फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाली होती. सध्या जिल्ह्यात ४१ हजार २९९ बाधित रुग्ण आहे. त्यामुळे धुळे महानगरात १८ हजार १०३ रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ६६७ असून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४१२६० इतकी आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आलेली असतांना पुन्हा म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. म्युकरमायकोसिस हा आजार रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रुग्णांना होते. आतापर्यंत जिल्ह्यात १५३ रुग्ण या आजाराचे आढळून आले आहे. त्यातील बहुसंख्य रुग्ण हे कोरोनातून बरे झालेले आहेत.
शिरपूर व धुळ्यात सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत १५३ रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण शिरपूर व महानगरातील आहे. जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू झाला होता. दुसऱ्या लाटेत धुळे शहर व शिरपूर तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. त्यामुळे शिरपूर व धुळे शहरातून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस झालेला दिसून येत आहे.
जवाहरमध्ये ७० जणांवर यशस्वीपणे उपचार
जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिक्ल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ७० म्युकरमायकोसिस पेशंटवर उपचार करण्यात आलेले असून ५० हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आलेल्या आहेत. म्युकरमायकोसिस आजारासाठी डेंटल सर्जन, कान, नाक, घसा तज्ञ, डोळ्यांचे डॉक्टर्स, मेडिसिन विभाग असे सर्व डॉक्टर्स एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.
म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी
जिल्ह्यात ५८ बेडची व्यवस्था
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस होत आहे. त्यामुळे या आजारावर निदान करण्यासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात ४०, जवाहर मेडिकल काॅलेज १०० तसेच खासगी रुग्णालयातील ७ बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे, असे एकूण जिल्ह्यात १४७ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार
म्युकरमायकोसिस आजारावर निदानासाठी अधिक खर्च येतो. त्यामुळे सर्व सामान्य रुग्णांवर उपचार व्हावेत. यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत या आजाराचा समावेश करण्यात आला आहे. तसेच खासगी रुग्णालयांनादेखील दर निश्चित करून देण्यात आलेले आहे. तसेच रुग्णांना केंद्र व राज्य सरकारकडून औषधी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
एका रुग्णाला लागतात ३० डोस
- म्युकरमायकोसिस झालेल्या एका रुग्णाला लिपोसोमल एम्पोटीसीरीन बी इंजेक्शनचे ३० डोस द्यावे लागतात. काही रुग्णांना तर ३० पेक्षा अधिक डोसची गरज भासते.
- कोरोनाच्या आधी वर्षभरात केवळ १० ते १२ इंजेक्शनची विक्री व्हायची असे विक्रेत्यांनी सांगितले. ४ जहाजावर ५०० ते ६ हजार ८२५ पर्यंत या इंजेक्शनची किंमत आहे
डोळे, नाक, जबड्याला फटका -
म्युकरमायकोसिसमुळे जबडे कुजणे, दात हलणे तसेच डोळ्यांची दृष्टी कमी होणे अशी लक्षणे दिसतात. सुरुवातीला दात, डोळे व डोक्याला तीव्र वेदना होतात. काही रुग्णांच्या दात व ओठांना बधिरपणा येतो. डोळ्यांना सूज येणे, वरची पापणी न उघडणे आदी लक्षणे दिसतात. लवकर निदान न झाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो.