कृषी महाविद्यालयाच्या पुढील अनुवाद नाल्यावरील पुलाची पुरती दुर्दशा झाली आहे. पुलाच्या रस्त्यावर मोठमोठे दोन ते अडीच फुटांचे खड्डे पडले आहेत. पुलाचे कठडेही तुटून पडले आहेत. खराब रस्त्यामुळे दर दिवशी वाहतूककोंडीची समस्या होताना दिसून येत आहे. मुंबई - नागपूर असा नॅशनल हायवे असताना वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर मोटारसायकली आणि लहान चार चाकी वाहनांची नेहमीच प्रचंड वर्दळ असते. एकमेकांना ओव्हरटेक करताना या खड्ड्यांमध्ये वाहने अडकून पडतात त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. मोठ्या खड्ड्यांमुळे वाहने मध्येच बंद पडत असल्यानेही ट्राफिक जाम होते. शाब्दिक वादविवाद होतात. खड्डे टाळण्यासाठी वाहने एकमेकाच्या अंगावर जाऊन कट मारण्यासारखे प्रकार घडतात त्यामुळे कधीकधी हाणामारीसुद्धा होते. या पुलावर मोठमोठे अपघात झाले आहेत.
सुरत ते नागपूर हायवेच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या तीन-चार वर्षांपासून बंद पडले आहे. या रस्त्याचे काम झाले असते तर ही वाहतूक बायपासने बाहेरच्या बाहेर गेली असती आणि येथील ट्राफिक जामची समस्या मिटली असती. मात्र हे चौपदरी काम सुरू करण्याचा मुहूर्त निघत नाही. दरम्यान, या खड्ड्यांमुळे अनेकांना अपंगत्व आले तर काहींना जीव गमवावा लागला. अनेकांचे संसार उघड्यावर पडत असूनही प्रशासन साधे खड्डे बुजविण्याचे नियोजन करू शकत नसल्याने जनतेचा प्रशासनावरील विश्वास उडत चालला आहे. बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरण यांनी लक्ष घालून येथील खड्डे बुजवून आणि रस्त्याची डागडुजी करून वाहतुकीसाठी होणारा अडथळा त्वरित दूर करावा, अशी मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
090921\img_20210908_114433.jpg
कृषी महाविधालया जवळील पुलाचे कठळे टुटलेले रस्त्याला खडडे दुरुस्त करावे