शहर वाहतूक शाखेच्यावतीने शहरातील संतोषी माता चौकापासून हे फलक बसविण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, ए. यु. बँकेचे रिजनल मॅनेजर अनुराग त्यागी, पंकज गाडेकर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत, उपनिरीक्षक रामदास जाधव आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.
या फलकांमध्ये नो पार्किंग, नो हाॅर्न, हेल्मेटचा वापर, सीटबेल्टचा वापर आदी माहिती देणारे असून, यामुळे शहरातील बेशिस्त वाहनधारकांना चाप बसेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. देण्यात आलेले हे फलक संतोषी माता चौक, कमलाबाई चौक, गरुड काॅम्पलेक्स, झाशी राणी पुतळा, महाराणा प्रताप चौक, गांधी पुतळा, नेहरू चौक, दत्त मंदिर चौक, देवपुरातील विविध परिसर, जुना आग्रा रोड, कराचीवाला खुंट, शहर पोलीस चौकी, पारोळा रोड, प्रकाश टाॅकीज, बाजार समिती, बारा पत्थर चौक, मामलेदार कचेरी, मुख्य पोस्ट ऑफिस, जेल रोड, बसस्थानक, पोलीस मुख्यालय प्रवेशद्वार, फाशीपूल, स्टेशन रोड, दसेरा मैदान अशा विविध भागात हे फलक बसविण्यात येणार आहेत.
शहरातील जे वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील, तसेच बसविण्यात आलेल्या माहिती फलकांच्या नियमाप्रमाणे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर मोटारवाहन कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा वाहतूक पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिला.