जिल्ह्यातील प्रकल्पांमधून सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:43+5:302021-05-09T04:37:43+5:30

धुळे : उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईपासून दिलासा देण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील प्रकल्पांमधून पाणी ...

Water will be released from projects in the district | जिल्ह्यातील प्रकल्पांमधून सोडणार पाणी

जिल्ह्यातील प्रकल्पांमधून सोडणार पाणी

Next

धुळे : उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईपासून दिलासा देण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील प्रकल्पांमधून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. अक्कलपाडा, अमरावती, वाडीशेवाडी, अनेर, जामखेडी मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सिंचन विभागाला दिले आहेत.

पाणीटंचाई उपाययोजनांसाठी धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील तहसीलदारांनी पांझरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार अक्कलपाडा प्रकल्पात आरक्षित असलेल्या ६५०५३८ दशलक्ष घनफूट पाण्यापैकी ३२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवर्तन सोडण्यापूर्वी नदीवरील कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्यावरील फळ्या काढण्यात याव्या. तसेच पाणी अडविले जाणार नाही, याची काळजी पाटबंधारे विभागाने घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

प्रकल्पांमधून पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर पाणीचोरी रोखण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त द्यावा. अक्कलपाडा प्रकल्प ते तापी संगमापर्यंत पाणी अखंडपणे प्रवाहित राहील, याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समितीची असेल. अमरावती मध्यम प्रकल्पातील १३६.४९३ दशलक्ष घनफूट पाणी शिंदखेडा तालुक्यातील ११ गावांसाठी आरक्षित आहे. दोंडाईचा येथील अपर तहसीलदारांनी टंचाईचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार अमरावती मध्यम प्रकल्पातून ५६. ९३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.

वाडीशेवाडी प्रकल्पातून २० गावांसाठी १२० दशलक्ष घनफूट, अनेर धरणातून चोपडा तालुक्यातील १६ गावांसाठी ९१.३५ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. जामखेडी मध्यम प्रकल्पातील १९ दशलक्ष घनफूट पाणी साक्री तालुक्यातील ४ गावांसाठी आरक्षित आहे. त्यापैकी १०.२८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.

Web Title: Water will be released from projects in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.