धुळे : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम उमेदवारी अर्ज छाननीनंतर स्थगित करण्यात आला होता. तो कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार आता छाननीनंतरच्या निवडणूक प्रक्रियेला २१ सप्टेंबरला सुरुवात होणार असून ५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीसाठी सोमवारपासून आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे.
१५ गटांसाठी १०७ उमेदवार रिंगणात
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाला ९ जुलै रोजी उमेदवारी अर्ज छाननीनंतर स्थगिती देण्यात आली होती. उमेदवारी अर्ज छाननीनंतर जिल्हा परिषदेच्या १५ गटांसाठी १०७ तर ३० गणांसाठी १८५ अर्ज वैध ठरले होते.
आता त्यापुढील प्रक्रियेला २१ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्या २१ सप्टेंबर रोजी छाननीनंतर उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. २७ सप्टेंबर माघारीची शेवटची मुदत आहे. त्याचदिवशी सायंकाळी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. ज्याठिकाणी उमेदवारी अर्जांसंदर्भात अर्ज दाखल असेल त्या ठिकाणी २९ सप्टेंबर रोजी माघार घेता येईल आणि सायंकाळी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी मतदान होईल. दुसऱ्या दिवशी ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येईल.