याबाबत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेंढपाळ ठेलारी समाजाला मेंढी चराईसाठी हक्काची वनजमीन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अद्यापही जमीन देण्यात आलेली नाही. मेंढपाळ ठेलारी समाज तीन वर्षांपासून वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे मेंढी चराईसाठी वनजमीन मागत आहे; पण अधिकारी जमीन दाखवत नाहीत. त्यासाठी अनेक वेळा आंदोलन झाले. वनअधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देण्याचे आंदाेलन झाले. त्यावेळी पाेलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी प्रश्न सोडवण्याचे ताेंडी आश्वासन दिले होते. त्यामुळे आंदाेलन स्थगित करण्यात आले होते; परंतु जमीन मिळाली नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ठेलारी महासंघाने दिला आहे. मेंढ्या चराईसाठीच्या वनजमिनीचा प्रश्न त्वरित सोडविला नाही, तर १ ऑक्टाेबरला अज्ञातस्थळी जाऊन आत्मदहन करण्यात येईल, असा इशारादेखील निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.
आंदोलनात शिवदास वाघमाेडे, रामदास कारंडे, दिनेश सरक, विलास गरदरे, माेतीराम गरदरे, पंकज मारनर, साेनू टिळे, ज्ञानेश्वर सुळे, अनिल गाेयकर, रमेश गाेयकर आदी सहभागी झाले होते.