़ वाहन व गुरांसह ४ लाख ९८ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला़सोनगीर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना दोंडाईचाकडून धुळ्याच्या दिशेने येणारी एमपी १२ जीए ९२१२ क्रमांकाची मालवाहू वाहन येताना दिसले़ भरधाव वेगाने वाहन येत असल्याने पोलिसांना संशय आला़ वाहन थांबविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला़ मात्र, वाहनचालकाने वेग अधिक वाढवत पोलिसांना गुंगारा देत वाहन धुळ्याच्या दिशेने पळविले़ पोलिसांनी देखील या वाहनाचा पाठलाग सुरुच ठेवला़ पिकअप वाहन थेट धुळ्यातील चाळीसगाव चौफुलीपर्यंत येऊन पोहचले़ पोलीस पाठीमागे असल्याने वाहन सोडून वाहनचालकाने अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला़ पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली़ वाहनात मधल्या भागात लाकडाच्या पाट्या टाकून दोन भाग केले होते़ वरच्या भागात लसणाचे पोते तर खालच्या भागात सात गुरांना कोंबलेले आढळून आले़ गुरांची वाहतूक ही कत्तलीसाठी केली जात असावी असे प्रथमदर्शनी दिसून आले़ पोलिसांनी कारवाई करीत सात गुरांसह पिकअप वाहन ताब्यात घेतले. मात्र वाहनचालक व त्याचा सहकारी पसार होण्यात यशस्वी झाले होते. यामुळे दुसºया वाहनाला हे वाहन बांधून नेतांना पोलिसांची दमछाक झाली व सकाळी सात वाजेच्या सुमारास हे वाहन सोनगीर पोलीस ठाण्यात आणण्यात आले़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, अतुल निकम, अजय सोनवणे, महेंद्र ठाकूर, नयना जावळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीष भदाणे यांच्या तक्रारीवरुन गुरे वाहतुक करणाºया वाहनचालक विरोधात सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सदेसिंग चव्हाण हे करीत आहेत.दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथील मंगल गो-शाळेत गुरांना नेण्यात आले. त्या ठिकाणी पुढील संगोपनासाठी गुरे सोपविण्यात आली आहेत़
जीवनावश्यक वस्तुंच्या नावाखाली वाहनांतून गुरांची सर्रासपणे वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 20:47 IST