शासकीय रुग्णालयांतील व्हेंटिलेटर दोन दिवसांत कार्यान्वित करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:35 AM2021-04-06T04:35:22+5:302021-04-06T04:35:22+5:30

धुळे : जिल्हा रुग्णालयासह शासकीय रुग्णालयांतील व्हेंटिलेटर दोन दिवसांत कार्यान्वित करावेत. त्यासाठी हिरे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे ...

Ventilators in government hospitals should be operational within two days | शासकीय रुग्णालयांतील व्हेंटिलेटर दोन दिवसांत कार्यान्वित करावेत

शासकीय रुग्णालयांतील व्हेंटिलेटर दोन दिवसांत कार्यान्वित करावेत

Next

धुळे : जिल्हा रुग्णालयासह शासकीय रुग्णालयांतील व्हेंटिलेटर दोन दिवसांत कार्यान्वित करावेत. त्यासाठी हिरे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी पुढाकार घ्यावा. ‘कोविड-१९’ रुग्णांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टरांना उसनवारीच्या तत्त्वावर तीनशे रेमडेसिवीर इंजेक्शन तत्काळ उपलब्ध करून द्यावेत. त्यांचा आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वापर करावा. तालुकास्तरावर ऑक्सिजनचे टँक कार्यान्वित करावेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिले.

या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, आमदार जयकुमार रावल, आमदार मंजुळा गावित, आमदार डॉ. फारुक शाह, उपमहापौर कल्याणी अंपळकर, जिल्हाधिकारी संजय यादव, सीईओ वान्मथी सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजिज शेख, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते.

कोविड केअर सेंटरचे ई-लोकार्पण

या वेळी मंत्री टोपे यांच्या हस्ते कुडाशी, ता. साक्री येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीसह, जिल्हा रुग्णालयातील कोविड-१९ बाह्य रुग्ण कक्ष आणि पिंपळनेर, ता. साक्री येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे ई-लोकार्पण करण्यात आले.

खाटांची संख्याही वाढवावी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रारंभिक लक्षणे दिसताच चाचणी केली पाहिजे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची चाचणी झाली पाहिजे. त्याबरोबरच खाटांची संख्याही वाढवावी. बाधित रुग्ण कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटलसह शासकीय संस्थांमध्ये अधिकाधिक संख्येने दाखल झाले पाहिजेत. त्यासाठी लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी गावागावांत जनजागृती अभियान राबविले पाहिजे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रांसह २० पेक्षा जास्त खाटा आणि कोल्ड चेनसह शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुविधा उपलब्ध असतील, तर ‘कोविड-१९’ लसीकरण केंद्रांना मंजुरी द्यावी. अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा. ग्रामपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका कार्यकर्ती, आशा स्वयंसेविकांनी ४५ वर्षांवरील नागरिकांची यादी तयार करून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. असेही निर्देश मंत्री टोपे यांनी दिले.

Web Title: Ventilators in government hospitals should be operational within two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.