धुळे : जिल्ह्यात दुचाकी चोरीचे गुन्हे वाढले असून गेल्या चोवीस तासात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. दुचाकी चोरांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना अपयश येत आहे. धुळे शहरात चाळीसगाव रोडवरील म्हाडा अपार्टमेंट परिसरातून एम. एच. १८ ए. जे. ९५४१ क्रमांकाची १० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्याने चाेरून नेली. याप्रकरणी अशोक मांगीलाल कापडिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात मंगळवारी चोरीचा गुन्हा दाखल झाला. तपास हेड काॅन्स्टेबल नंदाळे करीत आहेत.
दरम्यान, शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरपूर शहरात एका खासगी दवाखान्याच्या समोरून १५ हजार रुपये किमतीची एम. एच. १८ बी. के. ८२७५ क्रमांकाची मोटारसायकल चोरीला गेली. २२ जुलै रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या दरम्यान अवघ्या अर्ध्या तासात ही चोरी झाली. याप्रकरणी तृप्ती आशिष अग्रवाल (३३, रा. आदर्शनगर, शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी चोरीचा गुन्हा दाखल झाला. तपास हेड काॅन्स्टेबल धनगर करीत आहेत.
दरम्यान, साक्री तालुक्यातील दारखेल गावात नंदकुमार तुकाराम भामरे यांच्या घरासमोरून ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरण्यात आली. मंगळवारी रात्री १.३० वाजेच्या सुमाराला ही चोरी झाली. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड काॅन्स्टेबल बागुल करीत आहेत.