कापूस हे शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे नगदी पीक आहे. तालुक्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी नऊ हजारांच्या वर याला विक्रमी किंमत मिळाल्याने, शेतकऱ्यांच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याही. मात्र, या चालू आठवड्यात येथील संपूर्ण कापूस लागवड केलेले क्षेत्रफळ लाल पडत असून, झाडावरील पाने गळून नुसते काही ठिकाणी काड्या उभ्या असून, नुसते लाल बोंडे चमकत आहेत. त्या बोंडाच्या आतही अळी प्रादुर्भाव असून हा बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे का लाल्याचा, हेही येथील शेतकऱ्यांना लक्षात येत नसल्यामुळे आता काय करावे, हेच त्यांना सूचत नसल्याचे चित्र शेतशिवारातील बांधावर दिसून आले. यामुळे या हतबल झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन तर विमा कंपन्यांनी विमाचा मोबदला त्वरित उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
कापसासह खरिपातील कांदा या चलनी पिकाचीही येथे वाताहत झालेली दिसून येत आहे. मागील आठवड्यात चांगली तरतरीत वाढीस लागलेली पात पिरगळली गेली असून, वाफे बसण्याचा प्रकार जाणवत असल्याने, पिके लांबलेला पाऊस आला अन् घातच झाला, असे येथील शेतकरी सांगताना दिसून येत आहेत. आजच्या बाजारभावानुसार चांगली स्वप्ने उराशी बाळगून हा निसर्गाने घात केल्यामुळे पाऊस दाखल झाला, तरी नुकसान व नाही आला असता, तरी नुकसान हे ठरलेलेच आहे. यामुळे आता शेती हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. वाढती मजुरी लक्षात घेऊन पिकांची अवस्था बघता, या वर्षीही लावलेले भांडवल निघणे मुश्कील झाले आहे.
या वर्षी सुरुवातीला कापसाला चांगला भाव आहे. मात्र, या लाल्याच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन पाहिजे तेवढे हाती लागणार नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट दिसून येत आहे. दरवर्षी उत्पादन यायचे, तर अपेक्षित भाव मिळत नव्हता, अशी खंत येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. यासाठी आमच्या पिकाच्या विमा उतरविलेल्या कंपन्यांनी याची त्वरित दखल घ्यावी, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्यांनी त्यांना मदत देण्यास भाग पाडावे, अशी येथील शेतकरी किसन खलाणे, मच्छिंद्र सोनावणे सह कैलास खलाणे, ईश्वर वाघ, गिरधन माळी, वसंत आबा, पुंडलिक अहिरे, सुनील भलकार आदींनी केली आहे.
प्रतिक्रिया.... कापूस लागवडीपूर्वी प्रमाणित केल्यानुसार शेणखत, १ जूननंतर लागवड, रासायनिक खतांची योग्य वेळेवर मात्रा, तसेच चार कीटनाशकांची वेळोवेळी फवारणी करूनही अख्खा कापूस लाल पडून बोंडे किळली. या आठवडय़ात याचा प्रादुर्भाव जास्त झाला. लाल झाल्यावर फवारणी करून काहीच उपयोग झाला नाही. विमा काढला असून, कंपनीने पंचनामा करून योग्य भरपाई द्यावी.
- किसन यादव खलाणे, शेतकरी मालपूर ता.शिंदखेडा.
फोटो : मालपूर येथील शेतकऱ्यांचे पांढरे सोने असे लाल झाले.
120921\20210911_161002.jpg~120921\20210911_155932.jpg
मालपूर येथील कलवाडे शिवारातील किसन खलाणे यांच्या शेतातील लाल झालेला कापुस.~फोटो नं दोन