मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा कहर सुरू झाला़ टप्प्याटप्प्याने त्याची तीव्रता वाढत गेली़ परिणामी भीतीचे वातावरण तयार झाले होते़ अनेकांचा रोजगार बुडाला होता़ सर्व बाजूंनी तणाव निर्माण होत असल्याने काहींनी आत्महत्येला कवटाळले़ २०१९ मध्ये जरी आत्महत्या होत असल्या तरी त्याचेदेखील वेगवेगळे कारण होते़ त्या वर्षी ५७ जणांनी आपले जीवन संपविले होते़ मात्र २०२० या वर्षात मात्र आत्महत्या करणाऱ्यांची आकडेवारी त्या वर्षाच्या तुलनेत जरा जास्त प्रमाणात असल्याचे स्पष्ट आहे़ २०२० मध्ये ८९ जणांनी आत्महत्या करत आपले जीवन संपविले़ यात कोणी गळफास घेतला होता़ तर कोणी विषारी औषध प्राशन केले़ अशी स्थिती मागील वर्षी होती़ यंदाच्या वर्षी एप्रिलपावेतो केवळ १४ जणांनी मृत्यूला कवटाळले़ दोन वर्षात अशी स्थिती असलीतरी आताच्या परिस्थितीत कोरोना न घाबरता जीवन जगण्यासाठी धडपड सुरु झाली आहे़ कोरोनावर मात करीत वाटचाल सुरु केल्यामुळे आत्महत्येचे प्रमाण घटत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे़
संकट माझ्या एकट्यावर नाही
- मागील वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू झाला आहे़ त्यात केवळ आपण एकटेच नाहीतर संपूर्ण जग त्याभोवती गुरफटले गेले आहे़ त्यामुळे आपण काळजी करून काही उपयोग नाही़ मी एकटा अडचणीत नाही तर सर्वच अडचणीत आहेत़, ही भावनादेखील आत्महत्या रोखण्यास पुरेशी आहे़
- कोरोना हे एक संकट असून ते लवकरच दूर होईल़ ते दूर होणार नसेल तर त्याला आपण दूर करू शकतो़ अशी भावना प्रत्येक मनात ठेवायला हवी़ कोरोनाशी सर्वांनी मिळून दोन हात करायला हवे़ तसे केल्यास आपण कोरोनावर सहजपणे मात करू शकतो, असा आत्मविश्वास प्रत्येकाने मनात बाळगायला हवा़
कोरोनाची संकट म्हणून आत्महत्या
कोरोनामुळे आपला रोजगार बुडाला, आयुष्य जगायचे कसे, आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवायचा कसा असा प्राथमिक कारणावरून गेल्या वर्षभरात अनेकांनी आत्महत्या करीत आपले संघर्षमय जीवन अखेर संपविले़ आयुष्य अंधारात असल्याच्या भीतीने त्यांच्या मनात घर केल्याने त्यांच्याकडून हे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आल्याचे समोर येत आहे़
२०१९ : ५७
२०२० : ८९
२०२१ : १४